बाजींद भाग ०५

बाजींद भाग ०५ मध्ये स्वागत
पै.गणेश मानुगडे

वडील “राजे येसजीराव शिर्के” आदिलशाही साम्राज्याचे नेकजात,निष्ठावान मनसबदार.
आमचे सारे घराणे विजापूर च्या गादीची इमाने इतबारे सेवा कित्येक पिढ्या करत होती..!


पण,पुण्याचे शिवाजीराजे भोसले यांनी “हिंदवी स्वराज्याचा” डाव मांडला आणि केवळ आदिलशाही नव्हे तर हिंदुस्थानातील पाची पातशाह्या हादरुन गेल्या.
अफझलखानासारखा बलाढ्य सरदार फाडून जावळी पासून महाड पर्यंत असणारा जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा प्रदेश एकहाती शिवाजी राजांनी जिंकला…केवळ आमची माची सोडून….!


वास्तविक आमच्याकडे लक्ष देण्याइतपत आमचे सैन्य जास्त नव्हते,पण आमचे वडील फार शूर,इमानी आणि एकनिष्ठ सेनानी म्हणून पंचक्रोशीत नाव होते,
दुसरी गोष्ट तळकोकणात सर्व हालचाली वर सहज लक्ष ठेवता येईल असे मोक्याचे ठिकाण म्हणजे “यशवंतमाची”…!


शिवाजी महाराजांच्या धाकाने आसपास ची कित्येक बलाढ्य घराणी शिवाजीराजांचा कौल घेऊन स्वराज्यात सामील झाली,फक्त आमचे घराणे सोडून….!
बस्स…हिच गोष्ट आमच्या घराण्याच्या नाशाला कारणीभूत ठरली…!

Bajind bhag 05


आमच्या वडिलांची फौज फार शूर व चिवट होती.
कुस्ती,तलवार,भाला, दांडपट्टा,घोडा या सर्वांचे प्रशिक्षण आमच्या वाड्यातच मिळत असे..!
आमच्या गावच्या “काळभैरव” यात्रेला कुस्तीचा फार मोठा आखाडा भरत असे.

त्यादिवशी पण गावाच्या यात्राचा फार मोठा आखाडा भरला होता ……

“राजे येसाजीराव शिर्के” यांनी अनेक मल्लांना आश्रय दिला होता.महाराष्ट्रातील एक एक तगडे मल्ल त्यांच्या तालमीत सराव करत होते.


बदाम,काजू,खारीक,सुके फळे यासह अनेक खुराकाचे पदार्थ दर महिन्याला बैलगाड्या भरून भरून तालमीत येत असे.


स्वता येसाजीराव कुस्ती मेहनत खूप करत असत.
पंचक्रोशीतील एखाद्या मैदानात चांगला लढवय्या मल्ल दिसला कि त्याच्या सार्या आयुष्याची जबाबदारी घेऊन त्याला सांभाळत असे.


असे आमचे शिर्के घराणे कुस्तीचे फार नादिष्ट्य..!
काळभैरवाच्या यात्रेत महाराष्ट्रातील अनेक मल्ल कुस्ती खेळायला येत असत.मोठमोठ्या बक्षिसांच्या रकमा,खुराकाचे साहित्य,तलवार,घोडा अशी बक्षिसे मिळवून परत जात असे.


पंचक्रोशीतील लाखो लोक त्या कुस्त्या पहायला बैलगाड्या जुंपून,घोड्यावरून,पालखीतून,पायी येत असत.
त्यांच्या जेवणा खाण्यापासून ते मुक्कामाची सोय सारे “राजे येसाजीराव शिर्के” करत असे.

शिवाजी महाराज आणि आदिलशाही चे राजकारण वेगळे आणि हा कुस्त्यांचा फड वेगळा असे समजून अनेक शिवशाहीचे सरदार सुध्दा या मैदानाला आवर्जून हजर असे.


त्या दिवशी सुध्दा असाच माणसांचा लोंढा यशवंतमाची ला पडला.
हशम हत्यारे पेलून येसाजीरावांच्या फौज्या चहू बाजूनी गस्त घालून संरक्षण करताच होत्या.


अनेक पैलवान हातात बर्चे भाले पेलून जंगलात तळ ठोकून येणाऱ्या पाहुण्यात कोणी शत्रू तर नाही याची दाखल घेत होते …..चिलट सुध्दा राजे येसाजीरावांच्या परवानगी शिवाय आत येणार नाही अशी संरक्षण व्यवस्था होती ,आणि जर आलेच तर त्याची खांडोळी करायचे आदेश होते.

दुपारी सूर्य मध्यावर आला आणि पश्चिमेकडे झुकू लागला आणि ‘काळभैरवाच्या नावान चांगभल’ च्या आरोळीने आसमंत दुमदुमून गेला.
लाखो लोकांनी यशवंतमाचीच्या काळभैरव डोंगराच्या खाली तयार केलेल्या कुस्ती मैदानाला कडे करायला सुरवात केली.


अनेक गावाचे,अनेक नावाचे ,अनेक पदांचे सरदार ते दंगल पहायला आले होते.अनेक वस्ताद- खलिफा आपापले पठ्ठे या मैदानात लढवायला घेऊन आले होते.


एव्हाना हलगी घुमक्याच्या ,शिंग तुताऱ्याच्या निनादात दांडपट्टा,लाठीकाठी चा खेळ मैदानात सुरु झाला.
अनेक वीर आपले कसब दाखवत होते ,आणि एखादा धारकरी आवडला कि उपस्थित प्रेक्षकातील एखादा “विजापुरी सरदार”त्याला मागेल तेव्हडे धन देऊन आपल्या पदरी येण्यासाठी व्यवहार करत असे..!


असे एक ना अनेक धारकरी आपल्या कर्तुत्वावर अनेक सरदार लोकांचे मांडलिक झाले ,अजूनही होत होते.
मर्दानी शस्त्रांचा खेळ संपून लहान मोठ्या कुस्त्याना प्रारंभ झाला ,महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले अनेक मल्ल आपले कसब दाखवून उपस्थित धनाढ्य लोकांच्याकडून आणि खुद्द येसाजीरावांच्या खजिन्यातून रोख बक्षीस जिंकत होते …!


सूर्य मावळतीला झुकणार इतक्यात राजे येसाजी शिर्के यांच्या खास तालमीत तयार केलेला “भीमा जाधव” हा लढवय्या मल्ल लांघ-लंगोट चढवून अंगाला तेल लावून मैदानात ‘’जय बजरंगाची’’ आरोळी ठोकून उतरला.त्याच्या शड्डूच्या घुणत्काराने सार्या मैदानाच्या कानठीळ्या बसल्या..!


सारेच त्याची शरीरयष्टी पाहून थक्क झाले.
शे-दीडशे किलोचा तो भीमा नावाप्रमाणे भीम भासत होता.कल्लेदार मिशा.काळाकिभिन्न दिसणारा भीमा हा पैलवान नव्हे तर प्रतिस्पर्ध्याचा यमदूत आहे असे वाटत होते.


अनेक ठेकेदार भीमावर रोख रकमा,सोने चांदी,तलवार ढाली,बैलजोड्या,घोडे,गदा.यासःह हिरे मोती सुध्दा बक्षीस लाऊ लागली,
बक्षिसांचा आकडा चांगलाच फुगला तरीपण उपस्थित वस्ताद,खलिफा खाली मान घालून उभे होते.
भीमाला जोड काही मिळेना.


कशी मिळणार जोड ?अहो त्या भिमाशी लढणे म्हणजे साक्षात मृत्यूशी लढणे होय.कधी काय मोडून टाकल नेम नाही….!
राजे येसाजी उठले आणि मोठ्या रवात बोलू लागले……!
माझ्या भिमाशी चार हात करायला महाराष्ट्रात कोणी नाही ?


वऱ्हाड,खानदेश,कृष्णाकाठ,देश,कोकण सारे इथे जमले आहेत.कोणाच्याही तालमीत नाही का एखादा सुरमा मल्ल ?
आणि नसेल त्याला जोड तर मानाने त्याला बक्षीस देऊन सर्वांनी मान्य करा कि राजे येसाजींच्या पदराचा मल्ल महाराष्ट्रात अजिंक्य आहे …!


पूर्वेकडून हलगी,घुमके,शिंग तुताऱ्या कल्लोळ करू लागल्या…लाखांची गर्दी कुजबुजू लागली…!
सर्व बक्षीस एका हारकार्याने एका पोत्यात फिरून गोळा करून मैदानाच्या मधोमध आणले..स्वता राजे येसाजीनी ५ शेर वजनाचे सोन्याचे कडे भीमाला बक्षीस देऊ केले …ते मनोमन खुश होते…!

भीमा बेजोड मल्ल म्हणून विजयी ठरणार होता.

पण…पण तितक्यात मैदानाच्या उजव्या अंगाकडून एका गंभीर आवाजाने मैदानात शांतता पसरली…!
‘थांबा…..’
माझा पठ्ठा लढेल भिमाशी तुमच्या….!

कोण ?..

एकाने विचारपूस करून ठावठीकाणा माहिती आणली…!

गुंजनमावळातील शिळमकर देशमुख सरदारांच्या पदरी असणारा एक लढवय्या मल्ल खंडेराव सरदेसाई आणि त्याचे वस्ताद काकासाहेब जेधे आले आहेत..!
दोन्ही वस्ताद पैलवानांचे गुळ पाणी देऊन स्वागत झाले आणि कपडे काढून राजे येसाजीना मुजरा करून तो मल्ल मैदानात आला….!

घोटीव,पिळदार शरीर…मजबूत मांड्या,बलाढ्य बाहू….ओठावर किंचित काळी रेघ आणि स्मितहास्य..गोरापान नितळ चेहरा,सरळ सळसळीत नाक ….आणि पायात काळा दोरा बांधलेला खंडेराय सहीसही साक्षात “मल्हारी मार्तंड” वाटत होता..!
त्याच्या देखणेपणा आणि शरीराचे कौतुक गर्दीत होऊ लागले…!

एक मुठी माती त्याने हातात घेऊन कपाळाला लावली….आणि राजे येसाजींच्या कडे पाहत प्रचंड शड्डू ठोकला…सारे मैदान हादरले……!
मान्यवरांच्या हस्ते हातसलामी झडली …आणि काही क्षण भूतकाळात जमा झाले..!

भीमा आणि खंडेराय यांची कुस्ती म्हणजे जणू दोन वादळे एकमेकांशी भिडणार होती.
निकाल काय होईल याचा अंदाज बंधने मुश्कील होते..!
भीमा-आणि खंडेराय मनगटाला मनगटे भिडली…गर्दनखेच सुरु झाली..!

बघता बघता मैदानांत डावांची वलये सुरु झाली
भीमाने वर्षभर कसून तयारी केलेला एक एक डाव खंडेरायावर मारत होता,आणि त्याची सहजच उकल करत खंडेराय सुटत होता…दोन्ही मल्ल चिखलाने माखले..!

कुस्तीचे पारडे कधी भीमा तर कधी खंडेराय च्या बाजूला झुकत होते.

भीमा एखाद्या भरपावसात भिजत उभा असलेल्या बुरूजासारखा वाटत होता तर खंडेराय गोऱ्या रंगावर तांबड्या मातीच्या चिखलाने केशरी आंब्याप्रमाणे भासत होता …!

आणि ,
आता मात्र खंडेरायाने आक्रमक पवित्रा घेतला आणि भीमा चा उजवा हात बगलेत दाबून “आतली टांग” डाव इतक्या जोरात मारला आणि अक्षरश सुदर्शन चक्र फिरावे तसे भीमा गर्दीशी फिरून मैदानावर आडवा झाला…..सपशेल चीतपट कुस्ती…!

सारे प्रेक्षक आनंदाने बेभान झाले ….खंडेरायाला डोक्यावर घेऊन सारे लोक आनंदाने नाचू लागले.
हे सर्व पाहत राजे येसाजी उठले….शेजारी उभे असलेल्या कारभार्याला बोलले…या पोराला आणि त्याच्या वस्तादाला घेऊन वाड्यावर या….असे म्हणत राजे निघून गेले….!
खंडेराय गळ्यात फुलांच्या माळा,गुलाल आणि रोख बक्षिसात न्हावून गेला ….!

सर्व जण बेभान आनंदात होते…पण खंडेरायाची गूढ नजर मात्र वेगळीच भाषा बोलत होती…चेहऱ्यावर एकप्रकारची गंभीर शांतता दिसत होती……!
सारे लोक आनंदात होते….फक्त राजे येसाजीराव मात्र मनस्वी दुखी.
आजवर त्यांच्या गावात येऊन खुद्द राजांच्या मल्लाच्या छातीवर बसून विजयी आरोळी ठोकणारा खंडेराय त्यांच्या नजरेसमोरून हटत नव्हता……….त्याना ओढ होती त्यांच्या भेटीची…आणि खंडेरायाला ओढ होती…’यशवंतमाचीची’…?

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “बाजींद भाग ०५”

  1. खूप खूप आभार अणि शुभेच्छा आपण खूप चांगली माहिती दिली 👌✌️🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!