बाजींद भाग ०६


राजे येसाजीरावांच्या मस्तकात फुटाणे उडत होते.
साऱ्या महाराष्ट्रातील मनसबदारांच्या पुढ्यात नाचक्की झाली होती.


काय कमी केलं होत “भीमा” च्या कुस्ती-मेहनत-खुराकात ?
रोज सकाळी पाच रात्री पाच शेर दूध.
दररोजचा ६-६ तास व्यायाम.
तगड्या मल्लांसोबत लढती.मालीश, मसाज करायला नोकर चाकर…मेहनत मोजून घ्यायला मुनीम.. सगळं राजेशाही असून शिळमकर देशमुखांच्या मल्लाला ऐकला नाही…!
डोकं भनभनत होत.
तेवढ्यात एका हुजऱ्यान वर्दी दिली…”राजे,ते मैदानातले पैलवान आणि वस्ताद आल्यात भेटाया”

राजे सावरुन बसले,भोवताली दिगग्ज सल्लागारांचे पथक दिमतीस होतेच…..”बोलवा,त्यांना” राजांनी आदेश दिला….!

काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि चारचौकी शिर्के वाड्यातील सदरेत पैलवान खंडेराय आणि त्याचे वस्ताद आले…!

खंडेराय….अगदी वीस-पंचवीशीतला उमदा जवान गडी.ओठावर नुकतीच काळी रेघ दिसत होता.अंगापिंडाने धिप्पाड खण्डेराय पाहून कोणीही त्याच्या प्रेमात न पडावे तर नवल.
डोईला मराठेशाही पगडी,कमरेला तलवार असलेल्या खंडेराय व त्याच्या वस्तादांनी राजाना मुजरा केला.

उजवा हात वर करत राजांनी पण मुजरा स्वीकारला आणी बोलू लागले….”पैलवान,आम्ही तुमच्या कुस्ती वर निहायत खुश झालो आहोत,आमच्या भीमाला इतक्या सुंदर डावपेचात अडकवून चित करणारा पैलवान साधासुधा नाही हे आम्ही जाणतो,बोल काय बक्षीस देऊ तुला आम्ही “?

राजांचे स्तुतीपर ते शब्द ऐकून खंडेराय किंचित स्मित करत वस्तादांच्या हातात असलेले बक्षिसाने भरलेले पोते एका हातात धरून राजे येसजींच्या पुढ्यात ओतले…आणि बोलू लागला…”

“राज… मला द्यायचच असलं तर तुमच्या तालमीत आश्रय द्या,कुस्ती-मेहनत करुन गावोगावच्या यात्रा जत्रा मारुन वैतागलोय आमी, ही माज वस्ताद आणि म्या तुमच्या तालमीत राहिलो तर तुमचं लय नाव करुन दावीन…”

काय ?
राजे प्रश्नार्थक बोलून गेले ..!
अरे तुम्ही गुंजनमावळातील शिळमकर देशमुखांचे मल्ल,म्हणजे एकाअर्थी भोसल्यांच्याच हद्दीतले…!
भोसले-आदिलशाही दुष्मनी विकोपाला आली असताना तुला आम्ही आमच्या पदरी ठेवणे योग्य नाही….”

तेवढ्यात खंडेराय बोलला….”तस नव्ह राज…शिळमकर आणि आमचं संबंध जावळीच्या दंग्यावेळीच तुटलं,आणि शिळमकर तर चंद्रराव मोर्यांचा सख्खा भाचा हुता…त्यांना तर कुठं शिवाजीराजांच अभय हाय…?
हिकडं आड, तिकडं हिर नगासा करु… नायतर मग तुम्ही नाय म्हणला तर सरळ रायरी गाठून शिवाजीराजांची चाकरी पत्करायची का आमी ??

राजे,क्षणभर विचारात पडले.
खंडेराय चांगला पैलवान आहे यात शंकाच नाही,उद्या जर शस्त्रांचे चार हात शिकला तर चोखट धारकरी बनू शकेल,शिरक्याची दौलत सांभाळायला मजबूत मनगट मिळेल…”

“ठीक आहे खंडू….आम्ही ठेवू तुला आमच्या तालमीत…,असे म्हणत येसजीराजानी नोकराला हाक मारून,त्यांचे सामान उचलून वाड्याच्या मागे असलेल्या भव्य तालमीत ठेवायला लावले..!

बाजींद भाग ६

ते म्हणाले…तुमची तात्पुरती सोय पुढे घोड्याच्या पागेभोवती असलेल्या घोडेवानाच्या खोलीत करु… चार दोन दिसानी तालमीत रहा…”
काही हवं नको याची सोय करुन राजे..वाड्याच्या आत निघून गेले…!

नोकरांनी खंडेराय व वस्तादांची साहित्याची पोती उचलून घोडेवानाच्या खोलीत ठेवली….!

“यशवंतमाची” च्या यात्रेत खुद्द येसाजीराजांच्या मल्लाला पराभूत केले ही बातमी वाऱ्यासारखी येसाजीराजांच्या अंतरमहालात गेली.
राजांना एकच मुलगी.
“सावीत्री”तिचे नाव.रुपाने अतिशय रूपवान.
गोरापान चेहरा,सतेज कांती,सरळ सळसळीत नाक..पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात,सहीसही राजलक्ष्मी भासत असे…!
शिर्के घराण्याची “सावित्री”म्हणजे यशवन्तमाचीचे नाकच होते…लाडाने सर्व तिला “साऊ”म्हणत असे….खूप खूप लाडात वाढली होती ती..!


राजांना कधी आपल्याला मुलगा नाही याची उणीव तीने भासुन दिली नव्हती..!


नाजूक रुसव्या फुगव्यात कधी ती अडकलीच नव्हती.
भरधाव घोड्यावर मांड ठोकून वाऱ्याच्या वेगाने घोडा फेकत सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात स्वछंद भरारी मारणे,तलवार,भाला,गदा,धनुष्यबाण सर्वकाही लीलया चालवत असे…आणि एवढे असूनही शिरक्यांच्या वाड्यात नजरेने कधी जमीन सोडत नसे…!


जशी यशवन्तमाची साऊ जीव मानत असे किंबहुना त्यापेक्षाही जास्त यशवन्तमाचीची इज्जत साऊ ला प्रिय होती…!

आजचा घडलेला प्रकार तीला जिव्हारी लागला होता.
दस्तूरखुद्द शिरक्यांच्या गावात येऊन शिरक्यांच्या पैलवानाला आव्हान देऊन चितपट करणारा कोण हा ऎरा गैरा आहे त्याला चांगलाच धडा शिकवायची मनीषा साऊ च्या मनात आली होती…!

दिवस उगवला,सह्याद्रीच्या कडेकपारीत सहस्रोसूर्यनारायणाची सहस्रो किरणे आपल्या सुवर्ण किरणांनी दाही दिशा उजळून टाकू लागली…पण राजे शिरक्यांच्या वाड्यामागील तालमीत भल्या पहाटेच शड्डू घुमू लागले होते.
खंडोजीच्या जोराचा ठेका पाच हजाराच्या वर गेला होता…!


घामाने निथळत असलेले त्याचे शरीर एखाद्या चिरेबंद बुरुजाप्रमाणे भासत होते.

सकाळ होताच राजे स्वता तालमीत आले.
सर्व जवान धारकरी नुकताच कुस्तीचा सराव आटोपून आपापली हत्यारे परजत तालमीबाहेरच्या मैदानात तलवार-पट्टयांचा सराव करु लागली…”

“खडूं… उचल तो पट्टा ,अन घे पवित्रा….”
राजे खंडेराय ला बोलले.

त्यांच्या बोलण्याने खंडेराय बोलला….”नाय राजं… म्या पैलवान गडी…ही धारकऱ्याची कामं, मला नाय जमायचं..”

यावर हसून राजे बोलले…”अरे, माझ्या भीमाला चित केलंस त्यापेक्षा सोप्प काम आहे हे…चल उचल “

भीत भीत खंडेरायाने पट्ट्याच्या खोबणीत हात घातला..आणि एक एक हात करु लागला…सारे मल्ल त्यावर हसू लागले…”

खंडेराय ला काही केल्या पट्टा चालवता येईना,दमून त्याने त्याचा नाद सोडला व राजे येसजींची मालीश करतो म्हणाला….”

राजांचे सर्वांग तेलाने माखून खंडेराय आपल्या मजबूत हाताने मालीश करत होता,सारे मल्ल आसपास हत्यारांचा सराव करत होती….खंडेराय घामाने ड्बडबला होता अन तितक्यात तालमीच्या दरवाजावर थाप पडली..!

“बघ रे,कोण आहे ते….
खंडेराय उठला आणि घाम पुसत तालमीचा दरवाजा उघडला….सुर्याची किरणे एकदम तालमीच्या दरवाजातून आत प्रवेशली आणि त्याच्या आडवी उभी असणारी एक जातीवन्त देखणी स्त्री हातात दुधाचा तांब्या घेऊन उभी होती…..खंडेराय तीचे ते जातिवंत सौंदर्य पाहू लागला…..आणि ती ….ती सुद्धा त्याचे देखणेपण न्याहळत होती….,काही क्षण तसेच निघून गेले अन….राजे येसाजी गर्जले…कोण आहे रे ?

“आबा,दूध आणले आहे…..साऊ चा नाजूक आवाज आला,”

“खंडू…तांब्या घे तो”….राजे बोलले.

खंडेराय निशब्द होता,त्याच्या हृदयाची कंपने अतीतीव्र झाली होती…आणि साऊ…तिचीही अवस्था काहीशी तशीच होती…अजून काही क्षण भूतकाळात गेले आणि ते दोघेही नजरभेटीचे सुख अनुभवत तिष्ठत उभेच होते….”

“साऊ……….पाठीमागून कोणीतरी हाक मारली आणि दोघेही सावध झाले…सावित्री ने दुधाचा तांब्या खंडेराय च्या हातात देऊन धावत मागे गेली”

राजांच्या हाती तांब्या देऊन खंडेराय उभा होता…5 शेर दुधाचा पितळी तांब्या बघता बघता राजानी रिचवला…आणि अंघोळीला निघून गेले…”

खंडेराय मात्र त्या गूढ डोळ्यांची आठवण कितीतरी वेळ काढत तालमीत बसला होता….”

साऊ च्या मनाची घालमेल पण अशीच होती…कोण होता तो ?
याआधी कसा पाहिला नाही …कित्येक प्रश्नांनी मनात काहूर माजले होते….”

अंघोळ पाणी आटोपून खंडेराय राजे येसजींच्या परवानगी ने गावात जाऊन येतो म्हणून निघाला……”

सकाळचा सूर्य माथ्यावर आला नी खंडेराय यशवन्तमाची पासून 5-6 कोसावर एका डोंगररांगेतल्या जंगलात गेला.
एक मेंढरांचा कळप चरणाऱ्या मेंढपाळाला पाहून त्याने हाक मारली……….”जय मल्हारी”
त्याची ती हाक ऐकून त्या मेंढपाळणे प्रतिउत्तर दाखल दुसरी हाक मारली…….. “जय रोहिडेश्वर”

आणि दुसऱ्याच क्षणी दोघेही खदखदून हसू लागली…!

खंडेराय त्या मेंढपाळाला बोलला….खेडेबाऱ्याला निरोप द्या…..सांबाच्या पिंडीवर नाग पोहचता झालाय….लौकरच पंचमी खेळायला आवतण धाडतो……असे म्हणत पुनश्च एकदा….”जय मल्हारी…जय रोहिडेश्वर गजर झाला”…..!

खंडेराय दुपारच्या प्रहरी पुन्हा यशवंतमाचीत राजे येसाजी शिर्के यांच्या तालमीत दाखल झाला….”

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.