बाजींद भाग २९

खंडोजी नजरे आड झाला आणि ढगातून सहस्रो जलधारा पृथ्वीवर कोसळू लागल्या..!
पावसाचे पडणारे थेंब सखाराम,सर्जा,नारायण व मल्हारी ला भिजवू लागले…!
पण,आता शरीर भिजले तरी त्याचे काहीच चौघांना वाटत नव्हते,खंडोजी च्या मुखातून रायगड च्या जंगलात घडलेल्या एका अद्भुत अध्यायाचे श्रवण करुन ते चौघेही आकंठ त्यांच्या भूतकाळात भिजून गेले होते…!

अंगावर चांगलाच गारठा वाढू लागला आणि ते चौघेही त्या डोंगराच्या चढणीला लागले होते.
कोणी कोणाबरोबर बोलत नव्हते…निशब्द शांतता.
वरुन कोसळनाऱ्या सरी आणि चढणीने लागलेला दम व त्यामुळे होणारा श्वास उचश्वासाचा आवाज एवढेच ऐकू येत होते…!

सखाराम विचार करत होता की काय अदभूत कथानक घडले खंडोजी च्या आयुष्यात….!
ज्या प्रेमामुळे त्याने कर्तव्यात कसूर केली त्याच प्रेमाच्या आड किती भयानक संकटे येतात…..ज्या बाजींद च्या गूढ ज्ञानाचे आम्हीही दिवाने झालो होतो ते ज्ञान तर बहिर्जी नाईकांच्या पुढे काहीच नाही…आणि असे बहिर्जी नाईक ज्या शिवाजी महाराजांसाठी जीवन सुद्धा ओवाळून टाकत आहेत…ते शिवाजी महाराज कसले असतील….सखाराम विचार करता करता रडू लागला होता….पावसाच्या पाण्यात त्याचे अश्रू वाहून जात होते….मनात मात्र शिवरायांना डोळे भरुन पहायची आस निर्माण झाली होती..!

एव्हाना डोंगराचा चढ संपून पठार लागले आणि समोर पावसात धूसर दिसणारे मंदिराचे शिखर दिसू लागले …मल्हारी बोलला….आरं ते समोर दिसते ते मंदिर बगा आलं….आता ह्यात कोण भेटणार देवालाच ठाऊक बाबांनो…..आज रात्री हितं थांबू आणि उद्या मातूर मागं फिरायचं आता….लय दिस झालं ही दरीखोरी पालथी घालतोय बाबांनो….बास ,मला काय आपण शिवाजी राजांच्या पर्यंत पोचू असं वाटत नाय…..!
त्याचा शब्द मध्येच खोडत सखाराम बोलला….नाय मल्हारी,आता तर महाराजांचं दर्शन घेऊनच जायचं….बस्स काहीही होवो,आपलं काम भलेही न होवो…महाराजांच्या पायावर डोकं टेकवू आन मगच धनगरवाडी गाठू….चला….!

ते सर्व त्या भव्य दगडी मंदिराच्या नंदी समोर उभे राहून आत बघू लागले..!
पावसाने बाहेर पाणीपाणी झाले होते मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात एक मशाल तेवत होती…..!
चौघेही आत गेले….डोके झटकून पाणी हाताने पुसू लागले इतक्यात डोईला मावळी मुंडासे बांधलेला एक वृद्ध माणूस हातात मशाल घेऊन त्या चौघांजवळ आला….त्यांना पाहून त्याने त्यांना विचारले….कोण हाय रं बाबांनो तुमी…इतक्या रात्रीच कसं काय ह्या डोंगरावर…?
वाटसरू हायसा का रस्ता चुकून वर आलायसा….?

त्याच्या प्रश्नाणने सखाराम समोर होत बोलला….म्हातारबा रामराम….आम्ही टकमक धनगरवाडी चे धनगर…गावचे गावकारभारी हावोत….असे म्हणत सगळी हकीकत त्यांनी त्या म्हाताऱ्याला सांगितली व महाराजांना भेटून मदतीची मागणी करायला आम्ही निघालोय असे बोलतो न बोलतो इतक्यात…त्या म्हाताऱ्याच्या मागून 3-4 धिप्पाड मावळे सपासप तलवारी उपसून सामने आले व चौघांच्या नरड्यावर तलवारी रोखल्या…तो वृद्ध माणूस जरा मोठ्या आवाजात बोलला….ए खर सांगा नायतर तुमच्या मुंड्या धडावेगळ्या झाल्या म्हणून समजायच्या…..ह्यो डोंगर सहजा सहजी कोणाला गवसत नाय….इथं यायला कितीतरी गुपीत वाटा पार कराव्या लागत्यात….फक्त आमच्या हेरांनाच या वाटा ठाऊक असतात…बोला तुम्ही कोण नाहीतर सम्पला तुम्ही…!

आधीच डोंगर चढून दमलेल्या त्या चौघांना त्या आकस्मित हल्ल्याने पाचावर धारण बसली…त्या खंडोजीच्या नादाला लागून मरणाच्या दाढेत आलो असे त्यांना वाटू लागले…भीतीने चौघेही काही बोलत नव्हते…..

त्यांच्या गप्प बसण्याने ते मावळे अजून चिडले व चौघांना बेदम हाणू लागले…लाथा बुक्क्याचे प्रहार तोंडावर बसताच चौघेही जिवाच्या आकांताने ओरडू लागले …इतक्यात नारायण ला अचानक खंडोजी चे शब्द आठवले…मंदिरात कोणी भेटले की परवली चा शबुद सांगा…”उंबराच फुल”

एका क्षणात नारायण ओरडू लागला…..उंबराच फुल….उंबराच फुल…..उंबराच फुल….!

तो शब्द कानी पडताच ते धारकरी जाग्यावर थांबले आणि नारायण कडे पाहत विचारु लागले…कोण कोण तुम्ही……?
पुढच्या क्षणी त्या चौघांनी हात जोडून त्या चौघांची माफी मागितली व तो वृद्ध माणूस बोलू लागला….

तुम्हाला अगोदर परवली शब्द सांगायला काय झाले होते ?
बिनकामी जीवानीशी गेला असता…चला आत या….असे म्हणून त्याने चौघांना आत घेतले..!
मंदिराच्या आत असणारी दांनपेटी त्या चौघांपैकी दोन मावळ्यांनी उचलली आणि एक मशालवाला आत उतरला….त्या पेटीच्या आत मधून दगडी पायर्या आत जाणाऱ्या होत्या…!

Bajind bhag 29

त्या चौघांनी सखाराम व त्याच्या साथीदारांना आत उतरवले आणि पेटीची दार लावून एका मागोमाग एक चालू लागले……बराच वेळ चालले आणि आत एका विस्तीर्ण कक्षात पोहचले…!

त्या कक्षात सर्वत्र समई तेवत होत्या,भिंतीवर ढाल तलवारी अडकवल्या होत्या…!
समोर लांबसडक बांबूच्या ठासणीच्या बंदुकीत दारू ठासत एक शिलेदार मग्न होता…
बाजूला एका मंचकावर ठेवलेल्या एका नकाशा भोवती मावळ्यांची बैठक सुरु होती…

सखाराम व त्याचे साथीदार भांभवल्या नजरेने सारे पाहत होते…एका कक्षातून दुसऱ्या कक्षात काही मावळे जडी बुटी कुटून औषध बनवत होते..तर काहींच्या समोर नकली दाढी मिशी..फकीर सन्याश्याची वस्त्रे पडली होती….!

ज्याने सखाराम व त्याच्या साथीदारांना त्या गुहेत गुप्तवाटेने आणले तो वृद्ध माणूस हसत हसत सखाराम ला बोलला….गड्यानो,ही आमची हेरांनी गुप्त जागा.
इथे आम्ही स्वराज्यातील सर्व हेराकडून आलेल्या निरोपाचे पृथकरण करतो व योग्य कारवाई करतो..!
इथून केवळ रायगड नव्हे तर साऱ्या स्वराज्यातील हेरांना काय हवे नको ते पोचवले जाते..!

येड्यानो,परवली शब्द सांगितल्या शिवाय आपले काम होत नाही,हे माहिती असून सुद्धा तुम्ही वेळ केला सांगायला…हकनाक जीव गेला असता कि…तो वृद्ध पुन्हा हसू लागला व ते सर्व चालत पुन्हा एका तिसऱ्या कक्षात वळाले….!

सखाराम ने मनात विचार केला की आपण हेरच आहोत असा बहुतेक सर्वांचा समज झालेला दिसतोय….पण,जर हेर नाही हे कळाले तर पुन्हा मारतील या विचाराने तो गप्प झाला….

त्या कक्षात काही फितूर हरामखोर दगाबाज लोकांना पकडून त्यांना उघडे करुन पट्ट्याच्ने मारले जात होते…आर्ट किंकाळ्या व रक्ताचे डाग याने तो कक्ष हादरुन गेला होता….

भयभीत नजरेने सखाराम ते पाहत त्या वृद्ध माणसाच्या मागे चालत परत दुसऱ्या कक्षात जाऊ लागले…..

त्या कक्षात समोर दोन भालाईत पहारा देत उभा होते…त्यांना पाहून त्या वृद्धांने त्यांना सवाल केला….

वस्ताद काकांना भेटायचे आहे…..नाईकांच्या खासगीतील परवली च्या शबुद घेतल्यात या चौघजनाणी… नाईकांची खास माणसे असावीत…यांचे काही काम आहे महाराजांच्या कडे…वस्ताद काकांना वर्दी द्या…..उंबराच फुल उगवलं आहे….!

त्या पहारेकऱ्यांनी मान हलवली आणि दरवाजा उघडून आत गेले…..आणि काही क्षणात बाहेर आले व सांगितले की त्या चौघांना फक्त आत पाठवा बाकीजन निघून जावा वर मंदिरात…!

जी….असे म्हणत तो वृद्ध मागे फिरला व सखाराम व त्याचे साथीदार त्या कक्षात गेले व बाहेरुन कक्ष बंद केला गेला….!

समईच्या मंद प्रकाशात समोर आई तुळजाभवानीची मूर्ती दिसली…बाजूलाच तलवारी,भाले,बरचें,कट्यारी पूजल्या होत्या….!

वस्ताद काका हात मागे बांधून पाठमोरे उभे होते…त्या चौघांची चाहूल लागताच ते मागे वळाले…..अतिशय धीरगंभीर मुद्रा कल्लेदार मिशा,वार्धक्याने पंढरी पडलेली दाढी पण डोळ्यात विलक्षण तेज…अंगापिंडांने मजबूत असणारी काकांची शरीरयष्टी पाहिली आणि खंडोजीने काकांचे जे वर्णन सांगितले होते त्याची अनुभूती आली…!

रामराम गड्यानो….जय भवानी …असे बोलत काकांनी त्या चौघांना नमस्कार घातला.
त्या चौघांनी पण रामराम घातला.
समोरच्या लाकडी मंचकावर बसायची खून करत काका बोलले….बसून घ्या…..उंबराच फुल कवा कवा तर उगवत आमच्या ठाण्यात…!

सखाराम व ते चौघेही हसू लागले….!

वस्ताद काका बोलले…..बोला मंडळी,काय काम आणले आहे तुम्ही ?
तुम्ही जो परवली चा शब्द घेताय त्या अर्थी तुम्ही बहिर्जी नाईकांच्या एकदम विश्वासातील लोक आहात….शब्द कसा व कोणी दिला हे विचारायचा सुद्धा आमचा हक्क नसतो जेव्हा हा शब्द घेऊन कोणी येतो…!
ज्या अर्थी हा शब्द तुम्ही बोलला,त्याअर्थी कोणतेही कारण न सांगता तुमचे काम केलेच पाहिजे…!

काकांच्या त्या बोलण्याने सखाराम व त्याच्या साथीदारांना कळून चुकले की खंडोजी जे बोलत होता त्यातील शब्द आणि शब्द खरा आहे….एक दीर्घ श्वास घेऊन सखाराम ने सारी कहाणी सांगितली…!

टकमक टोक-कडेलोट-नरभक्षक वाघ-वस्तीवर हल्ले…सर्व काही सांगून फक्त एकदा महाराजांची भेट घडवा अशी विनंती केली…!

काकांनी शांतपणे सर्वकाही ऐकून घेतले आणि मोठा उचश्वास टाकत बोलले….चला,तुमची समस्यां लय मोठी आहे,पण लई पुण्याचे काम आहे हे…तुमची वाडी वस्ती सुखी झाली पाहिजे…उद्या दिवस उगवायला आपण रायगड च्या चित दरवाजातुन गडावर जाऊ..
.!

आता काहीतरी खाऊन झोपी जा…सकाळी भल्या पहाटे निघू…!

सखाराम व त्याच्या मित्रांना आनंद गगनात मावत नव्हता…चार दिवस मरमर चालून इथवर आल्याचे चीज होईल असे वाटत होते आता…खंडोजी ला भेटून त्याच्या पण पायावर डोकं टेकवायच आपण…गावात बोलवून मिरवणूक काढायची त्याची असा विचार करत ते चौघेही झोपी गेले….!

पहाट झाली…हेरांचे ते मुख्य ठाणे मात्र रात्रदिवस जागेच असते.
कोणाला तरी पकडून आणून मारत असत तर कोणी हेर जखमी होऊन उपचाराला येत होता..कोणी भावी योजनांचे,युद्धाचे नियोजन करत होता तर कोणी कपडे काढून व्यायाम करत होता..!

वस्ताद काका व ते चौघे लवकर तयार झाले व त्या कक्षातून निमुळत्या होत गेलेल्या चोरवाटेने बाहेर पडू लागले..!

एका विस्तीर्ण गुहेत ती चोरवाट येऊन संपली..समोरच एक तपस्वी कुबडी घेऊन समाधिस्त झाला आहे असे दिसत होते…त्याच्याकडे पाहत वस्ताद काका बोलले…..जय रोहिडेश्वर….!

काकांच्या त्या आरोळीने समाधीचे ढोंग करुन बसलेला तो हेर जागा झाला व बोलला….जय जय रघुवीर समर्थ….”

आणि दुसऱ्या क्षणी ते दोघेही हसू लागले…!

ती गुहा बाहेरुन खुली होती.
सकाळची कोवळी किरणे गुहेच्या आत येत होती.
उगवणाऱ्या सुर्यनारायणाकडे पाहत वस्ताद काका बोलले…चला फक्त अर्ध्या फर्लांगावर चित दरवाजाच्या हमरस्त्याला आपण लागू….!

ते अवघड कडेकपारी ओलांडून चालत चित दरवाजाजवळ आले.
पाऊस रिमझिम कोसळत होता त्यामुळे वाटेवरचे गस्तीचे पथक दिसले नाही…पण चित दरवाजाजवळ कोणीही दिसत नव्हते..!

काका समोर आले व त्यांनी मोठ्या आवाजात सूचना केली….कोण आहे का ???
दरवाजा खोला…?

हे शब्द कानी पडताच एक धिप्पाड मावळा दरवाज्यावरुन हातात असलेली ठासणीची बंदूक त्या पाच जणांवर रोखत बोलला…..

“खबरदार….पुढे यायचं नाय बिलकुल…बंदूक गच्च भरल्या दारुनं… फुडं ईशीला तर एका डागात ढगात पोचशीला….तुमास्नी एकदाच ईचारतो…परवली चा शबुद सांगा…..जर चुकलासा तर मेलासा… इचार करुन सांगा…..सरळ चित दरवाज्यात येतायसा….बगू सांगा शबुद…..

असे म्हणताच वस्ताद काका हसले व म्हणाले……पौर्णिमेचा चंद्र…..”

बाजींदचा पुढील भाग ३०वा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “बाजींद भाग २९”

  1. Pingback: बाजींद भाग २८ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.