बाजींद भाग ४०

ते मटकन खालीच बसले …..आता मात्र त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता…….!

मनात काहीतरी विचारांचा गोंधळ सुरु झाला त्यांच्या आणि त्यांनी सोबत आणलेल्या शिलेदारांपैकी पाच जणांना आज्ञा केली …..गड्यानो तुम्ही त्वरित रायगड गाठा.

महाराजाच्या खासगीत माझा निरोप पोच करा..

असे म्हणत त्यांनी एकाच्या कानात एक निरोप सांगून त्या पाच जणांना
रायगडी रवाना केले.

आणि सखाराम कडे पाहत तो बोलला…
सखाराम, तुम्हाला ज्या महादेवाच्या मंदिरात सावित्री भेटली तिथे मला घेऊन जाऊ शकाल ?

जी..जी..होय …इथून ४-५ कोसावरच असेल ते मंदिर…चला मी नेतो.

असे बोलताच वस्ताद काकांनी सोबत उरलेल्या पाच धारकांची दोन तुकडीत विभागणी केली.

२ जणांनी इथेच थांबा…सोबत आणलेला भगवा ध्वज एका काठीला बांधून इथेच थांबा..रायगडावरून काही लोक आले तर त्यांना समजायला सोपे जाईल.

आणि उरलेले दोघे….

तुम्ही आमच्यासोबत चला..

असे म्हणत सखाराम व त्याचे सवंगडी,वस्ताद काका आणि दोन धारकरी असे सात जण त्या पडक्या महादेवाच्या मंदिराकडे जाऊ लागले.

मजल दरमजल करत पठारी भाग संपवून सारे त्या भयान जंगलात घुसले.

अनेक वळणे,ओढे नाले ओलांडून जेव्हा या जंगलात प्रवेश झाला तेव्हा ते जंगल पाहताच वस्ताद काका मात्र पुरते घाबरून गेले होते….त्यांची अक्षरशः बोबडी वळण्याची वेळ आली होती….

ते भयकंपित आवाजात बोलले…


सखाराम…..किती दिवस होता तुम्ही या जंगलात ?
आम्ही पुरा एक दिवस एक रात्र याच जंगलात होतो…
काय…?

वस्ताद काका आश्चर्याने बोलले…

वस्ताद काकांची ती अवस्था पाहून सखाराम म्हणाला…

काका,नेमक काय झालंय तुमास्नी…?

आमालाबी कळूदे…

अरे,येड्यानो जिथे तुम्ही मला आणले आहे ते साध सुध जंगल नाही……

हेच ते ‘बाजिंद’ चे जंगल आहे…ज्याला पुरी रायगड पंचक्रोशी स्वप्नात सुध्दा घाबरते.

आणि,जो तुम्हाला खंडोजी म्हणून भेटला……
तो..तो..खंडोजी नव्हताच……

काय..?

सखाराम ने आश्चर्याने डोळे विस्फारत विचारले…

ख..खंडोजी नव्हता…….

मग कोण हुता काका ?

अतिशय गंभीर चेहरा करत वस्ताद काका बोलले…

बहिर्जी नाईक

तुमच्यासोबत चालत येऊन,तुम्हाला रायगडापर्यंत पोहचवून ,आम्हालाही अप्रत्यक्ष संदेश देणारे बहिर्जी नाईकच होते.

उंबर फुल परवली चा शब्द या साली वापरायचा अधिकार महाराज,नाईक या दोघांनाच आहे.

दर साली असे गुप्त शब्द बदलले जातात,यात बदल सुध्दा केवळ बहिर्जीच करतात.

लय पुण्यवान हायसा तुम्ही,आमास्नी वर्ष वर्ष भर ज्यांचे दर्शन दुर्मिळ होते असे आमचे नव्हे तर महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे हेरप्रमुख बहिर्जी नाईक तुमच्यासोबत चालत होते इतके दिवस…

पण,मला प्रश्‍न असा पडला आहे की नाईकांनी तुम्हाला खंडोजी ची कथा कशी काय सांगितली असावी ?

मला,आता याचा उलघडा करायलाच हवा …

म्हणून मला ते मंदिर दाखवा लौकर

असे म्हणून ते सारे पुढे जाताच..
जंगलातील पशु पक्षी किडा कीटकांनी सार्या जंगलात कल्लोळ माजवला.

जंगली जनावरांचे आवाज अतितीव्र होऊ लागले होते ….

वस्ताद काकांच्या तोंडून शब्द बाहेर पडला….

बाजींदचा पुढील भाग ४१ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!