वस्ताद काका तालमीतून झपाझप पावले टाकून निघून गेले.
धना ने अंघोळ करून घरचा रस्ता धरला..!
गावात निशब्द शांतता पसरली होती.
धनाने वडिलांच्या फोटोला नमस्कार केला आंनी आईला विचारले कि ”नरभक्षक” वाघ काय असतो ?
पाटलांचे प्रकरण झाल्यापासून आई व धनात संवाद कमी झाले होते.
आई चुलीपुढे भाकरी करत होती,पदर सावरत म्हणाली कि साधाच वाघ असतोय,पण त्याला शिकार माणसाची करायची चटक लागलेली असते.
माणसाच्या रक्ताला चाटवलेला वाघ म्हणजे नरभक्षक.
नरभक्षक वाघ आणि स्त्रीला सोकावलेला पैलवान ..फार फरक नाही…!
उपाशी मरेल,पण माणूसच खाईल..!
आई सहज बोलून गेली.
या असल्या शब्दाने धनाचा पारा चढला.
चटकन तो उठला आणि म्हणाला …माहित आहे मला माझी चूक झाली आहे,पण चूक माझी एकट्याची नाही,वैताग आलाय तुमच्या सगळ्यांचा ….उठता बसता टोमणे ऐकून….असे म्हणत त्याने उम्बर्याजवळ ठेवलेले कोल्हापुरी पायताण पायात चढवले आणि झपाझपा पावले टाकत घराबाहेर पडला…!
मागोमाग आई त्याला थांबवायला आली,पण तोवर तो बराच दूर गेला होता…!
गावाच्या बाहेर एक भुईकोट किल्ल्याची तटबंदी होती,त्याच्यापलीकडे महादेवाचे मंदिर आणि तलाव असायचा..तिन्हीसांज झाली कि तिकडे कोणी फिरकत नसे.
धना डोके शांत व्हावे म्हणून किल्ल्यावर गेला..!
मावळनारया सूर्याकडे पाहत तो काहीतरी आठवू लागला ..राजलक्ष्मी चे रूप आपसूक त्यांच्या मनात येऊ लागले.
आज जवळपास ३ महिने होत आले ,मनावर दगड ठेवून आपण फक्त कुस्ती-मेहनत करतोय …तिच्या मनाची घालमेल काय होत असेल याची जाणीव धनाला होऊ लागली…आणि सारखे आईचे शब्द आठवू लागले कि नरभक्षक वाघ आणि स्त्रीला सोकावलेला पैलवान ..फार फरक नाही…!
त्या वाघाने तर नाके नऊ आणून सोडले होते ,सारा गाव नव्हे तर पंचक्रोशी हैराण होती.लोक घर सोडायचे बंद झाले होते…पण का कोणास ठाऊक धना त्या वाघाच्या ठिकाणी स्वताला पाहू लागला…!
उपाशी मरेल,पण माणूसच खाईल…!
काहीतरी मनात वादळ सुरु झाले ..बस्स आता दुनिया काहीही म्हणो ,मी राजलक्ष्मी कडे जाणारच ,निश्चयी मुद्रेने तो उठला ..जायला निघणार तितक्यात तळ्याच्या बाजूने काहीतरी चमकले..!
धनाच्या अंगावर भीतीने शहारे आले,हृदयाचा आवेग वाढला ..काय होते ते ?
आसपास हाक जरी मारली तरी कोस भर तरी कोणी नव्हते अशी स्थिती…!
धनाने सावध पवित्रा घेतला ….आणि पडक्या किल्ल्याच्या खाली असलेल्या वडाच्या झाडाखालच्या डोलीत दबा धरला ..आणि ते काय आहे याचा मागोवा घेण्यास सुरवात केली …….!
एक क्षण..दोन क्षण…. प्रचंड डरकारी फुटली आणि वडावरच्या पाखरांनी एकच कल्लोळ माजवला ….सूर्य अस्ताला जावून संधीप्रकाश रेंगाळत होता,आणि त्या संधीप्रकाश्याच्या सोनेरी किरणात ते वाघाचे प्रचंड धूड राजबिंड्या तालात चालत चालत वडाकडे येत होते ……..,,
धनाच्या मनात भीतीने थैमान घातले.
रागाच्या भरात हे काय करून बसलो आपण…गावापासून एवढ्या लांब आलो,आता आपले मरण नक्की …!
गावात धनाच्या आईने वस्ताद काकांच्या घरी जाऊन हकीकत सांगितली.धना रागाने बाहेर गेलाय,कुठे ते माहिती नाही ….मला काळजी वाटते..!
वास्तदानी तालमीतील पोराना भाले,बर्चे घेऊन बोलावले होतेच..!
३-३ जणांचा गट करून हातात मशाली घेऊन चारी बाजूला पोर पाठवली..आणि धावत ते पाटलांच्या वाड्यात गेले..!
पाटील नुकतेच जेवण आटोपून सदरेवर पान खात होते..!
घडलेला प्रकार त्यानी सांगितला आणि पाटील उभे राहिले..!
घरातील नोकराना बंदूक आणण्याचे आदेश दिले आणि घोडा तयार करून सोबत २० एक तरुण नोकर घेऊन पाटील स्वता धनाच्या शोधार्थ बाहेर पडायला निघाले..!
वरच्या मजल्यावर राजलक्ष्मी हा प्रकार पाहत होती.
तिच्या अश्रुनी एकदम बांध फोडला ,तिला काय करावे समजेना..!
तिचे मन एकसारखे धनाच्या भेटीसाठी आतुर झाले.
तिला कधीएकदा धनाजी ला मिठी मारावी असे झाले होते…!
पाटील गेले आणि वाड्यात शुकशुकाट झाला ……!
इकडे किल्ल्याच्या खाली असलेल्या वडाच्या परिसरात एका थरारनाट्याला सुरवात होणार होते..!
धना सावध होवून झपाझप पावले टाकत येणार्या वाघाकडे पाहू लागला,वाघाला आधीच माणसाचा वास लागलाच होता ,म्हणून तर तो तलावाचे प्रचंड पात्र पोहून अलीकडे आला होता …!
धनाजी ने खांद्यावरचा शेला कमरेला बांधला …वडाच्या खाली पडलेल्या मजबूत काठ्यापैकी एक काठी कानाच्या उंचीची करत तोडली …आणि डोळे बंद करून हनुमंताचे स्मरण केले …!
हनुमंता .आता जगेन असे वाटत नाही….पण माझ्या आयुष्यात मी खूप चुकलो…प्रेमासाठी घरची,गावची,इज्जत घालवली..आणि मुर्खपनाने प्रेम सुध्दा घालवायला निघालो होतो..मला क्षमा कर….”
धनाने डोळे उघडले आणि वडाच्या पारंबीला धरत सरसर वर चढून एका मजबूत फांदीवर जावून बसला ….किर्र रात्र वाढत होती…दिवस थंडीचे होते पण प्रसंग असा होता कि घामाच्या धारा सुरु होत्या…….!
नख्यांचा आवाज वाढू लागला…..ते जातीवंत जनावर समोर दिसू लागले…!
सोन्याच्या कोंदणात होरे बसवावेत तसे चमकणारे डोळे,एखाद्या राजपुरुशासारख्या मिशा….अंगावर पिवळे-काळे पट्टे आणि आपल्या अजस्त्र सुळ्यानी पहाड सुध्दा उचलायची ताकत असलेला जबडा ..हे कमीच कि काय तोवर मागे आकाशपाताळ दणाणून सोडणारी डरकाळी फुटली …….आसपासचे अणुरेणु सुध्दा शहारले……………..!
हि डरकाळी सार्या गावाला ऐकू गेली….गस्त घालणारी जवान पोर पायाला भिंगरी बांधावी तशी हत्यारे पेलीत किल्ल्याकडे दौडू लागली…!
वाघाने धनाला हेरले …त्याने प्रचंड चीड व्यक्त करत वडाच्या बाजूला असणार्या प्रचंड दगडावर आपली मांड उभी केली ….बस्स आता एक झेप आणि धना संपणार होता ..बरोब्बर एका झेपेत धना सावज होणार एवढे अंतर उरले होते..!
धना एकसारखा वाघाच्या डोळ्यात पाहत होता …भीतीने हृद्य आत्तापर्यंत थरथर कापत होते ..पण क्षणात त्याला राजलक्ष्मी चा चेहरा आठवला.
अगदी काहीच वेळापूर्वी त्याने निश्चय केला होता कि तिला भेटायचे ..पण नशिबाने वाघाच्या रूपाने यामालाच पुढे उभे केले होते ….!
डोक्यात एक अजब वीरश्री उठली ,बाहू थरारून उठले …मनगटे शिवशिवू लागली आणि धना फांदीवर उभाच राहिला,……..!
वाघ हे पाहत होता…..नुकताच चंद्रोदय सुरु होत होता,चंद्रच्या निळसर प्रकाश्यात धनाचे ते अजस्त्र बाहू आणि हातात काठी…जणू काही शिलेदार वाटत होता ….!
धनाला काय झाले त्यालाही कळत नव्हते ….बस्स आता या वाघाशी चार हात करायचे ..मारायचे किंवा मरायचे…!
वाघाने हल्ल्याचा पवित्रा घेतला…धना सावध झाला ….एक क्षण आणि दुसर्या क्षणात वाघाची झेप फादिजवळ आली आणि धनाने पूर्ण ताकद पणाला लावत काठीचा प्रहार वाघाच्या डोळ्यावर केला…..धनाचा प्रहार,वाघाची झेप याने कडाडकड आवाज करत फांदी तुटली आणि ७-८ फुट जमिनीवर पडली….आणि त्या बरोबर ते दोन वाघही जमिनीवर पडले ….पडताच सावध होऊन पायावर उभे राहिले …….!
वाघ गुरगुरत होता…धनाची छाती लोहाराच्या भात्यासारखी फुरफुरत होती……!
वाघाने पुन्हा झेप घेतली..धनाने काठीचा प्रहार केला मात्र काठी तुटली …!
आता ?
आता केवळ हात…आता ताकत बाहुबलाची…आणि मर्जी हनुमंताची!
धना पक्का पैलवान होता..!
कुस्ती-हि प्राण्यांच्या पासूनच निर्माण झाली आहे..!
पूर्वी हिंस्त्र श्वापद यापासून केवळ कुस्ती करूनच सुटका व्हायची,काळाच्या ओघात हे आपण विसरलो मात्र धनाच्या नशिबी इतिहास पुनरावृत्ती करत होता..!
वाघाच्या अनुकुचीदार नखांनी धनाच्या हातावर,दंडावर,मांडीवर वर्मी जखमा झाल्या होत्या ..रक्ताचे पाट सुरु झाले होते..पण आता जीवात जीव असेपर्यंत माघार नव्हती…!
दुसरीकडे पाटील आणि त्यांचा लवाजमा घोड्यावर स्वार होत किल्ल्याच्या पायथ्याला आला आणि मागोमाग पोरांचे शस्त्रपथक.
धनाच्या आरोळ्या आणि वाघाची डरकाळी यांनी आसमंत दुमदुमला होता …!
धना रक्ताने लालभडक झाला होता ….वाघाने एक निकाली झेप टाकली मात्र धनाने नेहमीप्रमाणे बगल डूब करत पाठीवर कब्जा घेतला..हे सारे जवळपास अर्धा तास सुरु होते ….हि कुस्ती माणूस आणि वाघ यांच्यातील वाटतच नव्हती…जणू दोन वाघ लढत आहेत असे वाटत होते.
हे दृश्य पाहताच पाटलांची पाचावर धारण बसली….त्यानी निमिषात काडतूस भरलेली बंदूक काढली आणि हवेत २ फैरी झाडल्या…….गोळीचा आवाज ऐकून सारा गाव किल्ल्याकडे धावू लागला …!
धना आणि वाघ दोघात किमान ५-६ फुट अंतर होते,मात्र पाटील निशाणा साधू शकत नव्हते..जर नेम चुकला तर धनाचा जीव जाण्याची शक्यता होती….!
जुमाणून अजून दोन बार हवेत काढले तेव्हा मात्र वाघाला जाणीव झाली कि आता एकापेक्षा जास्त माणसे जमा होत आहेत …..त्याने एक शेवटचा पंजा धनावर उगारला मात्र नेहमीप्रमाणे धनाने तोड काढत हुकवला आणि क्षणात वाघाचा हात धरत जोरात त्याला फिरवला….वाघ बाजूच्या दगडावर आपटला…आणि क्षणात धनाने बाजूला पडलेल्या दगडाने वाघाच्या बरोबर नाकावर वर्मी प्रहार केला…
वाघाचा पूर्ण विरोध मावळला आणि तो धडपडत जीव वाचवत तलावाकडे पळू लागला……
हे पाहताच धनाने अंगात उरलेल्या शक्तीने पुन्हा दगड घेत वाघाच्या डोक्यावर मारला …डोक्यातून रक्ताचा कारंजा वाहू लागला…धना लंगडत लंगडत वाघापाशी आला आणि एक मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला…..
तितक्यात सारा गाव किल्ल्याच्या पाय्थायाला जमा झाला होता …..
वाघाचा अंत करत धना सार्या गावाकडे रक्तबंबाळ अवस्थेत पाहत होता …!
पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: धना भाग ०२ dhana bhag 02 —