धना भाग ०५

पाटील आणि वस्ताद गावाकडे आले.


वाड्यावर समजले कि वन अधिकारी गावात पोहचले आहेत.


पाटलांनी त्वरीत काही समान त्यांच्यासाठी पाठवून दिले ,काही नोकर सेवेला दिले आणि उद्या सकाळी भेटूया असा निरोप दिला..!
दुसरा दिवस उजाडला.


सूर्याजीराव सकाळी उठून गावात आले.पाटलांनी अगत्यपूर्वक त्यांचे स्वागत केले.


घडलेली सर्व हकीकत कथन केली.सूर्याजी बोलला कि सकाळी वाघाचे पार्थिव जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले आहे ,पण कारण काय द्यावे यासाठी अजून पंचनामा रिपोर्ट केला नाही .


जर धना ने वाघ मारला असे लिहिले तर धना दोशी ठरतो,न लिहावे तर आमच्यावर सुध्दा तपास सुरु होऊ शकतो ,तुम्हीच सांगावे काय करावे ?


यावर पाटलानी वाघाची दहशत कशी होती ते सांगितले.


आसपास च्या वाड्यावस्त्यावरून ३ माणसे आणि १ लहान मुलगा वाघाने मारला होता.


जर धनाने त्याला मारला नसते तर धना नक्कीच त्याच्या हातून मेला असता.


धनाची मोठी कुस्ती आहे येत्या ३-४ महिन्यात ,एवढे सर्व असून धनाने वाघाशी चार हात केले ..आता तुम्हीच ठरवा काय करायचे …?
सूर्याजी ने होकारार्थी मान हलवली ,त्याच्या मनात वेगळीच घालमेल होती.


त्याने नजर वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेली आणि कालचा चेहरा दिसतो का ते पाहू लागला ,पण काही नजरेस पडले नाही..!
वस्ताद म्हणाले धनाची कुस्ती हि केवळ त्याची कुस्ती नाही तर सगळ्या गावाची आणि पंचक्रोशीची इज्जत आहे.


आमच्या गावात जन्माला येणारा मुलगा हा हनुमंताचा आशीर्वाद म्हणून तालमीत पाठवतो,आमच्या घराघरात पैलवान आहेत ,मात्र त्या बिल्ला शी टक्कर घेण्याची हिम्मत फक्त माझ्या धनात होती म्हणत वस्ताद रडू लागले.!


सुर्याजीचे मन मनस्वी दुखी झाले ..त्याला त्याचा भूतकाळ आठवू लागला.
सुर्याजीचे घराणे सुध्दा फार मोठे मल्लविद्येचे उपासक होते.


संध्याकाळी भेटू असे बोलून सूर्याजी गाडीत बसला आणि गाडी तलावाकडे जाऊ लागली,तसे सूर्याजीची विचारचक्रे सुरु झाली ………,
फार फार तर ५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती ,सूर्याजी सातारा जिल्ह्यातील जाधववाडी या प्रतिष्ठीत गावाचा मल्ल.या गावाच्या आसपास १२ वाड्या होत्या,त्यात जाधव वाडी हे मोठे गाव.


या गावातील जाधव मंडळी शिवाजी महाराजांच्या फौजेतील मातब्बर सरदार घराण्यातील होय,त्यामुळे सार्या गावाला कुस्तीचे वेड असायचे.
सूर्याजी बालोपासानेच्या संस्कारात मोठा झाला होता.


तारुण्यात पदार्पण करताना त्याची कुस्तीची जोड सुध्दा चांगलीच वाढली होती.
भागात त्याचे चांगले नाव झाले होते.


धनाचे घर म्हणजे पंचक्रोशीत अतिशय प्रतिष्ठेचे होते.माळकरी घराणे.वडील जुन्या काळचे गाजलेले पैलवान ,चुलते सैन्यात देशसेवा करायचे आणि सूर्याजी भागातील नामांकित मल्ल.काही कमी नव्हते घरात…!


पण सूर्याजी ने एक चूक केली.
शेजारच्या गावच्या देशमुखवाडी च्या देशमुख घराण्यातील मुलीशी प्रेम केले होते.
देशमुख आणि जाधव मंडळींचे पिढ्यानपिढ्यांचे वैर होते.


अशी पिढी जात नव्हती कि एकमेकांचे खून पडले नव्हते.कित्येक पिढीचा केवळ खुनाचा इतिहास असणारे गाव..!


सूर्याजी आणि देशमुख यांची मुलगी सुवर्णा यांचे प्रेम हळूहळू सुर्याजीच्या वडिलांच्या कानावर गेले,वडील फार चिडले ,ते म्हणाले तुझी हि चूक दोन्ही गावच्या रक्तरंजित कारकिर्दीला फाटा फोडेल,भावनेला आवर घाल नाहीतर सार्या गावाच्या हातात पुन्हा हत्यारे येतील …!
सूर्याजीने मनावर ताबा ठेवला ,आणि एक दिवस नदीवर अंघोळीला गेला असता ,सुवर्णा त्याला भेटायला आली ,तिने सांगितले कि माझे लग्न ठरले आहे.


तू जर मला लग्न करून नेले नाहीस तर मी जीव देईन..!
सूर्याजी द्विधा मनस्थितीत होता.काय करावे सुचेना.


जर सुवर्णा ला पळवून न्यायची म्हटले तर अवघड नव्हते ,पण परत दोन्ही गावात मुडदे पडणार हे नक्की,आणि न न्यावे तर सुवर्णा काय करू शकते हे तो चांगलेच जाणून होता…!


सूर्याजी ने धाडस करायचे ठरवले.
सुर्याजीच्या १२ वाड्यात एक अशी असामी होती ज्यांचा शब्द आसपासचे १२ गावे कधीच टाळत नसे..!


अनेक मल्लांचे ते आश्रयदाते होते..!
जुन्या काळचे नामांकित मल्ल.
एक प्रगतशील शेतकरी.
जिल्ह्यातील कलेक्टर,पोलीस सर्व त्यांच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय कामावर रुजू होत नसायचे..!
पै.रामचंद्रराव भोसले दादा ..!
सूर्याजीने धाडस करून त्यांचा वाडा गाठला.


मागच्याच यात्रेच्या मैदानात सूर्याजीने केलेल्या कुस्तीवर खुश होऊन रामचंद्र दादांनी त्याला चांदीचे कडे बक्षीस दिले होते..!
सूर्याजीने दादाना भेटून,हा प्रकार सांगितला..!
दादा संतापले ,बोलले कि तुला जिल्ह्याचा मोठा पैलवान व्हायचे स्वप्न आम्ही पाहतोय,आणि तू अश्या क्षुल्लक गोष्टीत मन अडकवून बसला आहे ?
तुझा वडील,आजोबा काय पात्रतेचे आहेत आणि तू ?


काही वेळाने रामचंद्र दादा शांत झाले आणि म्हणाले कि ठीक आहे ,पण माझे एक अट असेल यासाठी ..!
येत्या दसर्याला १२ वाड्यात आपली फार मोठी कुस्ती दंगल असते,त्यात मानाची कुस्ती असते पंजाबी मल्लासोबत, ती तुला जिंकावी लागेल.


ती जिंकलीस कि तुझे लग्न मी माझ्या हाताने लावून देईन …!
सूर्याजी ने एका क्षणात होकार दिला.

\
दादांनी दुसर्याच दिवशी जाधव आणि देशमुख मंडळी बोलावून घेतली.
सारा प्रकार सांगितला ,देशमुखांच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या पण दादांच्या पुढे नाईलाज होता..!
दादा बोलले या कुस्तीमुळे सोयरिक होईल आणि २ गावाचे वैर कायमचे मिटेल..!


देशमुख हे ऐकून थोडे शांत झाले आणि गावाच्या भल्यासाठी हि अट मंजूर केली..!
पण ,मनात जाधवांचे वैर काही कमी होत नव्हते.


तशी बोलणी झाली आणि विडा मागवून बोलणी पक्की झाली.
सुवर्ण आणि सूर्याजी दोघेही खुश होते,सारा गाव खुश होता..!


यात्रेचा दिवस जवळ येत होता आणि सूर्याजीने तहान भूक विसरून सारे लक्ष केवळ कुस्तीकडे दिले होते.
कसून सराव ,कुस्ती-मेहनत सुरु होती..!
इकडे सुवर्णा लग्नाची रेशमी स्वप्ने रंगवत होती..!
दोन्ही गावातील वैर अनेक पिढ्यांनी संपणार होते..!
सारे खुश होते …..!


यात्रेचा दिवस जवळ आला.
गाव यात्रा पालानी गजबजून गेला ,ग्राम दैवत भैरवनाथ मंदिरावर नवीन रंग चढले,पालख्या सजल्या,बैलाना झूल चढवली गेली..!
कुस्तीसार्खाच बैलांच्या शर्यतीचा प्रचंड नाद होता गावाला..!


१२ वाड्यातील लोक मोठ्या आनंदाने घरात एक मल्ल आणि एक बैलजोडी तयार करत होते…!
यात्रेचा मुख्य दिवस उजाडला,सूर्याजीची तयारी पूर्ण झाली होती.
सकाळी सुर्याजे नदीवर अंघोळीला गेला आणि पलीकडून कोणीतरी पोहत येत होते असे दिसले ..!
देशमुखांचा तो नोकर होता.
सुवर्णाने तो निरोप पाठवला होता.


त्याने निरोप आणला होता ,पैलवान,देशमुख दगा करणार आहेत.ऐन कुस्त्यावेळी एका कर्नाटक च्या दरवेशा कडून २ वाघ आणून ठेवले आहेत ,१० दिवस उपाशी आहेत ते ,जेव्हा तुमची कुस्ती होईल तेव्हा ते वाघ तुमच्या अंगावर सोडणार आहेत..!
सुर्याजीच्या मस्तकात फुटाणे उडू लागले.


सारी हकीकत तालमीतील दोस्त मंडळींच्या कानावर घातली.
पोर म्हणाली आम्ही कुर्हाडी घेऊन कुस्त्याला येतो,वाघ सोडू दे नाहीतर प्रत्यक्ष यम येउदे..तुझ्या अंगावर येण्याआधी खांडोळी करू…आणि मग सुवर्णाला उचलून गावात आणू…मग बेहत्तर जीव गेला तरी..


दुपार टाळून गेली…सार्या गावात आनंदाचे वातावरण होते ,मात्र खरी हकीकत फक्त पैलवानांच ठाऊक होती..!


जिथे कुस्त्या होणार होत्या तिथे बैलगाडीत घालून पिंजरा आधीच आणून ठेवला होता ,त्यावर पाला टाकून तो लपवला होता ,त्यात २ नरभक्षक वाघ आणून ठेवले होते .उद्देश हा कि कुस्ती झाली कि सूर्याजी थकलेला असणार ,पंजाबी पैलवानाला संरक्षण द्यायचे आणि २ वाघ सुर्याजीवर सोडायचे …सूर्याजी ठार होईल..आणि कोणाला शंकाही येणार नाही कि हा दगा आहे ते..!


देशमुखांचे ते विषारी विचार सुवर्णाने ऐकले होते आणि तिने भल्या पाहटे एक नोकर नदीवर निरोप द्यायला धाडला होता.
इकडे सुर्याजीच्या पैलवान पोरांनी हत्यारे लपवून घेतली होती.
सर्व काही ठरले होते.


गावाने वाजत गाजत कुस्तीच्या ठिकाणी सूर्याजीला आणले होते..!


इकडे सुवर्णाचा जीव घालमेल होऊ लागला होता ,ती वेड्यासारखी काही मैत्रीणीना घेऊन कुस्त्याच्या ठिकाणी यायला निघाली …
प्रचंड गर्दीने सुवर्णाला काहीच दिसत नव्हते ,तिने सूर्याजीला पाहिले.


सूर्याजी कपडे काढून शड्डू ठोकत होता..!


इकडे बैलगाडीतून आणलेले पिंजरे काही नोकर कुस्तीच्या बाजूला नेत होते तेवढ्यात पिंजर्याचे दार उघडे झाले,चुकून कोयंडा निसटला होता…!


ते २ चवताळलेले उपाशी वाघ प्रचंड डरकाळी फोडत बाहेर पडले.


त्यांची डरकाळी पाहून कुस्त्याला जमलेले प्रेक्षक पळू लागले ,मैदान मोडले..!
सूर्याजीला समजेना काय झालय …!


सुवर्णाला सुध्दा काय समजेना कुठे जावे ,ती नदीकडे धावू लागली..!


सुर्याजीच्या मित्रांनी सुवर्णा नदीकडे धावताना पाहिले.


त्यांनी सूर्याजीला घेऊन नदीकडे जायला निघाले तेवढ्यात २ वाघापैकी एका वाघाने सुवर्णा एकटीच नदीकडे धावताना पाहिले आणि तिचा पाठलाग सुरु केला.!


हे पाहून पैलवान पोरांनी हत्यारे उपसली आणि मागोमाग धावू लागले…!


सारा गाव धडपडत पळत होता,कोण कोणाला धडकून पडत होते तर कोणी नुसतेच धावत होते …!


सूर्याजीने सुवर्णाला हाक मारली ..आणि क्षणात सुवर्णाने मागे वळून पाहिले..!


पाहते तर काही फुटावर ते वाघाचे प्रचंड धूड तिच्या मागावर होते ….ती जीवाच्या आकांताने पळू लागली ….आणि एका झेपेत त्या वाघाने सुवर्णाच्या मानेचा वेध घेतला आणि तिला ओढत ओढत बाजूच्या जंगल जाळीत नेले …!


सुर्याजीच्या हृदयाचा ठोका चुकला..!
त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले ,धीर खचला आणि तो सुसाट धावत सुटला..!


तो एकटाच जंगलात घुसला ..वाटेत सुवर्णाचे फाटलेले कपडे,पडलेले रक्त पाहून त्याचे काळीज फाटत होते …!
मध्यरात्र होत आली तरी सुवर्णा सापडली नाही.


पैलवान मित्रांनी सूर्याजीला धीर देत गावात आणले…!
सुर्याजी चे रडून रडून डोळे सुजले ..सारा गाव शोक करत होता..!


हे मोठे दुख कसे पचवावे …कधीकधी आत्महत्या करून घेऊ वाटत होती पण सुवर्णाचे डोळे त्याला आठवायचे ….!
शेवटी रामचंद्र दादांनी जिल्ह्याच्या मंत्र्याना सांगून सूर्याजीला वन अधिकारी केले आणि सूर्याजी हळूहळू ते दुख विसरून कोल्हापूर जिल्ह्यात सेवेसाठी आला …!

सूर्याजी गाडीतून जात सारे आठवत होता ,तेवढ्यात तलावाच्या ठिकाणी केलेली छावणी आल्याची जाणीव झाली,त्याने डोळे पुसले ..!
गाडीतून पाय खाली ठेवला..बंदूक सावरली …!!

क्रमश

धन्यवाद

कल्पना,लेखन,शब्दांकन

पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “धना भाग ०५”

  1. Pingback: धना भाग ०४ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!