धनाला बेशुध्द करून ते धिप्पाड गडी मोटारगाडीतून सह्याद्रीचा अवघड घाट ओलांडून शहरापासून खूप दूर एका गुहेजवळ थांबले..!
गाडीतून धनाला काढले आणि मोटारगाडी दूर निघून गेली.
बाहेर पावसाने थैमान घातले होते.विजा आणि पाऊस यांचा खेळ सुरु होता.
२०/२५ धिप्पाड गडी आणि त्यांचा उंचापुरा आणि बलदंड ताकतीचा म्होरक्या चालू लागले.
प्रत्येकाच्या हातात बंदुका आणि कमरेला धारधार शस्त्रे अडकवली होती..!
ते गुहेत चालु लागले ,अंधार्या गुहेत पुढचे दिसत नव्हते ,तरीही त्या लोकाना गुहेचा अंदाज होताच ..जवळ जवळ १५ मिनिटे चालल्या नंतर गुहेच्या उजव्या अंगाला एक जेमतेम माणूस जाईल एवढा बोगदा पडला होता,त्या बोगद्यातून ते गडी निघाले…!
बोगदा पार करताच प्रचंड जंगल जाळी,निसरडी पायवाट आणि वरून धो धो पडणारा पाउस आणि अधूनमधून चमकणारी वीज..!
सारेच भयानक .!
या एवढ्या किचकट वाटेने जायचे धाडस साक्षात यम सुध्दा करणार नव्हता..!
जवळजवळ १ तासभर चालल्यावर पठारी भाग लागला.
आणि लवकरच त्या जंगलात तोंडाला काळा शेला बांधलेले अजून २-३ हात्यारबंद लोक आडवे आले आणि त्यानी त्या कपड्यात गुंडाळून आणलेल्या धना ला आपल्या हाती घेतले आणि पुढे चालू लागली…!
चारी बाजूनी प्रचंड प्रचंड डोंगर,आसपास दाट दाट जंगलजाळी आणि मध्येच पठारी भागात एका प्राचीन किल्ल्यात धना ला नेण्यात आले..!
आत प्रवेश करताच जवळपास हजार एक धिप्पाड लोक हात्यात हत्यारे घेऊन,जणूकाही धनाचीच वाट पाहत होती..!
ज्याने धनाला उचलून आणला तो धिप्पाड युवक हा त्या सार्या लोकांचा सेनापती होता,त्याला पाहताच सारे लोक मुजरे झडू लागले…!
धनाला एका सुरक्षित गुहेत नेण्यात आले.तिथे काही वैद्य बोलावून आणले होते.
सेनापती नी धनाला उपचार सुरु करायची विनंती केली..!
गुहेत अग्नीची शेकोटी पेटवली गेली..!
त्या सेनापतीने धीरगंभीर आवाजात बाजूला उभे असलेल्या एका गड्याला आवाज दिला …. राजांना बातमी द्या..धनाजीरावाना सहीसलामत आणून खलबतखाण्यात ठेवले आहे..!
तो सेवक मुजरा करत ..निघून गेला …!
एव्हाना तांबडे फुटले होते..!
धनाच्या जखमा लेप लावून बांधल्या होत्या,त्याला गाढ झोप लागली होती..!
सेनापती सुध्दा त्यांच्या कामाला निघून गेले…!
सूर्य चांगलाच डोक्यावर आल्यावर धनाला जाग आली..!
डोळे उघडताच समोर त्याला कालीमाता देवीची प्रचंड मूर्ती दिसली.
बाजूला प्रचंड अग्नी पेटवले होते..!
भिंतीच्या चिर्यावर ढाला-तलवारी आणि बंदुका अडकवल्या होत्या..!
जवळच ३-४ धिप्पाड हशम धना कधी जागा होतो याची वाट पाहत होते..!
धना जागा झाला,त्याला आठवले कि आपल्याला उचलून आणण्यात आले आहे.
तो तडकन उठला,मात्र जखमांच्या वेदना त्याला जाणवल्या …!
निर्धारी आवाजात तो म्हणाला,…..अरे कोण तुम्ही …पाठीमागून काय हमाला करता माझ्यावर …हिम्मत असेल तर आत्ता या घडीला सामोरे या म्हणत धना उठून उभा राहिला……!
त्या २ हशमानी धनाला मुजरा केला ,हे पाहताच धना थक्क झाला..!
तो म्हणाला मला मुजरा का करत आहात ?
मी कुठे आहे सध्या …!
एक हशम बोलला ..धनाजीराव आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या ऐन पोटात असलेल्या एका नगरीत आहात.!
महाराज यशवंतराव हे आमचे राजे आहेत ,आपण आमचे खास पाहुणे आहात.
काही क्षणात सेनापती येऊन आपल्याला सर्व सांगतील ..आपण चिंता सोडून बसावे..!
धना ला हे प्रकरण समजेना …त्याने पुढे होऊन त्या दोघाना ढकलून बाहेर जायचा प्रयत्न सुरु केला ..तितक्यात एका वीराने धनाजीला जोरात ढकलून दिले .पैलवान..तुम्ही जखमी आहात..कुस्तीची खुमखुमी तुम्ही बरे झाल्यावर आम्ही सारे पाहू ..आता गप्प बसा..असे म्हणत त्यातील एकजण सेनापती ला वर्दी द्यायला निघून गेला…!
इकडे इस्पितळात पोलिसांनी एकच गर्दी केली होती.
धना अर्धरात्री कसा काय गायब झाला ?
धनाच्या आईने तर एकच हंबरडा फोडला होता ,बघता बघता हि बातमी वार्यासारखी धनाच्या गावात राजलक्ष्मी पर्यंत पोहचली.
तिच्या काळजाने तर ठावच सोडला,अश्रुंचा बांध फुटला.
देवाला एकसारखी विनवणी करू लागली ..देवा माझ्याच नशिबी हे दुख का देत आहेस….
आधी ताटातूट ..परत त्यांच्या जीवाशी खेळ आणि आतातर ते गायबच केलेस ….तिने रडून आकांत सुरु केला..!
गावाचे पाटील,वस्ताद सारे शहराकडे धावले..!
जिल्ह्याचे कलेक्टर ,पोलीस सारे सारे तिथे धावले.
गेल्या ४-५ दिवसात धना हे प्रकरण सार्या जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहित झाले होते..!
प्रत्येकाला ओढ होती धना असा अचानक कुठे गेला असावा ?
पोलिसांनी नाकेबंदी सुरु केली..!
सार्या इस्पितळाला छावणीचे रूप आले होते…!
इकडे सेनापती खलबतखाण्यात हजर झाले …!
त्याना पाहून धना उठू लागला ,धनाला झोपून रहा अशी विनंती केली आणि बाजूला उभे असणारे पहारेकरी व वैद्यांना बाहेर जावून बाहेरून दार बंद करायची आज्ञा केली..!
धनाजीराव..माझे नाव सम्राट ..!
मी यशवंतराव महाराजांच्या फौजेचा सेनापती ..!
तुझ्या मनात खूप प्रश्न पडले असतील…कि मी कुठे आहे ?
मला इथे का आणले ?
हे सारे लोक कोण ?
या सार्यांची उत्तरे तुला मी देणार आहे ….लक्ष देवून ऐक..!
धनाजी उठून बसला होता..नक्कीच त्याच्या मनात हे प्रश्न होतेच..!
धनाजीराव …देश स्वतंत्र होऊन जवळपास १० वर्षे झाली आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी यशवंतराव महाराज आणि तुझ्या वडिलांनी म्हणजे उदयसिंग सरनौबत यांनी मिळून या फौजेची बांधणी केली होती.
उद्देश होता ,देशाला स्वतंत्र करणे आणि छत्रपती शिवाजीमहाराजांचा आदर्श समोर ठेवत देशाचा कारभार करणे..!
यशवंत महाराज हे पिढीजात श्रीमंत होते.हिर्यांची खान होती त्यांच्या वडिलांची,पण देशभक्तीच्या या वणव्यात त्यानी सर्वस्व सोडले होते.
तुझे वडील महाराष्ट्राचे नामांकित मल्ल होते.महाराष्ट्र नव्हे तर भारतात असा पैलवान त्यांनी ठेवला नाही कि ज्याला त्यानी चीत केले नाही.
पण पिढ्यानपिढ्या देशभक्तीची परंपरा होती,अशी पिढी जात नव्हती कि ज्यात एखादा वीर फासावर चढत नव्हता,देशासाठी आपला जीव देत नव्हता..!
त्यानी शसस्त्र मल्लांची बांधणी वयाची अगदी १६ व्या वर्षापासूनच सुरु केली होती.
देशासाठी जे आजन्म ब्रम्हचारी राहतील असे एक एक वीर त्यानी सार्या महाराष्ट्रातून शोधून त्यानी हे सारे उभे केले होते….!
पण,आयुष्यात ते एक चूक करून बसले होते.
सातारा च्या एका नामांकित गावाच्या कुस्तीला गेले असता,तिथल्या एका प्रतिष्टीत घराण्यातील मुलीशी त्यांचे प्रेम जुळले..!
प्रेमात ते इतके वाहत गेले कि त्याना उभे केलेले हे साम्राज्य याचा विसर पडला.
सार्या हिंदुस्थानाला हेवा वाटावा असे काम केले मात्र ऐन तारुण्यात त्यांचा पाय घसरला…!
पण,वास्तदांचे मन फार कठोर आणि चिवट होते.
जशी चूक केली तशी त्याची फळे त्यांनी भोगली…!
तुझ्या आईशी रीतसर लग्न करून त्यानी संसार करायचा निर्णय घेत फौजेतून राजीनामा दिला.
त्यानी यशवंतराव महाराजांच्या हाती सर्व फौजेची सूत्रे देत यातून बाहेर पडले.
आणि लग्न करून स्थिर झाले…पण मनातील देशभक्तीची आग काही केल्या गप्प बसू देत नव्हती आणि एके दिवशी तुझ्या गावाच्या पाटलाने इंग्रजी सरकारला क्रांतिकारकांच्या गुप्त बातम्या दिल्या त्यामुळे त्याची कागाळी यशवंतराव महाराजांच्या कानावर आली..!
एका रात्रीत आम्ही सारे तुझ्या गावात घुसलो,तळ्याच्या पलीकडून पोहत आम्ही गावात आलो,आणि पाटलांच्या वाड्यात घुसणार तितक्यात तुझे वडील त्याच गावात आम्हास दिसले..!
तुझे वडील आणि यशवंतराव तळ्याशेजारी असलेल्या महादेव मंदिरात भेटले.
वडिलांनी सांगितले कि यशवंता ,काही केल्या माझी देशासाठी मरायची भूक काही कमी नाही झाली,पण आता संसारात अडकलो,एक मुलगाही झाला आहे.
कसा बाहेर पडू?
यावर महाराज म्हणाले वस्ताद,तुम्ही घातलेली शिस्त आम्ही कधी विसरणार नाही…पण तुम्ही कोण आहात ..कोण होतात हे रहस्य कोणालाच कळू देऊ नका,नाहीतर दुनिया तोंडात शेन घालेल ..कि ज्या फौजेची उदाहरणे ब्रिटीश शासन त्यांच्या विद्यार्थ्याना देते त्याचा संस्थापक एका स्त्री साठी हतबल झाला.!
वस्ताद माफ करा हे बोल बोलतो आहे …पण शेवटी हीच तुमची शिकवण होती.!
यावर तुझे वडील बोलले …..हजारो लाखो शास्त्रू एकाचवेळी तुटून पडले असते तरी हा उदयसिंग खचला नसता पण,एका स्त्रीच्या रेशमी हातानी त्याला जखडून ठेवले …!
हा खल चालू असताना तुझ्या गावाच्या पाटलानी ब्रिटीश पोलीस बोलावले आणि गोळीबार सुरु झाले..!
दोन्ही बाजूने तुफान गोळ्या सुरु झाल्या आणि तुझे वडील आमच्यासोबत अडकले.
राजाना खूप मोठा प्रश्न पडला होता काय करायचे ..इथून फरार व्हायचे तर वस्ताद अडकून राहून ब्रिटीशांचे गुन्हेगार बनणार…!
वस्ताद निर्धारी शब्दात बोलले कि …यशवंता ..मी जगलो वाचलो तर माझ्या पोरावर मात्र नजर ठेव ..त्याला या देशाच्या कामात नक्की आण ..माझे स्वप्न तो पूर्ण करेल ..असे म्हणत वास्तदानी बंदूक काढून छातीत बार ठासले.
आम्ही सर्वजन धावून जायच्या आत वस्ताद गतप्राण झाले होते.
देशभक्ती आणि संसार यात जीव टांगणीला लागला होता त्यांचा..एकदाची मुक्त झाले.
ब्रिटीश सेना तळ्याजवळ यायच्या आधी आम्ही पसार झालो.
मात्र तेव्हापासून आमची पोर तुझ्यावर पाळत ठेवून आहेत.
तुझी कुस्तीत पायाला लागले तेव्हाच त्या पंजाबी पैलवानाचा शेवट करणार होतो,पण तू तिथेच शपथ घेतलीस कि पुन्हा याला पाडीन तेव्हा आम्ही गप्प बसलो..!
ज्या दिवशी नरभक्षक वाघ आणि तुझी मुतभेड होती तेव्हा वाघ आमच्या बंदुकीच्या निशाण्यावर होता …पण तुझा तो वादळी आवेश पाहून राजानी माझी बंदूक धरली..म्हणाली वास्तदांचे रक्त काय उसळीचे आहे ते डोळ्याने बघ ..आणि खरोखरच तुझी ती लढाई पाहून आम्ही सारेच थक्क झालो,,,,राजे तर म्हणत होते याचे वडील वाघच होते…!
ज्या दिवशी तुला इस्पितळात आणले तेव्हाच आमच्या पोरांनी गस्त सुरु केली आणि जेव्हा तू शुद्धीवर येशील तेव्हा तुला इथे आणले ….!!
धनाच्या डोळ्यात अश्रुंचा धबधबा सुरु झाला होता..!
माझे वडील एवढे थोर होते याची पुसटशी जाणीव देखील माझ्या गावाला नाही.
केवळ माझ्या आईवरील आणि माझ्या प्रेमामुळे त्यांनी स्वताचा जीव दिला.
धनाला मनोमन वडिलांचा अभिमान वाटला आणि आयुष्यात प्रथमच वडिलांच्या आठवणीने तो गहिवरून रडू लागला..!
इकडे सूर्याजी २ महिन्यांच्या रजेवर धनाच्या गावी आला .
पाटलानी स्वताच्या वाड्याच्या मागील बाजूस असणार्या खोलीत त्यांचे सामान ठेवले आणि तिथेच रहायची सोय केली..!
राजलक्ष्मी ला सांगितले कि साहेब फक्त आपल्या गावासाठी एवढे कष्ट घ्यायला आले आहेत,त्याना काहीच कमी पडू देऊ नको..!
सूर्याजीराव मनोमन आनंदी होता.
आयुष्यात मोठा पैलवान होण्याचे स्वप्न पुन्हा पूर्ण करायची नशिबाने संधी दिली होती आणि सुवर्णाच्या रूपाने राजलक्ष्मीच जणू पुन्हा आपल्या सहवासात आली होती असे त्याला मनोमन वाटू लागले..!
इकडे धनाच्या आईने धना च्या विरहाने हंबरडा फोडला होता.
सारा गाव धनाच्या हारवण्याच्या शोकात होता..आणि राजलक्ष्मी …तिचे तर अश्रू रडून रडून आटले होते…!
तिला ध्यानी मनी स्वप्नी केवळ आणि केवळ धना दिसत होता..!
पाटील आणि वस्ताद धनाच्या शोधासाठी सारा सह्याद्री पालथा घालण्यासाठी चौफेर माणसे आणि पोलीस दल लावून गावी आले होते ….!
सूर्याजीने पेटीत बरेच दिवस ठेवलेला लंगोटा काढला,त्यावर गोमुत्र शिंपून धुतला आणि कपाळाला लावत त्याचे चुंबन घेतले….!
महाबली हनुमंताचे मनस्वी स्मरण करत मनात शपथ वाहिली कि येत्या २ महिन्यात माझी गेलेली ५ वर्षे मला भरून काढायची आहेत….!
भाग ९ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: धना भाग ०७ dhana bhag 07 —