धना भाग १४

“धना”

भाग १४ वा

मैदानात लोकांचे किंचाळणे,धावपळ याव्यतिरिक्त काहीच समजत नव्हते.
पोलीस खात्याने त्वरीत मैदानात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरु केला.
बिथरलेल्या हत्तीने किंचाळत धनाकडे धाव घेतली होती..!


एव्हाना सूर्याजी चांगलाच शुद्धीवर आला होता.
त्याला धनाच्या एका साथीदाराने आधार देऊन उभे केले होते.
झालेल्या स्फोटाच्या प्रकाशात धना आणि हत्ती यांची झुंझ सर्व प्रेक्षक पाहू लागले होते..!


सूर्याजीला जाणवले कि बिथरलेला हत्ती बिल्ला च्या अंगावर धावून जात आहे.
सूर्याजी वन खात्यात असल्याने जंगली प्राण्यांचा चांगलाच आभ्यास होता.
हत्ती बिथरला तर त्याला कसा ताब्यात आणावा या शास्त्रात सूर्याजी चांगलाच निपुण होता ….बिल्ला (धना) वर चवताळून आलेल्या हत्तीपासून वाचण्यासाठी सूर्याजीने हत्तीकडे धाव घेतली…!


हत्तीच्या समोर धना मजबूत पवित्रा घेऊन उभा होता …हत्ती किंचाळत धनाच्या समोर आला ….मात्र धनालाही याचे प्रशिक्षण दिले गेले होते..!
क्षणाच्या आत धनाने हत्तीच्या चार पायाच्या मधून कोलांटी घेत हत्तीचे शेपूट
मागे जावून पकडले ….!


सूर्याजीने धावत जावून हत्तीच्या समोर दोन्ही हात करत हत्तीला खुणावले …हे पाहताच हत्ती धनाला सोडून सुर्याजीवर मोर्चा वळवत सुर्याजीच्या मागे लागला..!
सुर्याजीच्या मागे कुस्ती आखाड्याच्या आणि जमिनीच्या मध्ये जवळपास ६ फुट वर्तुळाकार खोल खड्डा होता ..जेणेकरून प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानात जाऊ नयेत म्हणून केला होता ,हत्तीला या खड्यात फसवू या विचाराने सूर्याजीने त्या खड्याकडे आपली धाव घेतली आणि खड्याच्या तोंडावरच थांबला..!
धना ने शेपूट काही सोडले नव्हते ,हे पाहून हत्ती खड्याकडे न येता शेपूट सोडवण्याच्या नादाला लागला ..हे पाहताच सूर्याजीने धनाला ओरडून सांगितले..शेपूट सोडून जीव वाचवून पळ….पण या सर्व दंग्यामध्ये धनाला ते ऐकू गेले नाही पण हत्तीच्या जोरदार हिस्क्याने धना मात्र खाली पडला.
धना खाली पडताच हत्तीने जबर किंचाळी करत धनाकडे मोर्चा वळवला ….धना धडपडत उठू लागला ….धनाला वाचवायला सूर्याजी धावत जाऊ लागला …आता धना आणि हत्तीमध्ये जास्त अंतर उरले नाही ….आता धना हत्तीखाली चिरडला जाणार इतक्यात……मैदानाच्या पूर्वेकडील अंधारातून धडाधड बंदुकीचे बार हत्तीच्या सोंडेवर,गंडस्थळावर पडले आणि हातीच्या सोंडेतून रक्ताचा धबधबा सुरु झाला ….अंधारातून काळा बुरखा घातलेले धनाचे ५ ते ६ अंगरक्षक एकाच वेळी हत्तीवर बार टाकू लागले …हत्ती ची ची ची ची…किंचाळत धनापासून दूर जाऊ लागला आणि एके ठिकाणी जावून गतप्राण झाला….!
सूर्याजी आणि उपस्थित मंडळीना काही समजायच्या आता धनाच्या सेनापती आणि साथीदारांनी धना ला हाक दिली…धनाजीराव घाई करा ….वेळ दवडू नका.
हे शब्द सुर्याजीच्या कानावर पडले आणि सुर्याजीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला …”धना” ?
सूर्याजी धावत धानापर्यंत पोहचणार इतक्यात २०/२५ साथीदार आडवे आले आणि बंदूक दाखवत बाजूला व्हा म्हणून लागले ……सर्व साथीदारांनी एकाच वेळी हवेत बंदुकीचे बार काढून आसमंत दुमदुमून सोडला आणि मैदानात लोकांची पुन्हा धावपळ सुरु झाली आणि या धावपळीचा फायदा घेत धना ,सेनापती आणि साथीदार धावू लागले…!


ठरलेल्या ठिकाणी घोडे तयार होतेच धना आणि साथीदार घोड्यावर बसणार इतक्यात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस खात्यातील शसस्त्र दलाने धनाच्या समुहावर हल्ला चढवला..!


हल्ल्याला प्रतीउत्तर देण्यासाठी धनाने खांद्य्वरील बंदूक काढून बार काढले ,धनाच्या प्रतीउत्तराने पोलिस मागे हटले आणि धनाचे अश्वदल पन्हाळगड जवळील जंगलाच्या वाटेला लागले …..!
रात्रभर घोड़दौड़ मजल दरमजल करत धनाचे अश्वदल संघटनेची गुप्त जागा असलेल्या किल्ल्यात पोहचते झाले.
ती रात्र धावपळीत गेली ..!
दुसरा दिवस उगवला….!

इकडे धनाच्या गावात स्मशान शांतता पसरली होती.
सर्वाना कालचा हा प्रकार आकस्मित असा होता.
सूर्याजी,पाटील आणि वस्ताद यासह राजलक्ष्मी वाड्यात एकत्र बसले होते.
कोणीही काही बोलेना …सुर्याजीच्या डोक्याला जखम झाली होती.


निशब्द शांतता भंग करत सूर्याजी बोलू लागला…वस्ताद ..?
वस्तादानी सुर्याजीकडे पाहिले ……!
सूर्याजी बोलू लागला…वस्ताद मी जे काही सांगणार आहे त्यावर तुमचा काय कोणाचाच विश्वास बसणार नाही,पण मी जे डोळ्यांनी पाहिले ते खरोखर मी कुस्ती हारन्यापेक्षा भयानक आहे…!
पाटील,राजलक्ष्मी आणि वस्ताद तिघेही आश्चर्याने सुर्याजीकडे पाहू लागले..!


राजलक्ष्मी तुझा ‘धना’ जिवंत आहे ….!
काय…?
सर्वानी एकाच वेळी प्रश्न केला आणि आश्चर्याने पाहू लागले …होय पाटील खर आहे..!
काल माझ्यासोबत ज्याने बिल्ला पंजाबी म्हणून कुस्ती केली तो बिल्ला नसून धना होता ..!


हे ऐकताच वस्ताद काकानी मनात बिल्लाविषयी केलेले अंदाज खरे ठरले..!
पाटील बोलले..हे कसे शक्य आहे साहेब ?
धना आणि बिल्ला ?
होय …सूर्याजी उत्तरला.
काल कुस्तीनंतर चवताळलेल्या हत्तीबरोबर आमने सामने करताना धना आणि त्याचे दरोडेखोर साथीदार बिल्ला ला धना म्हणून हाक मारत होती ,आणि त्यानीच हत्तीला पण मारून टाकले.


पाटील…धनाने गावासाठी वाघ मारला ,म्हणून ते प्रकरण मी दाबून नेले ,पण आता हत्तीचा वध सर्वांच्या डोळ्यादेखत बंदुकीच्या फैरीनी केला गेला ,आणि धना बिल्ला म्हणून माझ्याशी का लढला ??


लढायचे होते तर मग अचानक इस्पितळातून का गेला ?
इतके खतरनाक दरोडेखोर हे त्याची काळजी का करत होते ?
माझे डोके तर सुन्न झाले आहे पाटील….!


धना दरोडेखोर आहे …असे माझे ठाम मत आहे..!
नाही..राजलक्ष्मी किंचाळली ….हे शक्य नाही म्हणत ती रडत रडत वरच्या मजल्यावर गेली…!
सूर्याजी बोलला..पाटील …हा काय गुंता आहे हे सोडवल्याशिवाय मला चैन पडणार नाही..!
धना अचानक इस्पितळातून कुठे गेला आणि काल ज्या लोकांनी हत्ती मारला त्यांनी त्याचा जीव वाचवून का नेले.


धना बिल्ला बनून जर कुस्ती करायला आला तर खरा बिल्ला कुठे आहे ?
आणि हे सर्व करायची धनाला गरज काय ?
कित्येक प्रश्न डोक्यात काहूर माजवत होते आणि त्याची उत्तरे शोधलीच पाहिजेत…!
सूर्याजी ताडकन उठून कोल्हापूर ला जायला निघाला …!!

इकडे किल्ल्यावर सर्वस्त्र निशब्द शांतता होती.
दुपारचा प्रहर टळत गेला आणि राजानी धना आणि सेनापतीला दरबारात बोलावून घेतले.
धना आणि सेनापती तत्काळ हजार झाले,मुजरे करून उभे राहिले..!
राजे बोलले……सेनापती तुम्हाला काय वाटते कि केवळ उन-पाउस खावून हि केस पांढरी झालीत ?
जेवढे तुमचे वय नसेल त्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझा ..!
आणि धना …मी समजत होतो त्यापेक्षा जास्त हुशार निघालास तू ..!


काय गरज होती नसती उचापत करायची ?
बिल्लाचे अपहरण करून आणायची जबाबदारी धना तुला दिली होती ..पण त्यापुढचे रामायण तुम्ही केले आहे ते मंजूर नाही आम्हाला..!
कोल्हापूर संस्थानाचा हत्ती मारला तुम्ही लोकांनी ..हजारो निष्पाप लोक जखमी झाले ,कित्येक मेले ..पोलिसाना संघटनेच्या कामाची शंका आली …आजवर गुप्तपणे चालणारे हे काम आता लवकरच पोलीस शोधून काढतील..!

धना आणि सेनापती खिन्न मनाने ऐकून घेत होते.
सेनापती ला वाटले होते धनाची कुस्ती संपवून बिनधास्त परत निघू पण हत्तीच्या बिथरनयाने सर्व नियोजन चौपट झाले होते.

राजे पुन्हा गर्जले ..धना ,,,?
तुला पहिल्याच दिवशी ताकीद दिली होती ,ज्यांचे प्रेम स्त्रीसाठी विभागले जाते ते देशासाठी बंदूक नाही उचलू शकत हा संघटनेचा शिरस्ता आहे आणि एवढे सांगून तू पाटलाच्या पोरीला भेटलास ..एवढेच नव्हे तू संघटनेची गुप्तता सांगितलीस..तुला काय वाटले तू हे सर्व करताना माझे लोक नव्हते तुझ्या गटात ?


संघटनेची गुप्तता फौजेच्या लोकांशिवाय इतर लोकाना माहित झाली तर ती व्यक्ती जिवंत ठेवणे आपल्या फौजेसाठी धोक्याचे आहे हे तू कसे विसरलास…!

धनाच्या हृदयाचा थरकाप उडाला….राजे…राजलक्ष्मी नाही कोणाला बोलणार ….हवे तर मी त्याची जबाबदारी घेतो…!
जबाबदारी ?….एकदा देऊन पहिली ..पुन्हा नाही देऊ शकत ..राजे गरजले..!
आणि सेनापती ….तुम्ही अनुभवी असून केवळ शिपाईगिरी बजावली …काय गरज होती का या सर्वाची ?


सकाळीच गुप्तहेरा मार्फत खबर आली आहे ,कालच्या हत्ती मृत्यूचा उलघडा मुंबई चे प्रमुख पोलीस अधिकारी करणार आहेत.
काल ज्यांनी गोळीबार केला त्या आपल्या लोकांच्या तपासाला पोलीस पिसाळलेल्या कुत्र्यासारखे सह्याद्रीत घुसणार आहेत ..!
बिल्ला अपहरण प्रकरण केंद्र सरकारकडे गेले आहे ,देशाचे शत्रू आता बिल्लासाठी केंद्राला वेठीस धरतील आणि केंद्र सरकार भारतीय सेना त्याच्यासाठी इकडे पाठवतील..!
बोला आता आपण काय करायचे ??


तुमची एक छोटी चूक पण सार्या संघटनेची ५० वर्षाची कारकीर्द संपुष्टात आणायला कारणीभूत ठरत आहे….!
देशाचे खरे शत्रू बाजूला राहून आता आमच्याच पोलीस बांधवाविरुध्द,सेनेविरुध्द बंदूक उचलायला लावणार आहे ..!
बोला काय आहे उत्तर तुमच्याकडे याचे ??
धनाजीराव …सेनापती …संध्याकाळपर्यंत मला उत्तरे हवी आहेत ..आणि ती जर नाही आली तर संघटनेचा राजा या नात्याने मला कठोर पावले उचलावी लागतील याचे भान ठेवा.

इकडे सूर्याजीराव कोल्हापुरात वनअधीक्षक कार्यलयात नोकरीवर रुजू झाले.
हत्तीप्रकरण त्यांच्या डोळ्यासमोर चे होते म्हणून वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई मंत्रालायाकडून सुर्याजीलाच या प्रकरणासाठी नेमले होते..!
आलेल्या पत्रात स्पष्ठ लिहिले होते …..हत्ती प्रकरणात जे कोणी असतील ..मुसक्या बांधा नाहीतर दिसताच गोळी घाला..!


वरिष्ठ उत्तर मागत आहेत.
इकडे कलेक्टर साहेब यांनी पोलीस प्रमुखाना बजावले होते …४ माणसे हत्तीच्या हल्ल्यात ठार झाली ..स्फोट कसा झाला ..कोणी केला आणि जो पैलवान कुस्ती खेळला तो कोण होता ?
बिल्ला पैलवान शोधून काढा नाहीतर केंद्र सरकार त्यांचे खास पथक इकडे पाठवत आहे …!
सुर्याजीचे डोके सुन्न झाले होते..!
कुस्ती हारला…राजलक्ष्मी ज्या साठी झुरते त्या धनाने हे सारे केले हे फक्त त्यालाच ठावूक होते.
पण सध्या तरी तो गप्प होता …!
त्याने एक आठवड्याची रजा घेऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि तो गावाकडे गेला.

सायंकाळ झाली …राजानी विशेष मातब्बर सरदार आणि हेर याना बोलावून घेतले होते.
धना आणि सेनापती याना बोलावण्यात आले..!
राजे बोलू लागले…!

”गड्यांनो,लक्ष देवून ऐका.मला महत्वाचे काही निर्णय द्यायचे आहेत.
तुम्हा सर्वाना माहित आहेच,नुकत्याच घडलेल्या धनाजी राव कुस्ती प्रकरण आणि हत्ती मृत्यू यामुळे येत्या २-३ महिन्यात वन खाते,जिल्हा पोलीस,राज्य पोलीस आणि केंद्र सरकार यांचा पाठपुरावा होवून काल ज्या लोकांनी हत्ती मारला त्यांच्यावर तपास सुरु होणार आहे.


ज्यांनी हत्ती मारला ते सेनापती यांच्या खास पथकातील लोक होते ,अर्थात आपल्या संघटनेची माणसे.
काल त्यानी चूक केली पण त्याची फळे आपल्या सर्व संघटनेला भोगावी लागणार आहेत.


आपले संघटन नेमके काय आहे हे केवळ आणि केवळ आपल्याच लोकांना माहिती असते ,दुसर्या कोणालाच नाही.
गेली ५० वर्षे आपण गुप्तपणे अनेक घडामोडी केल्या ,देशस्वातंत्र्याआधी अनेक खजिने लुटले.


अनेकाना यमलोकी पाठवले ,स्वातंत्र्यानंतर अनेक भ्रष्ट नेत्यांना ठार केले.अनेक शासकीय ,पोलीस,प्रशासकीय देशद्रोही याना ठार केले ,आणि यामुळे अनेक ठिकाणी जनता सुखी झाली.


मात्र विद्यमान शासनाच्या दृष्टीने हा गुन्हा आहे हे आपल्यापैकी कोणीही विसरू नये,मला वाटते कि चिवट वीरांची फौज,उपलब्ध हात्यार यामुळे कदाचित तुम्हा सर्वांनाच आपण या जगाचे मालक आहोत,आणि कोणालाही ठार करू अशी भ्रामक समजूत झाली असावी..!


ज्या वास्तदानी या संघटनेची बांधणी केली ,त्यांचेच रक्त म्हणून आपण सारे धनाकडे मोठ्या आशेने पाहत होतो,पण त्यानेच संघटनेची गुप्त बातमी पाटलांच्या पोरीला सांगितली.
फौज सोडून हि बातमी त्या पोरीला ठावूक आहे.
तिच्याकडून हि बातमी वन अधिकारी जो धनासोबत कुस्ती खेळला त्याला माहिती होऊ शकते.
.
सर्व विचारांती माझा पहिला निर्णय असा आहे कि आपण सर्वच काही वर्षे वेगवेगळ्या वेशात वेषांतर करून आंध्रप्रदेश च्या जंगलात आणि राजस्थानच्या घाटात आपले बस्थान हलवले पाहिजे .


आंध्र प्रदेश जंगलातील लोक आणि राजस्थान मधील लोक आपल्या सर्वांची व्यवस्था पुढची २ वर्षे करतील ..!
या २ वर्षात कोणी कोणाच्या संपर्कात नसेल ,प्रत्येकाची यादी तयार आहे.प्रत्येकाची कामे ठरलेली असतील ,फक्त स्त्री आणि व्यसन सोडून काहीही करण्यास आपल्याला मुभा असेल.


२ वर्षानंतर आपणास पुन्हा निरीप दिले जातील आणि संघटन सक्रीय होईल..!

आणि दुसरा निर्णय असा कि त्या पाटलांच्या पोरीला आणि त्या वनअधिकारी साहेबाला त्याच बरोबर बिल्ला आणि त्याचे साथीदार यांना येत्या २ दिवसात ”ठार” केले जाईल …!

बस्स संघटन वाचवून पुन्हा देशाचे काम करण्यासाठी फक्त एवढीच वाट शिल्लक आहे.

हे ऐकताच सेनापती आणि धना च्या हृदयाचा थरकाप उडाला..!
धनाच्या पायाखालची जमीन ढासळू लागली असा भास होऊ लागला ..धनाच्या डोळ्यातून अश्रू आपोआप येऊ लागले …श्वासांची गती वाढली….!

राजानी सर्वाना तयारीला लागायचे आदेश दिले.
किल्ल्याची अवस्था अशी करायची होती कि इथे कोणी राहूच शकत नाही.
सर्वानी आई जगदंबेचे स्मरण करून कामाला लागा येत्या पोर्णिमेनंतर भवानीच्या आरतीने सर्व एकमेकापासून दूर जातील.
सर्वांनी तयारीला ला असे म्हणत राजांनी फक्त एकट्या धना ला थांबायची खून केली आणि इतरांनी जायला सांगितले..!
राजाना मुजरे करत सर्वजण निघून गेले.

धनाने राजांचे पाय धरले ….राजे हवे तर या धनाच्या छातीत गोळी घाला पण ,राजलक्ष्मी ला काही करू नका ,मी शपथ देतो ती कोणालाच काही बोलणार नाही ,मी तिला चांगले ओळखतो.
असे म्हणत धनाने अक्षरश आकांत मांडला आणि हुंदके देत रडू लागला…!

राजांनी धनाला उठवले …!
धना ….वस्तांदाचा मुलगा तू ….असा एकदम ढासळत आहेस हे शोभत नाही.
भावी संघटनेचा राजा म्हणून आम्ही सारे तुला पाहतो ,आणि तू रडतोस ?
कित्येक आया बहिणींचे संसार भविष्यात तुझ्यावर अवलंबून आहेत …याचे भान ठेव..!
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते धना..!
तुझ्या प्रेमाबद्ध्ल नितांत आदर आहे मला,पण तू राजलक्ष्मी ला संघटनेची माहिती देवून चूक केलीस आणि तिला जिवंत सोडून मी महाचूक करणार नाही …!


संघटना काय हे कोणालाच माहिती नाही …होणार नाही.
आमच्या सर्वांच्या प्राणांची आहुती जरी द्यावी लागली तरी संघटन काय आहे हे बाहेरील लोकाना समजू देणार नाही …!
धना शक्तीची खरी ओळख ती लपवण्यात असते.


माणूस सर्वात जास्त अश्या गोष्टीला भितो ज्याला काही नावच नसते..!
धना जर देशातील वाईट गोष्टीविरुध्द लढा मांडायचा असेल तर प्रसिद्धीपासून दूर राहून हे काम करायचे असते…नाहीतर सर्व संपले म्हणून समज..!
एक गोष्ट लक्षात पक्की कर..या जगात भावनेपेक्षा कर्तव्य आणि देश हे कधीही मोठे.
इथे आलेल्या प्रत्येक जणांची आई,बहिणी,वडील हि सर्व नाती तोडून केवळ देव देश धर्मासाठी आयुष्याची माती करून आलेली हि आपली चिवट फौज..तुझ्या एका प्रेमामुळे मला कायमची संपवायची नाही …विचार कर ….तू आमचा भावी राजा आहेस….!
असे म्हणत राजे निघून गेले …!


धना जमिनीवर बसून रडत रडत विचार करत होता ..राजांचे एक एक शब्द त्याच्या काळजात घर करून बसले होते ….

”जगात भावनेपेक्षा देश ,आणि कर्तव्य महत्वाचे आहेत”

पण हे सारे कळुनही राजलक्ष्मी साठी त्याचा जिव तीळतीळ तुटत होता..!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “धना भाग १४”

  1. Pingback: धना भाग १३ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!