“धना”
भाग १९ वा
दुरवर दम खात असलेला धना आणि त्याच्या हातातील नुकतीच बार टाकलेली बंदूक धूर टाकत होती ..धनाला पाहून राजलक्ष्मीच्या मनात आनंदाचे काहूर निर्माण झाले …पण क्षणात तिच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला ….तिने डोळे वटारले ….भीतीने तिने आर्त किंकाळी टाकली आणि धनाकडे पाहू लागली…धनाला काही समजले नाही…तो मागे वळून पाहू लागला तर एकाच वेळी ५-६ भुकेले वाघ त्याच्या दिशेने येत होते. ……धनाच्या बंदुकीतील २ बार आधीच उडाले होते….आणि वाघ केवळ एका झेपेच्या अंतरावर आले होते ……!!
ईसवी सन 2010…..कोल्हापुर
आई वाच ना पुढे काय झाले …??
पाणावलेल्या डोळ्यांनी स्तब्ध झालेली निशिगंधा ,राजनंदिनीच्या बोलण्याने भानावर आली…डोळ्यावर आलेला अश्रूंचा पूर आपल्या हातानी ती पुसत पुन्हा हुंदके देऊ लागली ..आणि तिच्या हुंदक्यात राजनंदिनी चा हुंदका सुध्दा सामील झाला …दोघानाही अश्रू अनावर होते…!
निशिगंधा हि सातारच्या मोठ्या मातब्बर घराण्यातील मुलगी,वनखात्यातील सुर्याजीरावांसोबत ३० वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता.
३० वर्षाच्या सुखाच्या संसाराच्या वेलीवर “राजनंदिनी” च्या येण्याने ब्रम्हकमळ उमलले आणि संसाराचे सार्थक झाले.
आनंदाला,समाधानाला काहीच कमी नव्हते पण का कोणास ठाऊक सूर्याजीराव आयुष्यभर काहीतरी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवत आहेत अशी ठाम धारणा निशिगंधा ची होती,वारंवार खोदुन विचारून सुध्दा तिला सूर्याजीने काहीच सांगितले नव्हते.संसार सुखाचा चालला होता ,पण सुर्याजीरावान्च्या नजरेत का कोणास ठाऊक तिला काहीतरी लपलेले गूढ तिला दिसत होते.पण सुरुअजीने आजन्म एक शब्द देखील याबद्धल बोलला नव्हता …तो म्हणत असे …अग डोळ्यात काय पाहतेस ..पाह्यचे असेल तर माझ्या हृदयात पहा..!
त्याच्या अश्या बोलण्याने निशिगंधा पुन्हा काही विचारातच नसे…!
सूर्याजीराव आणि निशिगंधा महाराष्ट्र सोडून अनेक वर्षापासून दिल्ली ला स्थायिक झाल्या होत्या,अनेक वर्षे वनखात्याची सेवा बजावून सूर्याजी सेवानिवृत्त झाले …पण काही केल्या त्यांच्या डोळ्यात खोल कुठेतरी अत्यंत मोठे गूढ लपले होते,ते निशिगंधा ला काही केल्या त्याने सांगितलेले नव्हते.
गेल्याच वर्षी सूर्याजीराव आजारपणामुळे त्यांच्यातून निघून गेले होते,त्यांची शेवटची इच्छा होती कि तुम्ही सारे महाराष्ट्र कोल्हापुरातील आपल्या जुन्या वाड्यावर स्थायिक व्हावे,राजनंदिनी ने महाराष्ट्रच यावे …पण नवीन विचार ,नवीन पिढी .
कोणालाच त्याची तळमळ समजली नव्हती..!
राजनंदिनी उच्चशिक्षित झाली,तिच्या बुद्धी कौशल्यावर अमेरिकेतील नामवंत संगणक निर्माण करणार्या कंपनीत ती गेल्याच वर्षी मोठ्या पगारावर आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला लागली होती…!
मुलगी तरुण झाली कि नैसर्गिक भावभावनांना उधाण येणे साहजिकच असते,मात्र या उधाणाला संस्काररुपी बांध असलाच पाहिजे,नाहीतर हा भावनेचा महापूर तिचे स्वताचे जीवन नव्हे तर तिच्याशी निगडीत प्रत्येक माणसाचे आयुष्य वाहून न्यायला सुध्दा कमी पडत नसतो.
राजनंदिनी च्या बाबतीत सुध्दा असेच घडले होते,ती शिकली होती,सुसंस्कृत होती मात्र एवढे असूनही ती भावनेच्या हा खोल मायाजालात गुंतली होती.
अमेरिकेतील तीच एक वर्षापूर्वी ओळख झालेला आणि अमेरिकेचा नागरिक असणारा जो मायकल स्टीफनस या मुलासोबत तिचे मन जुळले होते..काही केल्या तिला त्याला सोडून जगणे हा विचार सुध्दा आता सहन होत नव्हता..!
हि गोष्ट तिने निशिगंधा च्या कानावर घातली होती.
निशिगंधा ने प्रारंभी विरोध दर्शवला मात्र,सुर्याजीरावांच्या आकस्मित जाण्याने हळवी झालेल्या निशिगंधाने पुन्हा तिने होकार दिला होता..!
सुर्याजीच्या वर्षश्राद्धाला राजनंदिनी अमेरिकेहून आली होती आणि रिवाजाप्रमाणे त्यानी त्याचे वर्षश्राध्द कोल्हापुरात जुन्या वाड्यावर घातले होते..!
अमेरिकेतील पाश्चात्य संस्कृतीत रूळलेली राजनंदिनी आणि दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत सुखाचे आयुष्य व्यथित केलेल्या निशिगंधाने बर्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या भूमीत पाऊल ठेवले ,इथली अवखळ मात्र बंड शिकवणारी हवा त्यांना स्पर्शू लागली …इथले डोंगर,गडकोट किल्ले ,इतःली संस्कृती पदोपदी दिसू लागली.
कोल्हापुरात त्यांचा मोठ्ठा वाडा होता,सूर्याजीने अनेक वर्षापूर्वी इथेच राहायचा विचार करून तो बांधला होता ,पण सरकारी आदेशामुळे त्याना दिल्ली येथे जावे लागले आणि इथला वाडा त्यानी काही जवळच्या लोकांना सांभाळायला दिला व तो दिल्लीत राहू लागला…..!
राजनंदिनी आणि निशिगंधा वाड्यावर उतरले..!
विश्रांती आणि जेवणखाण झाले …या वाड्याच्या प्रत्येक वस्तूवर सुर्याजीच्या आठवणी होत्या ,राजनंदिनी सूर्याजीची लाडकी लेक होती..!
मोठ्या लाडाने त्याने तिचे नाव राजनंदिनी ठेवले होते …तिने मोठे झाल्यावर विचारले सुध्दा कि आबा सांगा माझे नाव राजनंदिनी का ठेवेले ?
तेव्हा सूर्याजी हसत म्हणायचा कि तू मागच्या जन्मीची राजकुमारी वाटतेस म्हणून ..मगते दोघेही हसायचे…!
सुर्याजीच्या या आठवणी राजनंदिनीने मनात जपल्या होत्या.
राजनंदिनी सुर्याजीच्या जुन्या वस्तू मोठ्या मायेने स्वच्छ पुसत होती आणि जुन्या वस्तू पाहता पाहता तिला दोन जुन्या चाव्या सापडल्या…तिने त्या आईला दाखवल्या .
या चाव्या नेमक्या कशाच्या म्हणून दोघीही मायलेकींनी सारा वाडा शोधून काढला ..तेव्हा त्याना त्या वाड्याच्या खालच्या सोप्यात एक गुप्त दार सापडले,याला तळघर म्हणत असे…अनेक जुन्या वाड्यात आजही तळघरे पहायला मिळतात.
त्यानी दिवाबत्ती घेऊन त्या दाराला त्यातील एक चावी लावली आणि गेली कित्येक वर्षे बंद असलेला तो दरवाजा उघडला ….जाळ्यातून वात काढत दोघींनी मोठ्या धाडसाने आत प्रवेश केला.
दिव्याच्या प्रकाशात आतील कोंदट वातावरणात अनेक जुन्या तलवारी,बंदुका ठेवल्या होत्या,लांघ -लंगोट ,लाकडी गदा आणि बरेच काही दिसत होते , आणि समोरच एक मजबूत जुनी लाकडी पेटी ठेवली होती.
त्याला भलेमोठे कुलूप लावले होते ,त्या कुलपात उरलेली एक चावी लावून बघितली तर कुलूप क्षणात उघडले गेले …..पेटीचा वरचा भाग उघडला आणि आत भगव्या कापडात बांधून ठेवलेल्या २ भल्या मोठ्या डायर्या (वह्या) सापडल्या..सोबत काही सोनेरी आभूषणे ..गळ्यात घालायची चांदीची पेटी होती.
हे सर्व साहित्य दोघींनी उचलून वाड्याच्या वर आणले आणि तळघर पुन्हा बंद करून ठेवले…!
काय असावे या डायर्यामध्ये ?
सूर्याजीराव जन्मभर जी रहस्ये मला बोलले नाहीत कदाचित ती तर नसावीत ?
निशिगंधा आणि राजनंदिनीला राहवत नव्हते.
रात्री दोघींची जेवण उरकले आणि राजनंदिनी आईला बोलली ..आई काय गूढ असेल या वह्यांमध्ये ?
दोघींनी त्या डायरी मध्ये काय असेल हि उत्सुकता मनी घेऊन त्या वहीतील पहिली वही उघडली ,त्यात काही हिशोब,हाताने काढलेले नकाशे व इतर काही सांकेतिक शब्दातील मजकूर होते….!
दोघीना त्यातील काहीच समजले नव्हते.
ती वही झाकून ठेवली आणि दुसरी उघडली ……..आणि त्यात सूर्याजीने लिहून ठेवला होता त्याचा अद्भुत,अलौकिक असा भूतकाळ….!
डायरीचे एक एक पान निशिगंधा वाचू लागली आणि तो भूतकाळ झरझर दोघींच्याही डोळ्यासमोर दौडू लागला…ते निसर्गरम्य गाव…बांधीव तालीम..ते तालमीतील षडूड्चे घुन्त्कार……ते कुस्त्यांचे मैदान…हलगी घुमक्यांचे मर्दानी स्वर …..ते पाणीदार डोळे..नाजूक असे स्मितहास्य….धनाची -राजलक्ष्मी ची पहिली भेट…..मैदानातील पराभव….नरभक्षी वाघाची जीवघेणी डरकाळी….तो रक्ताचा फवारा….तळ्या शेजारची सूर्याजीची छावणी…खासबागेतील कुस्ती..उधाळलेला हत्ती …स्फोट….गोळीबार….सर्वकाही डोळ्यासमोर दिसू लागले होते..!
ज्या माणसाशी आपण ३० वर्षे संसार केला त्याचा भूतकाळ इतका चित्तथरारक आणि अद्भुत असेल याची काडीमात्रही शंका निशिगंधाला नव्हती..!
इतके वर्षे दिल्लीत राहून महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास,इथली परंपरा,इथली संस्कृती हि इतकी हृद्यास्पर्शी असेल हे केवळ आठवूनच दोघीही मायलेकींचे डोळे भरून आले…!
राजनंदिनीला ला तर धना डोळ्यासमोर दिसत होता,त्याचे वागणे,चालणे,बोलणे,त्याचे धिप्पाड शरीर,करारी नजर,देशावर मरायची आग…आणि एवढे असूनही एक पवित्र प्रेमासाठी त्याचाही होत असलेली धडपड.
खरोखर विलाक्ष्ण होते हे सारे.
आजवर तिने अतिशय उच्च शिक्षण घेतले,परदेशातील जीवन हे सर्वात समृध्द असे जीवन आहे असे तिला मनोमन वाटत असे आणि तिथेच लग्न करून स्थायिक होण्याच्या तिच्या विचाराना तिच्या वडिलांच्या डायरीने जणू मुठमाती दिली होती….तिला इथल्या मराठी मातीला हातात घ्यावे वाटू लागले आणि ती भरल्या नयनांनी वाड्याच्या बाहेर आली ..तिने ती चिमटभर माती घेतली,कपाळाला लावली..जिभेवर टाकली …आणि या मातीचा गोडवा तिच्या रक्ताच्या पेशीपेशीत अजूनही जिवंत असलेल्या सुर्याजीच्या सुप्त विचाराना जागृत करू लागला …तिच्या डोळ्यांनी अश्रुंचा जणू धबधबा सुरु केला ..हृदयाची कंपने वाढू लागली…हुंदका अनावर झाली आणि धाय मोकलून रडू लागली….तिला अमेरिका ,जो मायकल स्टीफनस हे सारे परकी वाटू लागली….!
विजार-शर्ट घालून अमेरिकेतील उच्चभ्रू जनजीवनात वावरन्यापेक्षा साडी नेसून,कुकवाने भरलेल्या कपळाने प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा आपल्या धनाला क्षणभरही न विसरणारी राजलक्ष्मी तिला राहून राहून आठवू लागली..!
कर्तव्यासाठी जिवलगांच्या ताटातुटी करणारी हि माझी मराठी संस्कृती आजवर मला का कोणी सांगितली नाही….मनात मरेपर्यंत केवळ धनाच ठेवणारी राजलक्ष्मी कुठे आणि आजकालच्या वस्त्रांप्रमाने सहचारी बदलाणारी ती अमेरिकेतील संस्कृती कुठे…?
तिला राहून राहून लाज वाटू लागली तिच्या आजवरच्या वागण्याची…!
तिची जी अवस्था होती तीच निशिगंधाची अवस्था.
सुर्याजीरावांसारखा पराक्रमी पती नशिबाने लाभला पण मरेपर्यंत त्यांचे मन मी समजू शकले नाही याची तिला जाणीव होत होती ,जी पतीचे मन ओळखत नाही ती कसली पत्नी ?
तिला लाज वाटू लागली आपल्या आजवरच्या वागण्याची.
धना आणि राजलक्ष्मी च्या विलक्षण प्रेमकथेतून तिला जीवनाचे सार समजू लागले होते…पण आता तर वेळ निघून गेली होती.
सूर्याजीराव देहाने आज तिच्यासोबत नव्हते ,पण त्यानी अनेक वर्षापूर्वी लिहून ठेवलेली त्यांची डायरी आज सुर्याजीच्यचं रूपाने जणू तिच्याशी बोलत होती.
हे नशीब पण ना किती विलक्षण आहे..आयुष्यात पडलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधायला सारी ह्यात जाते आणि जेव्हा उत्तर सापडते…तेव्हा प्रश्नच बदलून टाकलेला असतो..अगदी हीच अवस्था निशिगंधा आणि राजनंदिनीची होती…!
आई वाच ना पुढे काय झाले …??
डोळ्यावर आलेले अश्रू पुसता राजलक्ष्मी तिच्या आईला निशिगंधाला विचारू लागली …!
आणि तिनेही डोळे पुसत डायरीचे पान पालटले ,..
पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: धना भाग १८ —