या अगोदरचे भाग छत्रपती शिवाजी महाराज चरित्र भाग ०१ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत. स्नान, पूजा-अर्चा आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथीवाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा. सायंकाळी पाय मोकळे करायला जात. एक-दोन दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेण्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही.
जिजाबाईंना गडावर येऊन चार महिने होत आले होते.
दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काही तरी शिवीत होत्या. दासी जिजाबाईचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले,
“राणीसाहेब…’
“लक्ष्मीबा, असं परक्यासारखं “राणीसाहेब’ वर्गैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या. “जिजा” म्हणून म्हणत जा ना!”
‘जिव्हाळा आला, म्हणून पायरी कशी सुटेल?
“तुम्ही ऐकणार नाहीच… काय विचारीत होता ?’
“सांगाल ?’
“सांगेन ना!”
“तुम्हांला अप्रुवाईनं काही खावंसं वाटतं का? मी पाहते, तुम्ही काही सांगत नाही.’जिजाबाई हसल्या. ‘खरं सांगू, लक्ष्मीबाई? मला खाण्या-पिण्याचे काही डोहाळे
नाहीत. वाटायचं, घोड्यावरून दौड करावी , तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा. कड्यावर उभं राहून खालची माळवदं डोळे भरून पाहावीत. नशिबानंच माझे सारे डोहाळे पुरवले. ‘
लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, ‘उठता का?”
“आपण विश्रांती घ्या. थोडं झोपा. बरं वाटेल.
“खरं सांगू? जिजाबाई म्हणाल्या, “आताशा मला दोन प्रहरी झोपच येत नाही.’“ते का?’
जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या,
“हा खेळतो आहे ना?!
लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहवले नाही. गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून, कानशिलांवर बोटे मोडून त्या म्हणाल्या,
‘कुठं तरी दृष्ट लागायची, बाई, तुला. असं काही सांगत जाऊ नको. झोप जरा.’ म्हणत लक्ष्मीबाई उठून गेला.
संध्याकाळी जिजाबाई, लक्ष्मीबाई दासीपरिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि
दारातच सेवक विठू आला.
“विठू, काय आहे?” जिजाऊंनी विचारले.
“राणीसरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार?!
“हो!”
“दरखास्त आहे. आपण मावळतीकडे जावं!’
“का?’
“गुन्हेगारास कडेलोट फर्मावली आहे. त्याची तामिली आता होत आहे.’
“कोण आहे बिचारा?
“राणीसरकार, मला माहीत नाही. टकमकच्या सार्या वाटा रोखल्यात, म्हणून बेअदबी
“विठू, असाच जा, आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग.’
जी…” म्हणत विठू गेला.
जेव्हा विश्वासराव आले, तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतेही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या,
“विश्वासराव! आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे?
“कुणी सांगितलं ?’
“कळलं आम्हांला! पण ते खरं का?
“होय, राणीसाहेब. खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली. एक मण धान्य लुटलं.’
“त्यासाठी कडेलोट ?’
“राणीसाहेब, हे दुष्काळचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या, तर हवालदिल झालेला मुलूख परागंदा व्हायला वेळ लागायचा नाही.’
“सत्ता तुमची. तुमच्या आड येणं आम्हांला उचित नाही. पण, विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही, हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कुणाला होस असते?’
“आपला काय हुकूम आहे?’
“हुकूम कसला? एक विनंती. आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका.’
“जशी आज्ञा.” म्हणून विश्वासराव निघून गेले.
हनुमंते म्हणाले, ‘मासाहेब! आपण होतात, म्हणून बिचाऱ्याचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला.’
जिजाऊंनी विठूकडे पाहिले. विठू संकोचाने म्हणाला, “तसं नाही, राणीसरकार! सच बात बोलायची, तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं, बिचारा रडत होता, हनुमंते मला म्हणाले की, हे राणीसरकारना कुणी सांगेल, तर याचा जीव वाचेल.
जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, ‘आणि म्हणून तू सांगितलंस, असंच ना?… पाहिलंत, लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात, ती?’
दोघी हसल्या. जिजाऊ म्हणाला, “चला, हनुमंतेकाका, फिरून येऊ.
तटावरून खालचे जुन्नर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूख न्याहळीत चालत असता मध्येच जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या,
लक्ष्मीबाई, तो हिरवा ठिपका दिसतो, ती जुन्नरमाळाची आबंराई ना?’
द जी.
” जिजाबाईंनी दीर्घ नि:श्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले.
वाड्याच्या दरवाज्याशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होतेय, हे कळायच्या आत त्याने जिजाबाईंच्या पायांवर लोळण घेतली. विठू धावला. त्याने त्या इसमाला उभे केले. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे. भकास चेहर्याचा तो काष्ठवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला,
“हाच तो इसम, ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती.’
जिजाबाई म्हणाल्या, “परत चोरी करू नको, बाबा! देवाचे पाय धर.
-आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या,
“विश्वासराव, त्या माणसाला सोडलंत, फार बरं केलंत. गरीब बिचारा. आनंदानंही रडत होता.’
जी.’ विश्वासराव म्हणाले.
विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्र झाले. त्यांनी विचारले,
“काय झालं, विश्वासराव ?’
“राणीसाहेब! खबर तितकी चांगली नाही.’
“सांगा. वेळ लावू नका.’
“राजांनी विजापूरकरांचा मुलुख बळकावून बंडावा केला, म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं. मुरार जगदेवानं पुणे नगरीचा होळी केली. वाडे भस्मसात झाले. एवढंच नव्हे, तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरविले.
गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात, शहाजीराजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला.’
“आणि स्वारी55?’ जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती.
राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत.
दोन दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो.

जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या,
“विश्वासराव, दैव फिरलं, त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं, हेच मोठं झालं. वाईटात चांगलं, ते हेच!
मुजरा करून विश्वासराव गेले… आणि जिजाबाईंनी थोपविलेल्या अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या
बातम्या सुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्या नाहीत, तोच बातमी आली : शहाजीराजांचे चुलतभाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी, म्हणजे जिजाबाईच्या जाऊ, नाशिकला गोदावरीस्नानाला गेल्या असता,
महाबतखानाने त्यांना पळवून नेले. त्या वार्तेने जिजाबाईंच्या जिवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही.
विश्वासराव, नारो त्रिमळ, गोमाजी पानसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंताचूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस वडिलकीच्या आधाराने जिजांऊना सांगणारा तोच, पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाहीत.
लक्ष्मीबाई जिजाबाईचे मन रमविण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधीत
होत्या. मनाच्या धीराने जिजाऊंच्या दु:खावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चूपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसतमुखाने घोटाळणार््या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासींच्या पावलांना जडपणा आला.
अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली. जिजाऊंच्या हे सारे ध्यानी येत होते. पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले. त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले.
“विश्वासराव55…’
जी, राणीसाहेब.
“आम्ही नुसत्या नात्यानं वा अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही
आम्हांला पाठच्या भावासारखे. म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं.
“ते माहीत आहे.’
“मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवीत आहा?
“काही नाही, राणीसाहेब.” विश्वासराव गडबडीने म्हणाले, “कुणी सांगितलं?!
“सांगायला कशाला हवं? गेले दोन दिवस एकजण सरळ बोलत नाही. आम्हांला
पाहताच दातखीळ बसते.’
“गैरसमज होतोय्. राणीसाहेब…’
“विश्वासराव, आम्हीही चार पावसाळे पाहिलेत. आघात सहन केलेत. मला तुम्ही काही
सांगणार नसाल, तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही.
“पण, मासाहेब… ‘
“घाबरू नका! या जिजाऊनं फार सहन केलंय्. काहीही सांगितलंत, तरी सहन
करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे.
सांगा…
“मासाहेब… ‘
“बोला555…’
विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला.
“विश्वासराव, हे हुंदके आवरा.’ उतावीळ झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत
आज्ञा देत्या झाल्या, ‘बोला…’
विश्वासरावांनी डोळे टिपले. ते भरकन बोलून गेले,
“आपले आबासाहेब… लखुजीराव जाधवांचा खून झाला.’
“खून? आबांचा खून? कुणी केला?’
ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठांवरून जीभ फिरवीत ते बोलू लागले,
“दोलताबादेच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. अचलोजी, रघोजी, यशवंतराव या तिन्ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच…
“बोला, विश्वासराव. आता क्षणभरही थांबू नका…’
“ आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जंबियानं प्रतिकार करणार, तो केवढा? मासाहेब, सुलतानाच्या सेवेत चारी जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहाहूरजी तेवढा वाचला. आपले दीर जगदेवराव गडाखाली होते, ते वाचले.’
विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या.डोळे तसेच तारवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानांवर
शुष्क शब्द पडत होते…
“आबा गेले! माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरविला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर, त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात! आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी, त्याच जाधवरावांची कत्तल
सुलतानी दरबारात व्हावी!
-आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या,
“विश्वासराव, या जगात देव आहे का, हो?
भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले, तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला.
मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
यापुढील भाग उद्या येईल