छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०४

शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्म

लखुजीराव यांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लोकर उठ्‌॒ शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे.

घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत.

जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले.
एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या,“राणीसाहेब, हे चालवलंय्‌ काय? जे झालं, त्याचं मला वाईट का वाटत नाही?

साऱ्यांनाच त्याचं दु:ख आहे. आपली काळजी वाटत नाही; पण त्या पोराची वाटते.निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीज राहील का?’

जिजाबाईचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या,

“नका, लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पाहा पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दु:ख माझ्याबरोबर. त्याचा भार दुसऱ्याला कशाला ?’

खरं?
“अगदी शिवाईशपथ! तुम्ही म्हणाल, तशी वागेन मी. काळजी करू नका.’

“सुटली!

त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या.
नऊ महिने संपले.

लक्ष्मीबाईना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला होत्या.अनुभवी, चांगल्या हातगुणाच्या सुहणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते.

बाळंतघरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतींवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये, म्हणून रोप्यसमया तेवत होत्या. ताज्या पाण्याचे सुवर्णकलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये, म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात दरवळतहोता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात सार्‍या गडाचे जीव गुंतले होते.

दोन प्रहरचा सूर्य कलला होता. गार वार्‍याची सुरुवात झाली होती. विश्वासराव,गोमाजी नाईक, वैद्ययज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले,

“सरकार, आज बोलत नाही ?’
“काय बोलू, गोमाजीपंत ? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती,
आठवतं?

“हो! मासाहेबांचं मन हळवंच आहे.’

“ते खरं; पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही, तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं. ‘

“मी बोलू?” शास्त्रीबुवांनी विचारले.
“बोला ना.’
“मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. ‘

“चांगलं सांगितलंत! ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांच्याबद्दल काही चांगलं सांगा ना!

“त्याची काळजी सोडा. मी निश्चिंत आहे.’ शास्त्री म्हणाले.

“आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी… वैद्यांनी पुस्ती जोडली.

त्याच वेळी सद्रेच्या पायऱ्या चढून दासी आली. अदबीने म्हणाली,

“सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखाया लागलंय्‌. म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितलाय्‌.’

“अंदाज चुकायचा नाही. वैद्यराज पुटपुटले.
“मीही तेच म्हणत होतो.’ शास्त्रयांनी समाधानाचा नि:श्वास टाकला.
सारे गडबडीने उठले. उठून काहीही उपयोग नाही, हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले.

वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले. संध्याकाळ झाली दिवेलागणीची वेळ आली, तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती, ती सुइणींची, दासींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे
केव्हाच गेले होते.

दिवेलागण झाली. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सद्रेत येरझाऱ्या घालीत होते. पलोते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे, हे कुणालाच समजत नव्हते.

-आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली,“सरकार, मुलगा झाला!’

विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला. शास्त्रीबुवा घटका, पळे मोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले. विश्वासराव म्हणाले

“देवीची कृपा!’

विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळविण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला.

बाळ-बाळंतिणीला सुवासिनींनी कढत पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तीनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्तिवाचन झाले. दासी-सुइणींच्या मुखांवर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या

शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले. बाळावरून सुवर्णमोहरांचा सतका केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले,

“राणीसाहेब, शास्त्री आलेत.’
जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला.

शास्त्रयांच्यासाठी मृगाजिन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शास्त्यांनी पंचांग उघडले. बाळंतघराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले :

“श्रीगणेशाय नम:। शुभं भवतु…

शास्त्रीबुवांनी बोटे मोजली. घटकापळांचे गणित मांडले. कुंडलीची घरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईच्याकडे पाहिले

जिजाबाई म्हणाल्या,

शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज या मितीला

या पोराचे वडील शत्रूमागे धावताहेत. याचा थोरला भाऊ लहान. त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. सार्‍या मुलुखाची अन्नात्न दशा झालेली आहे… आणि परमुलुखात, परठिकाणी, ना माहेरी, ना सासरी आज मी याला जन्म देत आहे. पोटात असता ही तर्‍हा! आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत, तेवढं सांगून
टाका.’

ते ऐकून साऱ्यांची मने व्यथित झाली; पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मितवदनाने म्हणाले,

“राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका! अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं. भाग्य उजाडलं. प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे.’

जिजाबाई खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या,

“मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो. ‘

शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल, खणखणीत आवाजात बोलते झाले,

“राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर या शास्त्याचं भाकीत खोटं ठरलं नाही.
द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते
कालत्रयी चुकणार नाही. हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. राणीसाहेब, पापाचा भार
वाढला असता, धरित्री त्रस्त झाली असता, देवकी-वसुदेव कंसाच्या बंदिशाळेत असतानाच
श्रीकृष्ण जन्माला आला, हे कृपा करून विसरू नका.’

“आपल्या तोंडात साखर पडो!” जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर
कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते.

यापुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०४”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!