छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ७ History of shivaji maharaj

या विषयीचा पहिला भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

History of shivaji maharaj बाल शिवाजी वर्षाचा झाला, त्या वेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले.: गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारीत नव्हते. जिकडे जावे, तिकडे भुकेकंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत.

जिवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मूठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार करावयास मागे-पुढे पाहत नव्हते. सारा मुलूख असुरक्षित बनला होता. पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूख सोडला होता. राहिली होती फक्त घारी आणि गिधाडे. ती मात्र सदैव आकाशात
घिरट्या घालताना नजरेला येत होती. साऱ्या प्रदेशात धष्ट पुष्ट कोणी दिसत असतील, तर तेवढेच! मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता! याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्यासुरल्या वस्त्या मोगलाईच्या स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूख दोन
वर्षांत बेचिराख झाला.

विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेविला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. आत येणाऱ्या माणसाची कसून चोकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली होती. गंगा-जमुना अर्ध्या राहिल्या होत्या.
पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबारखाना आणि गंजीखाना जीवमोलाने राखला जात होता.

शिवाजी दोन वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली. उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलत होते…

एके दिवशी दोन प्रहरी पूर्वेला ढगांची कनात धरली गेली. वारा मंदावता-मंदावता थांबला. कनात आकाशात चढत होती. काळी भोर, लक्‍्खन वीज चमकली; आणि मंद गडगडाट घुमला. बाल शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते.

एक चक्री वादळ धुळीचा भोवरा खेळवीत माळवदातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजी महाराजांनी विचारले,

“पाऊस आला?

“होय, राजा! आलाच तो.’
पुन्हा वीज चमकली. आसमंत त्या आवाजात कडाडून गेले. बाळ शिवाजी आईला बिलगले. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आदब बजावीत पुढे येत होता. ताड ताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला धावले. गारा फुटून उडत होत्या.बाळ शिवाजी त्या वेचण्यासाठी सद्रेत धावत होते. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. सगळ्या वाडाभर गळत्या झाल्या. पण त्याचे कुणाला दु:ख नव्हते. मातीच्या वासाने सारे वातावरण धुंदावले होते.

पाऊस थांबताच सारे वाड्याबाहेर पडले. एका पावसाने धरित्रीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले; व तो म्हणाला,

“आई, ते बघ!’

“बाळ, ते इंद्रधनुष्य!

शिवाजी पुटपुटला; पण काही जमले नाही. तो लाजला.

वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या,

“संकट टळलं! चालू साली मनाजोगा पाऊस पडेल.’

“असं दिसतं खरं.’

“पाऊस नव्हता, तो पाऊस आला. आता कशात अडलं?

“राणीसाहेब! पाऊस पडला; पण गावं ओस पडली, तिथं जमिनी कसणार कोण?’“कोण म्हणजे? जे आहेत, ते.’

“जुन्नररची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे.’
“मग गड खाली करू या.’
“आं!’

“आ काय? मुलूख सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन, घरं-दारं यांचे तुम्हीच जबाबदार! आपण सगळे खाली जाऊ. तेवढी शेती पेरून घेऊ.’

सार्‍या गडावर उत्साह संचारला. शाही मेणे गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा गजबजून गेला. गावाच्या घरांवरून उगवलेले, जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. जनावरं हाताशी होती, तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार- जो आजवर अस्सल हत्यारे तयार करीत होता, तो नांगरांचे फाळ बसवू लागला.

सुतारशाळेत कुळव, दिंडोरी तयार होऊ लागली…. आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली.

हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी कळा दिसू लागली. डोंगरचे रान गर्द पालवीने परत एकदा सजले. लेण्याद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगरकपारींतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले.

दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने परत गावी येत होती. उभारलेल्या शिवाराने आनंदून कष्टांत सामील होत होती.

विश्वासराव वाड्याबाहेर पडले, की हट्टाने शिवाजी त्यांच्याबरोबर असे. उन्हातून, पावसातून तो विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे. वाढती पिके कोतुकाने पाहत असे.

जिजाबाई म्हणत,
“हा कुणबावा होणार, वाटतं.’

“मग त्यात काय बिघडलं? आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात. पण
शेतकरी मालक मिळणं कठीण.’
जिजाबाई समाधानाने हसल्या.

मुलूख जरा स्थिर झालेला पाहताच उमाबाई जायला निघाल्या. जिजाऊंना बरोबर चलण्याचा त्यांनी खूप आग्रह केला; पण जिजाबाई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या,

“सासूबाई! मला का इथं राहण्याची होस आहे? पण स्वारींचं सांगणं झाल्याखेरीज मी कशी हालू?’

उमाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाऊ-शिवाजींना आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या वेरूळला निघून गेल्या.

वर्षभरात परत जिजाबाई गडावर आल्या. मोगलांची नोकरी सोडन शहाजीराजांनी निजामशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. मोगलांनी दोलताबाद घेतले, तरी शहाजीराजे हताश झाले नाहीत. त्यांनी नव्या शहाला माहुलीवर नेऊन ठेविले. विजापूरकर आणि मोगल एक झाले. या दोन प्रचंड शाह्यांशी तावता करणे इतके सोपे नव्हते.
निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी स्वत: उभारली; आणि मोगलांशी सामना दिला. एका जहागिरदाराने नवा बंडावा उभारून मोगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळा. दोन वर्षांत प्रबळ मोगली सत्तेने शहाजीराजांचा बंडावा मोडून काढला; आणि नाइलाजाने शहाजीराजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली. यात सहा वर्षांचा काल निघून गेला. सहा वर्षांच्या दीर्घ कालानंतर शहाजीराजांना स्वस्थता, स्थैर्य प्राप्त झाले.

या मधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता; तट्टावरून रपेटी करीत होता. लेण्याद्री आणि आजूबाजूचा मुलूख त्याच्या नजरेखालून जात होता. शास्त्रीबुवांनी त्याला अक्षरांची ओळख करून दिली होती.

सात वर्षे गेली; आणि विजापूरहून खलिता आला. खलित्याबरोबर घोडदळ होते. शाही मेणे होते; काबाडीचे बेल होते.

जिजाबाईंनी खलिता उघडला. शहाजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती. त्यांचाअत्यंत विश्वासू, चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव त्यांनी पाठविला होता. दादोजींच्या बरोबर पुण्याला हलण्याची आज्ञा होती
जिजाबाईंनी दादोजींना बोलावणे पाठविले. दादोजींनी सदरेवर येऊन मुजरा केला. वार्धम्याकडे नुकतेच झुकलेले गौर कांतीचे दादोजी उभे होते. मस्तकी पागोटे, अंगात अंगरखा आणि पायी तलम धोतर होते. रुंद कपाळ आणि तीक्ष्ण नजर त्यांचा दरारा वाढवीत होती. जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला. शिवबांना त्या म्हणाल्या,

“राजे, दादोजींना मुजरा करा.’

शिवाजीराजांनी मुजरा केला. दादोजी म्हणाले,

“राणीसाहेब, आम्ही मुजरा करायचा; राजांनी नव्हे.’

“इतरांत आणि आपल्यांत फरक आहे. आम्हांला का ते कळत नाही? आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून ज्यांना पाठविण्यात आलं, ते का कमी विश्वासाचे
असतील?!

“राणीसाहेब, केव्हा निघायचं ?’

“आपण म्हणाल, तेव्हा! सध्या स्वारी कुठं आहे ?’

“राजे कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतले आहेत. ते मोकळे असते, तर तेच आले असते. ‘

“शेवटी ज्यांनी आपली जहागीर जाळली, त्यांच्याच पदरी नोकरी करायची पाळी आली ना!

“राणीसाहेब, राजकारण एकपदरी नसतं. ते अनेकपदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगाबरोबर बदलत असतं. ज्या मुरार जगदेवानं पुणं जाळलं, त्याच मुरार जगदेवाबरोबर राजांचं एवढं सख्य वाढलं की, नांगरगावाला महाराज जगदेव यांची तुला शहाजीराजांच्या देखरेखीनं पार पडली. नांगरगावचं “तुळापूर झालं. राजकारणाचे परत डाव फिरले. फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदिलशहांच्या अवकृपेला बळी पडले. त्यांचा अत्यंत क्रूरतेनं वध झाला.’

“आणि स्वारी ?’
“राजांचं आदिलशाहीत जेवढं वजन आहे, तेवढं कुणाचंच नाही. राजांना बारा हजारांची मनसब आहे; ‘राजा’ ही किताबत आहे. पुणे-सुप्याची जहागीर त्यांच्याकडेच आहे ऐश्वर्यसंपत्न, अधिकारसंपन्न, राजे बंगळुरात सुखाने वास्तव्य करीत आहेत; आपल्या पराक्रमानं आज कर्नाटक गाजवीत आहेत.’

दोन दिवसांत जिजाबाईंची तयारी झाली. सहा वर्षांच्या परिचयात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता. विश्वासराव, लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जात असता आतड्यांना पीळ पडत होता. गडावरच्या सार्‍या माणसांना जिजाबाईंनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या. चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंनी जिजाऊंची ओटी भरली. भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले; आणि विश्वासराव-लक्ष्मीबाईंनी त्यांना निरोप दिला.

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.