बाजींद भाग १८

खंडोजी ने एक दीर्घ श्वास सोडला आणि त्या चौघांकडे एक दृष्टिक्षेप टाकला.
सर्जा,सखाराम,नारायण आणि मल्हारी गंभीर पणे खंडोजी भूतकाळ त्याच्याच तोंडून ऐकत होते..!

एव्हाना खूप दूर आपण चालत आलो आहोत याची जाणीव त्या पाचही जणांना झाली.

सखाराम बोलला….खंडोजीराव,तुमची कथा लईच भारी वळणावर गेली हाय गड्या.
जित्रापांच आवाज बी वळकता येत्यात हि मातूर नवालच हाय…!

नवाल ?
नवाल नव्हे…महाआश्चर्य होते ते.
खंडोजी बोलून गेला.

सर्जा मध्येच थांबवून सखाराम ला बोलला…कारभारी हि कथा ऐकत लई लांब आलूया आपण..निदान खंडोजीराव निदान सांगा तरी अजून कितीसा दूर जायाचं हाय आपणासनी ?

खंडोजी बोलला…झालं..अजून एक दोन कोसावर जंगलात एक गुहा लागेल..!
तिथे पोहचला कि आमचे वस्ताद काका भेटतील.
तेच तुम्हाला पुढे शिवाजी महाराजांच्या खासगीत घेऊन जातील आणि तुमचे काम मार्गी लागेल..!

यावर मल्हारी बोलला…वस्ताद घेऊन जातील म्हणजे तुम्ही नाही का येत सोबत ?
खंडोजीकडे पाहत मल्हारी बोलला.

मी नाही येऊ शकणार गड्यानो…माफ करा.
मला माझ्या कर्तव्यात कसूर नाही करता यायची.
मी मोहिमेवर असलेला शिपाईगडी,अजून मला सावित्रीला शोधायची आहे.

पण,तुम्हाला मी वाट दाखवतो गुहेची…तिथं गेलात की मी,सावीत्री तुम्हाला भेटलो होतो हे सांगू नका काकांना.
विनाकारण आमची काळजी करत बसलेले असतात,उलट त्यांना सांगा…खंडोजी आणि सावीत्री आयुष्यभर स्वराज्य आणि भगव्यासाठीच जगतील… आणि त्यासाठीच मरतील..!
खंडोजी खिन्न पणे बोलला..!

पण,नकाच बोलू त्यांना की मी तुम्हाला इथवर आणले आहे.

यावर सखाराम बोलला..अहो,पण ते विचारतील ना की एवढया गुप्त वाटेने तुम्ही कसे काय आला ते ?

थोडा वेळ शांत राहून खंडोजीने त्याच्या दंडावर बांधलेली चांदीची पेटी काढली आणि सखाराम च्या हातात देत बोलला…वस्ताद काका काही विचारायच्या आत ही पेटी त्यांना दाखव आणि परवलीचा एक शब्द सांग त्यांना……”चंदन”

सखाराम ने ती पेटी जवळ घेतली आणि खंडोजीकडे पाहत बोलला…

बर मग आम्ही चौघेच जाऊन येऊ म्हणता वस्तदाना भेटायला ?

होकारार्थी मान हालवत खंडोजी बोलला ,होय सखाराम ..तुम्ही तुमची टकमकाची समस्या बोला त्यांना…ते लगेच तुम्हाला खाजगीकडे पत्र देऊन रवाना करतील.
तिकडे गेला की तुम्हाला शिवाजी महाराजांना भेटायला मिळेल आणि तुमची समस्यां कायमची सुटेल…!

हे ऐकताच चोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला…!

चला,अजून 1-2 कोस मी तुमच्यासोबत येतो,मग तिथून मी येऊ शकत नाही.
तुमचे काम झाले की मलाही सुटका मिळेल.
आता तुमचे काम ते माझे काम आहे असे वाटू लागले आहे…!

Bajind bhag 18

ते पाचही जण पुन्हा जंगलातील ती वाट चालू लागले…!

काही क्षण गेले आणि मल्हारी बोलला…खंडोजीराव पुढे काय झाले हो ,मगाशी सांगता सांगता थांबला….!

खंडोजी हसला आणि पुन्हा भूतकाळात रममाण झाला….!

बाजींद च्या फौजेचा भगवा ध्वज मला व सावीत्री ला धक्का देणारा होता.
तो ध्वज केवळ मराठ्यांची फौज वापरत होती आणि बाजींद तर भूतच आहे असे माझे आणि सावित्रीचे मत होते.
मग हा काय प्रकार असावा असे माझ्या मनात आले..!

मी मुजरा करुन होताच बाजींद माझ्या समोर आला..

आणि बोलू लागला..

खंडोजी राव…आम्ही तुम्हास व सावित्रीला ओळखतो,जणू काही आजवर आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत..!

सावीत्री…काल तुझ्या मागे भिल्ल होते आणि तू इथे आलीस तेव्हा तुझ्या हातावर शिरक्याचे चिन्ह पाहताच मी समजलो की तू शिरक्याची सावीत्री आहेस,आणि खंडोजी तुम्ही बहिर्जी नाईकांच्या खास मर्जीतले….!

हे सर्व ऐकताच खंडोजी व सावीत्री थक्क झाली.
आश्चर्याने ते बाजींद कडे पाहू लागले…खंडोजी बोलला…!

पण,तुम्ही कोण आहात ?
100 वर्षे झाली बाजींद च्या कथेला…तुम्ही भूत आहात ??

यावर हसत बाजींद बोलला…भूत ?
होय,जगासाठी आम्ही भुताची फौज आहोत.
भूत म्हणून जगण्यातच आमचे खरे वैभव आहे…!
पण,आम्ही भूत नाही…..!
तुमच्यासारखीच आम्हीही माणसे आहोत.
आम्हालाही 100 वर्षे ज्या गोष्टीसाठी असे जीवन स्वीकारले त्यातून मुक्ती पाहिजे खंडोजीराव,म्हणून आम्ही आजवर तुम्हा दोघांची वाट पाहतोय…!

काय ?
आम्हा दोघांची वाट पाहताय?
खंडोजी आश्चर्याने बोलला….!
मला खरोखर इथे काय घडतंय सांगा…तुम्ही आमची वाट पाहताय याचा काय अर्थ ?
मला जाणून घ्यायचे आहे सर्व…!

बाजींद शांतपणे बोलू लागला……….

त्या दिवशी हुसेनखान व त्याच्या फौजेने केलेली गद्दारी चंद्रगड च्या विनाशाला कारणीभूत ठरली होती.
नूरजहा आणि बाजींद दोघेही गतप्राण झाले होते…चंद्रगड च्या जंगलातील झाडून सारे प्राणी हुसेनखानाच्या फौजेचा बळी घेत होते.
चंद्रगड चे वैभव जळून खाक होत होते…!

दिवस उगवला….साऱ्या चंद्रगड ची मसणवाट झाली होती..!

कोणीही जिवंत नव्हते…ठायी ठायी गतप्राण झालेले वीर दिसत होते…तितक्यात एक पोरगासावळा मुलगा जखमी अवस्थेत बाहेर पडला…!

त्याचे सुर्यकांत नाव …….!

चंद्रगड च्या सरदेसाई घरण्यातलाच त्याचाशी जन्म..!
बाजींद चा चुलत भाऊ…बाजींद म्हणजे साऱ्या चंद्रगड ची शान होती…!
पण,आता सर्व संपले होते.

तो मुलगा हेलखावे खात बाजींद ला शोधू लागला,रात्रीच त्याची लवलवणारी तलवार त्याने पाहिली होती…!
दुरुनच ती चमकली आणि त्याने ओळखले, की बाजींद इथेच आहे…!

काळजातुन आरपार गेलेला बाण त्यांने ताकतीने उपसला…रक्ताचा धबधबा सुरु झाला आणि एक आर्त किंकाळी फुटली…!

बाजींदचा पुढील भाग १९वा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!