धना भाग १७

“धना”

भाग १७ वा

पाटलांच्या गावात सशस्त्र गावकर्यांनी एकच कल्लोळ केला होता,काहीही होवो पण पाटलांच्या मुलीला परत आणले पाहिजे.
तेवढ्यात गावातील एक गावकरी कोल्हापुरातून धापा टाकत आला …तो पोलीस मुख्यालयात कामाला होता आणि तो पाटलाना सांगू लागला…पाटील..आज सकाळपासून हजारो वनखात्याचे जवान एकत्र जमले होते,सशस्त्र जवानांची हजाराची तुकडी वनअधिकारी सुर्याजीरावांच्या आदेशाने कोणत्यातरी गुप्त मोहिमेवर जात आहे असे वाटते ,इतर बातम्या काही केल्या समजू शकल्या नाहीत.


पण पन्हाळगडाच्या रस्त्याकडे जवानांची तुकडी जाताना दिसली.!
वस्ताद,पाटील आणि गावातील प्रमुख मंडळी यांनी चर्चा सुरु केली.


सूर्याजीराव स्वता फौजेसह निघालेत म्हणजे नक्कीच त्या हत्ती प्रकरणाचा छडा लागला असेल..!
आपण निवडक तालमीतील सशस्त्र पोर जमवून जोतिबाच्या डोंगराकडून त्यांच्या मागोमाग जाऊया ..!
या पाटलांच्या बोलण्यावर सर्वांचे एकमत झाले.


तरुण सळसळत्या रक्ताची हजार एक पोर बरचे,भाले,कुऱ्हाडी,धनुष्यबाण,बंदुका,काडतुसे दोरखंड घेऊन पाटलांच्या वाड्यासमोर जमा झाले.
वास्तदानी सर्वाना काम समजावून सांगितले ,आणि सारे जोतिबाच्या डोंगराकडे निघाली….!

सूर्याजीने राजलक्ष्मी ला सोबत घेतले आणि जवानांच्या प्रमुख अधिकार्यांना सूचना केली,ठरलेल्या ठिकाणी जात आहोत पण माझ्या आदेशाशिवाय शस्त्र चालवू नका असे आदेश द्या सर्वाना.
मोहीम फत्ते झाले कि सर्वांनी कोल्हापूर वनमुख्यालयात एकत्र यावे.


जर काही अनुचित प्रकार झाला तर जीव वाचवून माघारी फिरावे,लढण्याचे,शस्त्र चालवायचे सर्व परवाने सरकारने आपल्याला दिले आहेत.
जो हत्ती पर्वा कुस्त्यावेळी मारला गेला तो मारणारे मोठे संघटन आपल्या हाती लागत आहे ,त्याना पकडले किंवा मारले तर पुढील कित्येक वर्ष अनेक गुन्हे बंद होतील आणि अनेक गुन्ह्यांचा छडा लागेल अशी मला खात्री आहे.!


अधिकार्यांनी माना हालवून हा संदेश सर्व जवानांना दिला.
सूर्याजीने मात्र धना,संघटन आणि इतर गोष्टी अजून तरी गुप्तच ठेवल्या होत्या..!

इकडे किल्ल्यावर राजांनी धनाला बोलावून आणले.
सेनापती,धना आणि सारे सैन्य समोर उभा होते …राजे करार्या आवाजात बोलू लागले..!
गड्यांनो ,ठरलेल्या नियोजनानुसार आपण उद्या हि जागा सोडणार होतो ,मात्र गुप्तहेरांच्या माहितीनुसार जे व्हायला नको होते ते झाले आहे.पोलिस आपल्या मागावर आहेत.आपल्याला निघावे लागणार ते आत्ताच..याच वेळी..!


वाटा,गुप्तवाटा,गुहा यांच्या सहाय्याने ५० /५० जणांचे समूह करत कराड,सोलापूर,कोकण,कर्नाटक,या भागातून निसटून चला.
तुम्हाला पर्वा दिलेल्या सूचनेनुसार पुढील २ वर्षे कुठे राहायचे याची माहिती तुम्हाला माहिती आहेच.
प्रसंगी प्राण गमवावा लागला तरी बेहत्तर पण संघटनेची गुप्तता महत्वाची आहे.
आणि तुम्ही निघताना जर पोलिसांच्या नजरेत आलात तर जे जे डोळे तुम्हाला पाहतील ते कायमचे मिटवा ….एकालाही जिवंत ठेवू नका ….संपवा सारे पोलीस.
राजांच्या करारी बोलण्याने सर्वजन चांगलेच सावध झाले.


इतक्यात एक हारकारी जो उंच डोंगरावर दबा धरून परिसरावर नजर ठेवून होता तो धावत आला आणि राजाना मुजरा करून बोलला..राजे पन्हाळ्याच्या बाजूने हालचाल दिसत आहे,जवळपास हजार एक पोलीस किंवा सैन्य हात्यारबंद असावेत ..इथे यायला अजून ३ तास तर लागतील ….!!


राजांना याची चाहूल होतीच..पण इतक्या लौकर येतील हे माहिती नव्हते ..!
ते सैन्याला बोलू लागले ….चला तयारीला लागा..!
पुढच्या क्षणाला हि जागा रिकामी पाहिजे ..आणि सर्व सैन्य कामाला लागले.
राजानी धना आणि सेनापती यांना थांबायची सूचना केली..!
सैन्याची शिस्त कमालीची होती.
५० /५० जणांचे गट तयार करून सभोवतालच्या गुप्त वाटेला लागली.


काहीजण कर्हाड च्या बाजूला..काही सोलापूरकडे,काही तळकोकणात ,तर काही कर्नाटक रस्त्याला लागले ..तिथून राजस्थान आणि आंध्र या दोन राज्यातील जंगली प्रदेशात ते जाणार होते ..कुठे जायचे ,कोणाला भेटायचे याची तरतूद शेलार मामानी आधीच केली होती..!
राजांनी सेनापती आणि धना ला आदेश केले ..सेनापती आपण धनासोबत राहावे.
आणि धना या २ वर्षात तू राजस्थान प्रांतात राहशील.


सेनापती तुझ्या सोबत असतील ..या २ वर्षात भावनेवर नियंत्रण ठेव ,तू आमचा भावी राजा आहेस ,तुला तुझ्या वडिलांच्या अपुर्या स्वप्नासाठी जगायचे आहे..!
सेनापती नी होकारार्थी मान हलवली पण धना खिन्न होता ..तो उत्तरला ..राजे मला शेवटचे गावी जायचे होते ..निदान आईला पाहून तर आलो असतो..!
यावर राजे उत्तरले ..नाही धनाजी …प्रसंग बाका आहे.


आपल्यापैकी एकजण जरी पोलिसांना सापडला तरी ते आपल्या सर्वांचे अपयश आहे ..ऐक माझे ..मी स्वता येऊन तुला एक दिवस गावी नेईन ..पण आत्ता निघून जा…!
नाईलाजाने धना होय म्हणाला पण मनातील भावनेचा आवेग मोठा मोठा तो सांभाळणे अशक्य होते..!
पूर्वीचा गावचा एकुलता एक मोठा पैलवान धना ,राजलक्ष्मीच्या प्रेमात स्वताला हरवून स्वप्नात रममाण होणारा धना,आईच्या प्रेमात लाहनाचा मोठा झालेला धना,गावकर्यांच्या प्रेमाने आनंदी होणारा धना …आता एका वेगळ्याच भूमिकेत होता ,वडिलांच्या स्वप्नामुळे,देशभक्तीच्या आवेगामुळे धना आता एक जबाबदार घटक होता..!


जबाबदारी हि एक अशी गोष्ट आहे जी एकदा उरावर पडली कि मोठ्यातले मोठे दुख सुध्दा उघड करायची भीती वाटते ,डोळ्यात आलेले अश्रू आताच थांवून उसन्या आवसानाने आपण कठोर मनाचे आहोत हे जगाला दाखवावे लागते ,पण आतले दुख आणि भावनांचा महापूर इतका प्रलयंकारी असतो कि त्याची तीव्रता फक्त त्याच व्यक्तीला माहित असते.
धनाच्या बाबतीत असेच झाले होते.


पोलादी शरीराचा,धिप्पाड अंगकाठीचा धना मनाने तितकाच पोलादी असेल असे राजांना वाटत होते आणि वरवर धनाची आपण असेच आहोत असे भासवत होता पण त्याच्या मनाने एकसारखा राजलक्ष्मी चा धावा सुरु केला होता ,त्याचे डोळे तिचे ते सौंदर्य एक झलक का होईना ते पहायला आतुर होते ,त्याचे कान तिचा मंजुळ स्वर ऐकायला अधीर होते आणि सर्वांग तिच्या एका मिठीसाठी चातकासारखे जणू जन्मोजन्मी तहानलेले असावेत असे झाले होते..!,

सूर्याजी व सेनेने कोलाह्पूर ओलांडून पन्हाळ्याच्या डोंगररांगेत प्रवेश केला होता ,बरेच सैन्य पुढे गेले होते ,१०० जणांची एक तुकडी घेऊन सूर्याजी शेलार मामांच्या प्रशिक्षण केंद्रात जावू शेलार मामाना अटक करायला निघाला होता किंबहुना शेलार मामांकडून इतरही गोष्टी समजतील असे त्याला वाटत होते..!
शेलार मामांचे प्रशिक्षण केंद्र जवळ आले पण सर्वत्र सामसूम दिसत होते.


सूर्याजीला आठवत होते त्यांचे ते नागपुरातील भाषण ….जणू काही सैन्य,संरक्षणदल,हेरगिरी यात पीएचडी केल्यासारखे त्यांचे एक एक बोल होते ,सूर्याजी त्यांचा भक्त होता पण कर्तव्यापुढे त्याला भक्तीचा हा आवेग आवरायला लागत होते..!
धनाने सोबत आणलेल्या ५ जवानांना आदेश दिले कि केंद्रात आत प्रवेश करा,जो शस्त्र उचलेल त्याला जिवंत ठेवू नका आणि इतर जवानांनी केंद्राला वेढा द्या …!


ते जवान क्षणात आदेशाची अंमल बजावणी करायला बंदुका सावरत निघाले आणि मुख्य गेट जवळ आले …गेटच्या दुतर्फा बांधलेला अदृश्य वाघर त्याना दिसली नाही ,जमिनीपासून केवळ १ इंच अंतरावर सुताची एक अतिशय कमी जाडीची दोरी बांधली होती ..जवानाच्या बुटात अडकून ती तुटली ..आणि धडाड ..धड ..धड असा प्रचंड स्फोट झाला….आगीच्या ज्वाला गगनात पोहोचल्या आणि वेढा दिलेले जवान एका क्षणात बाजूला हटले आणि जे पाच जन आत जात होते त्यांचे तुकडेही सापडणे मुश्कील होते….!


जीवांच्या आकांताने सारे सैन्य मागे हटले…सुर्याजीच्या डोक्यात मात्र लख्ख प्रकश पडला..सोबत आणलेल्या राजलक्ष्मी च्या काळजात धडकी भरली ..!


सूर्याजी आपण समजत होतो इतके हे प्रकरण सोपे नाही याची जाणीव त्याला झाली.
जो माणूस इतरांना हेरगिरी,सैन्यातील तृटी सांगतो तो स्वता किती सावध असेल याची काडीमात्रही कल्पना सुर्याजीच्या मनाला नव्हती…!
पण संपले होते सारे ….संघटनेच्या विरुध्द असलेल्या मोहिमेचा शुभारंभ इतक्या मोठ्या स्फोटाने होत असेल तर प्रत्यक्ष संघटना किती भयानक असावे याचे गणित सूर्याजी मनात मांडू लागला ….

आणि या सर्वांचा म्होरक्या धना आहे तो किती भयानक माणूस असावा याची देखील कल्पना त्याला आली,अश्या भयानक संघटनेच्या मुख्यालयावर आपण हल्ला करून धना आणि राजलक्ष्मीची भेट घडवणार असे म्हणालो..हे शक्य होईल का अश्या शंकेने त्याच्या मनात घर केले….!

किल्ल्यावर सर्वांच्या नजरेत त्या स्फोटाच्या ज्वाला आणि आवाज दिसला आणि राजांनी ओळखले कि मामांचा पहिला डाव यशस्वी झाला आहे..!
आता आपण मात्र चुकायला नको होते ,आपणही त्वरित हि जागा खाली केली पाहिजे असा विचार करत राजे स्वताही एका गुप्त गुहेकडे निघाले..!


सेनापती आणि धना सोबत ५० एक शिलेदार एका गुप्त वाटेने कराड मार्गे उत्तर भारतात जायला निघाले..!
मात्र धनाच्या मनात राजलक्ष्मी होती.त्याला राहून राहून वाटत होते कि माझी आणि राजलक्ष्मी ची भेट होईल …त्याने सेनापतीचा हात धरला आणि बोलला ..सेनापती मी तुमच्या पाया पडतो पण माझा एक अर्ज मंजूर करा …मला फक्त एकदा राजलक्ष्मीला भेटू द्या …धनाच्या या एवढ्या हळव्या पण दुर्बलता दर्शवनार्या बोलण्याने सेनापतीला धनाच्या दुखाची चाहूल लागली..!


त्याने धनाचा हात हाती घेतला आणि होकाराठी मान हलवली..!
कमरेला असलेले रेव्होल्वहार काढून धनाच्या कमरेला खोवत सेनापती नी सोबतच्या जवानांना आदेश दिले….तुम्ही कर्हाड वाटेला लागा ..आम्ही मागून येतो ,,काळजी नसावी….!


इकडे किल्ल्याच्या सर्व भागात गुप्त पद्धतीने स्फोटके पेरून झाली होती.
किल्ल्यात ५ तासाच्या अवधीत हि स्फोटके आपोआप उडतील अशी व्यवस्था केली होती ज्याला वेळनियोजित स्फोट असे म्हणतात..!
स्फोटके पेरून राजे व कर्नाटक वाटेच्या गुप्त मार्गाला लागली आणि काही क्षणात दिसेनासी झाली….!


सेनेतील कोणालाच किल्ल्यात पेरलेल्या स्फोटकांची माहिती नव्हती.
या स्फोटाने संघटनेची गुप्तता कायम राहणार होती आणि सारे पुरावे जाळून खाक होणार होते…!
धना आणि सेनापती किल्ल्याच्या विरुध्द दिशेला असलेल्या त्याच्या गावी निघाली ,धनाच्या गावात गुप्तवेशात जाऊन राजलक्ष्मी कुठे असेल याची माहिती काढून तिला भेटूनच मग राजस्थान मार्ग धरावा असे सेनापती आणि धनाने नियोजन केले होते.आणि ते झपाझप पावले टाकत निघाली.


काही अंतर चालून झाले आणि जंगलाच्या पुढच्या बाजूने काही व्यक्ती हातात शस्त्रे घेऊन किल्ल्याकडेच येत असावीत असा अंदाज सेनापती आणि धना ला आला ….!
बघता बघता हि संख्या पाचशे ते हजार असावी असे वाटले.


पाटील आणि गावकरी सशस्त्र होवून पोलीस ज्या मार्गाने जात आहेत त्या मार्गाने पोलिसांच्या मागे जावे असा अंदाज करत जंगलातून येत होती ,मात्र त्यांचा अंदाज चुकला होता …..ते किल्ल्याच्या बाजूला येत होते..!


धना आणि सेनापती एका उंच झाडावर चढून टेहळणी करू लागले आणि पुढून हे गावकरी आणि बरोबर पाठीमागून एका तासाच्या अंतरावर सेनेच्या वेशातील सशस्त्र जवान येत होते.
फक्त एकच तास हे दोन्ही समोरासमोर येणार अशी खात्री दोघांची झाली..!


सेनापती नि पुढचा धोका ओळखला ..तो म्हणाला धना अरे हे वेगळेच प्रकरण आहे ..हे समोरून कोण येत आहेत ?
पाठीमागे वन खात्यातील सैन्य आहे पण पुढचे कोण ?
धनाने अंदाज बांधला तो म्हणाले सेनापती हे आमचे गावकरी असावेत,मला खात्री आहे ,पण ते इकडे का येत आहेत मला कल्पना नाही,कदाचित त्याना किल्ल्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली असावी …!


सेनापती बोलले….इकडून जाणे आपल्याला धोकादायक आहे.
गावकार्यानी तुला पहायला नको.
आपण पाठीमागून जिकडून सैन्य येत आहे त्याच्या बाजूबाजूने कोल्हापूरकडे पसार होवुया आणि तिथून तुझ्या गावी ….!
धनाला ते पटले आणि झेपा टाकत ते निघाले…!

इकडे सूर्याजीने राजलक्ष्मीला ला सोबत घेऊन आपण चूक तर केली नाही ना याची शंका आली.
पण त्याचे बरोबरच होते ,समजा धनाच्या साथीदाराने हल्ला केला तर राजलक्ष्मी मुळे धना हल्ला करणार नाही ..आणि समजा आमच्याकडून झालेल्या गोळीबारात धना मारला गेला तर राजलक्ष्मीला धना कधीच पाहता येणार नाही.
जर नशिबाने दोन्ही बाजूनी बोलणी सुरु झाली तर धना आणि राजलक्ष्मीला मिळवून देऊन इतर सारे लोक अटक करायचे असा विचार करत सूर्याजी निघाला होता..!
जंगल दाट असल्याने सारे सैन्य शिस्तबध्द निघाले होते आणि पुढच्या बाजूने धना आणि सेनापती अगदी बिनाबोभाट सुर्याजीच्या सेनेच्या अगदी जवळ आला ,पण हे लोक झाडावर उंच चढून अंदाज घेऊन मगच पुढे जात असत.
धना आणि सेनापती ला सैन्याची चाहूल लागली आणि ते एका उंच झाडावर चढून दबा धरून बसले….!


खालून सूर्याजीची सेना निघाली होती ,सेनेच्या हातात बंदुका होत्या ..धना आणि सेनापती निरीक्षण करू लागले…आणि धनाची दृष्टी सूर्याजीसोबत असलेल्या राजलक्ष्मी वर पडली आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढले..त्याला भावना अनावर झाल्या आणि तो तोंड उघडणार इतक्यात सेनापती ने त्याचे तोंड दाबले आणि बोलला धना थांब …शांत हो..काहीतरी करुया आपण …!


ते झाडावरून उतरणार इतक्यात समोरच्या झाडावरून सूं..सूं..करत एक बाण आला आणि धनाच्या अंगावरील काळ्या वस्राला भेदुन झाडात घुसला….सेनापती आणि धनाला धक्का बसला..त्यानी पुढच्या झाडावर पाहिले तर समोरच्या झाडावर काळे वस्त्र तोंडाला गुंडाळलेली एक एक व्यक्ति हातात धनुष्यबान घेऊन लपून बसली होती ती धना व् सेनापती ला हातवारे करत खुणवत होती..खाली उतरु नका…!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!