सरनौबत हंबीरराव मोहिते भाग ०२

प्रकरण दुसरे
हंसाजीरावांचे (हंबीररावांचे) बालपण


१) प्रस्तावना
महाराष्ट्राच्या इतिहासात १७ वे शतक हे राजकीय परिवर्तनाचे शतक होते.छत्रपती शिवाजी महाराज हे या परिवर्तनाचे जनक होते. त्यांच्या राजकीय धोरणाची, दूरदृष्टीची आणि कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन याच शतकाच्या उत्तरार्धात मराठी समाज नव्या ध्येयाने जागृत झाला. त्यांनी आपल्या अस्मितेचा ठसा त्या काळावर आणि नंतरच्या सुमारे १५० वर्षाच्या इतिहासावर उमटविला.


छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील इतर सत्तांशी संघर्ष करुन महाराष्ट्रामध्ये ‘हिंदवी स्वराज्य’ निर्माण केले. त्यामुळे मराठ्यांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्वराज्य, स्वधर्म व संस्कृती यांच्या रक्षणार्थ, प्रसंगी प्राणांचेही मोल देणारे अनेक मराठा घराणी व कर्तबगार पिढी महाराष्ट्रामध्ये उदयास आली.अशा मराठा घरण्यापैकीच मोहिते हे एक घराणे होय. हे घराणे १६व्या शतकापासून अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये लष्करी सेवा चाकरी करीत होते.

१७व्या शतकाच्या पूर्वार्धात विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अनेक युद्ध-मोहिमामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केल्याने ‘तळबीड’ (ता.कराड जि.सातारा) ची देशमुखी मोहिते घराण्याला मिळालेली होती. तेव्हापासून ते तळबीडचे (बाजी मोहिते) देशमुख म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या परिसरात त्यांनी चांगलेच वैभव प्राप्त केले होते.आता आपण त्यांच्या जन्माविषयी जाणून घेऊयात.

२) हंसाजीचा जन्म
मोहिते घराणे हे महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न घराण्यापैकी होते. इतिहासाला ज्ञात असलेल्या मोहिते घराण्यातील रतोजी मोहिते यांना तुकोजी मोहिते नावाचा कर्तुत्ववान मुलगा होता. त्यानेच तळबीडच्या पाटीलकीचा वाद मिटवून तेथील पाटीलकी मोहिते घराण्याकडे घेतली होती. तेंव्हापासून तळबीडचे मोहिते पाटील किंवा देशमुख म्हणून ओळखू लागले.


तुकोजी मोहिते यांना संभाजी व धारोजी नावाची मुले व तुकाबाई नावाची मुलगी होती. यांचे नातेसंबंध तत्कालीन घाटगे, घोरपडे व भोसले घराण्याशी निर्माण झालेले होते. मोहिते घराण्यातील संभाजी मोहिते यांना हरिफराय, हंसाजी, शंकराजी आणि सोयराबाई व अण्णुबाई अशी पाच मुले होती. हंसाजीच्या जन्म व मृत्यु संबंधीचे पुरावे अद्यापही मिळाले नसल्यामुळे त्यांचा कालखंड कोणता होता हे निश्चित सांगता येत नाही. परंतु तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा संदर्भ घेऊन काही अंशी अंदाज बांधता येतो.
प्रसिद्ध इतिहास संशोक डॉ.आप्पासाहेब पवार यांनी ‘ताराबाईकालीन कागदपत्रे, खंड पहिला’ मध्ये संभाजी व धारोजी मोहितेच्या पराक्रमा विषयीचे अनेक कागदपत्रे प्रकाशित केलेली आहेत. संभाजी व धारोजी मोहिते यांनी आदिलशाहीमध्ये चांगली कामगिरी केल्याचे स्पष्ट होते. तर डॉ.जयसिंगराव पवार यांनी ‘शिव-विजय’ ग्रंथात, पान क्रमांक अठरा वर संभाजी व धारोजी मोहितेंचा विवाह घाटके व घोरपडे घराण्यातील मुलीशी झालेला असून, इ.स.१६२२ मध्ये आदिलशाहीतील सरदार घाटके व घोरपडे यांनी आपल्या सासऱ्यांना आदिलशाहीमध्ये रुजू केले. तेंव्हापासून मोहिते हे आदिलशाहीमध्ये सेवा चाकरी करु लागले.
त्यावेळी शहाजीराजे भोसले जुलै १६२५ मध्ये निजामशाही सोडून आदिलशाहीमध्ये सरलष्कर झाले. तेंव्हा शहाजी राजांना शिक्षा करण्यासाठी मलिक अंबरने साबाजी अनंत नावाच्या सरदाराला सैन्य देऊन पाठविले. शहाजी राजांना निजामशाही सैन्याने सालप्याच्या घाटात इ.स.१६२५ मध्ये अडविले. अशा प्रसंगी संभाजी व धारोजी मोहिते बंधुनी शहाजी राजांना कठीण प्रसंगी मदत केल्यामुळे शहाजी राजांना साबाजी अनंतचा पराभव करता आला व स्वतःला वाचविता आले. या मदतीची परतफेड म्हणून शहाजी राजांनी आदिलशहाकडे विनंती करुन मोहिते बंधुना तळबीडच्या देशमुखीचे अधिकार मिळवून दिले. याची जाण ठेवून मोहिते बंधुनी त्यांच्या बहिणीचा (तुकाबाईचा) विवाह एप्रिल १६२७ मध्ये शहाजी राजांशी करून दिला. यांच्या पोटी व्यंकोजी नावाचा मुलगा ‘इ.स.१६३१’ झाला.
संभाजी मोहिते यांना हरिफराय, हंसाजी व शंकराजी ही मुले होती. पण यांचा जन्म केव्हा व कोठे झाला याबाबत पुरावा नाही. मात्र संभाजी मोहितेची बहीण तुकाबाई हिला शहाजी राजापासून इ.स.१६३१ मध्ये व्यंकोजी नावाचा मुलगा झाला हे सत्य आहे. म्हणजेच व्यंकोजीच्या अगोदर हरिफराय नावाच्या मुलाचा जन्म झाला असावा व नंतर हंसाजी (हंबीरराव) हे व्यंकोजी राजांचे समकालीन असावेत आणि त्यानंतर शंकराजी, सोयराबाई व अण्णुबाई ही मुले जन्मास आली असावीत. संभाजी मोहिते हे तुकाबाईपेक्षा मोठे होते. त्यांचे लग्न तुकाबाईच्या अगोदर झाल्याने काही मुले जन्मास आलेली असावित. यावरुन हंसाजीचा जन्म १६३१ मधील असावा.
हंसाजीचे मूळ नाव बह्माजी असे असून ‘अमीरराव’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे ‘हंबीरराव’ हा शब्द तयार झाला. याचे उपनाव चव्हाण होते. हंसाजीचे बालपण सुप्याच्या गढीत गेले. त्यांचे वडिल पराक्रमी असल्यामुळे तो वारसा त्यांना लाभला. त्या काळामध्ये सरदार घराण्यातील त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून लष्करातील नामांकित सैनिक किंवा पंडित मंडळी ठेवली जात होती. त्यामुळे हंसाजीला अतिशय चांगल्या पद्धतीचे लष्करी शिक्षण मिळाले असले पाहिजे. कारण त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा स्वामीनिष्ठा, सचोटी इत्यादी गुण त्यांच्यात असल्यामुळे पुढील काळात सरसेनापती पदापर्यंत ते जावून पोहचले होते.

हंसाजी मोहिते यांचा विवाह कधी व कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला या बाबत अजून तरी साधने उपलब्ध झाली नाहीत. पण त्यांचा विवाह तत्कालीन काळातील नामवंत घराण्यातील मुलीशी झालेला असावा. कारण हंसाजीच्या पोटी महाराणी ताराबाईचा जन्म झाला. (राजारामाची पत्नी) हिने जो पराक्रम गाजविला या वरुन हंसाजीची पत्नी ही सुद्धा एका पराक्रमी व्यक्तीची मुलगी असली पाहिजे.


हंसाजीच्या व्यक्तीमत्वावर त्यांच्या वडिलाचा प्रभाव पडलेला होता. वडिल संभाजी मोहितेंनी अनेक युद्ध मोहिमांमध्ये पराक्रम गाजवून आपल्या धन्याला खुष ठेवले होते. ज्यावेळी त्यांचा ‘शहाजी राजांशी संबंध आला. तेंव्हापासून शहाजी राजांबरोबर एकनिष्टेने प्रत्येक प्रसंगात सहकार्य करुन दाखविले आहे. सालप्याच्या लढाईत अनुलनीय पराक्रम करुन शहाजी राजांना साथ दिलेली होती.

त्यामुळेच शहाजी राजे आदिलशाहीत आपले वर्चस्व निर्माण करु शकले. त्यांच्या मुलास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करता आले. जर सालप्याच्या युद्धाप्रसंगी संभाजी मोहिते यांनी सहकार्य केले नसते तर हिंदवी स्वराज्य उदयास आले नसते.

इ.स.१६४६ मध्ये शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील पुणे, चाकण इत्यादी प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली घेतल्यानंतर सुपेच्या प्रदेशाची मागणी संभाजी मोहिते यांच्याकडे केली असता त्यांनी तो देण्यास नकार दिलेला होता. कारण शहाजी राजांवर त्यांची निष्ठा होती. त्या प्रदेशाचा कारभार करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी मोहिते यांच्या बाबत वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण करुन ठेवले आहे.


शिवचरित्र साहित्य खंड ३ रा पेज क्र.६९८

सुपे परगणा शुहूर सन १०४९ (२४ मे १६४८ ते २३ मे १६४९) मध्ये सुपे पराणा शुहूर सन १०५० (२४ मे १६४९ ते २३ मे १६५०) मध्ये तो परगणा शहाजीला मुकासा म्हणून मिळाला. त्यावर्षी काही काळ तो शहाजीकडून पोटमुकासा म्हणून शिवाजीकडे होता. पण त्यानंतर लवकरच शहाजीने तो परगणा शिवाजीकडून काढून घेतला असे दिसते. शहाजीच्या वतीने त्या पराण्याचा सरहवालदार म्हणून संभाजी मोहिते २६ ऑक्टोबर १६५२ च्या पूर्वीपासून काम पहात होता. शिवाजीने २४ सप्टेंबर १६५६ रोजी संभाजी मोहित्यास कैद करुन त्या परगण्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्या परगण्यावर शिवाजीची सत्ता चालत होती.’

सुपे पराणा व सुप्याची गढी स्वराज्याच्या पूर्वेस होती. हा परगणाही शहाजीराजांच्या जहागिरीतीलच होता. पण या वेळी याचा कारभार शहाजी राजांनी संभाजी मोहित्याकडे सोपविला होता. संभाजी मोहिते शहाजीराजांच्या दुसऱ्या राणीसाहेबांचे (तुकाबाईचे) बंधू म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र मामा मोहिते मामाकडे सुपे परगण्याची सरहवालदारी दिली होती.

ही सत्यता असून संभाजी मोहिते यांच्यावर आरोप जे केले जातात. ‘मोहिते मामा जुलमी. लाचखावू अमलदार होते. तसेच ते शिवरायांच्या नियंत्रणाबाहेर होते. पण याबाबतचा एकही पुरावा नाही. इतिहासकारांनी भोसले व मोहिते घराण्यासंबंधात कपोलकल्पीत स्वरुपाचे लिखाण करुन ठेवले आहे. वास्तविक शहाजी राजे आणि संभाजी व धारोजी मोहिते हे निजामशाहीत असताना ते एकमेकांना चांगले ओळखत होते. आदिलशाहीमध्ये असताना शहाजीराजे यांना निजामशाहीकडून संपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. अशा प्रसंगी मोहिते बंधुनी शहाजी राजांना मदत केलेली होती. त्यावेळी आदिलशाहीमध्ये मोहितेंचे चांगलेच वजन होते. त्यांना शहाजीराजांची साथ मिळाली आणि दोघेही एकमेकांना मोठे करण्यासाठी प्रयत्न करीत होते.


शहाजीच्या सहकार्याने तळबीडच्या देशस्त्रीचे अधिकार मिळाले होते. तसेच सुप्याचे सरहवालदार म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. यावेळी नाते संबंध निर्माण झाल्याने सर्वकाही गोष्टी पूर्णतः प्राप्त झालेल्या होत्या. संभाजी मोहिते लाचखावू व जुलमी असते तर शहाजी राजांनी त्यांच्याशी कसलेही संबंध ठेवले नसते.


तसेच संभाजी मोहिते यांच्या बाबत कृष्णाजी अनंत सभासद ‘ म्हणतो,

संभाजी मोहिता म्हणोन सावत्र आईचा भाऊ, मामा होता. तो महाराजानी महालावरी ठेविला होता. त्याचे भेटीस शिमग्याचे सणास पोस्त मागावयास म्हणून गेले. मामास कैद करुन ठेविले. त्याचे तीनशे घोडे पागेचे होते व द्रव्यही बहून होते. वस्तभाव, कापड हस्तगत करुन सुपे देश साधिला’

यावरुन असे स्पष्ट होते की, छत्रपती शिवरायांनी संभाजी मोहिते यांच्यावर लष्करी कारवाई करुन त्यांचा पराभव केला. आणि सुपे हा प्रांत स्वराज्यामध्ये घेतला. संभाजी मोहीते यांना छत्रपती शिवरायांनी तात्काळ स्वराज्यात सामील होण्याचे पत्र लिहीले. परंतु मोहिते शहाजी राजाची परवानगी घेतल्याशिवाय सुप्याचा ताग सोडण्यास तयार होईनात आता काही तरी करुन मामांची भेट घेतली पाहिजे असे महाराजांनी ठरवले. शिमग्याच्या दिवसात पोस्त मागल्याच्या बहाव्याने महाराज काही मावळ्यांना बरोबर घेऊन सुप्यास गेले. सुप्याचा प्रांत व पागा हस्तगत केली. मामांना स्वराज्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. परंतु मामा काही कबूल होईनात तेंव्हा त्यांना शहाजीराजाकडे बंगळूर येथे मोठ्या आदराने पाठवण्यात आले.


जर शिवाजी महाराजांना सुपे घेण्यासाठी संभाजी मोहिते याच्यांशी संघर्ष करावा लागला असता तर ‘संभाजी मोहिते यांनी आपल्या लेकीचा म्हणजे सोयराबाईचा विवाह शिवरायांशी इ.स.१६५० मध्ये लावला नसता.एकंदरीत संभाजी मोहिते हे यांच्यावर केलेले आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. स्वतः प्रत्येक प्रसंगातून मित्रत्व नातेसंबंध योग्य पद्धतीने सांभाळलेले आहेत.

तसेच भोसले घराण्यावर त्यांचे प्रेम, माया, आपुलकी होती. त्यांचे संबध जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा, स्वामीनिष्ठपणा, कृर्तृव्यपणाची जाण होती या सर्व गुणांचा वारसा त्यांच्या सर्व कुटुंबावर होता. त्याचेच द्योतक म्हणजे सेनापती म्हणून हंसाजी यांनी केलेले कार्य होय म्हणून मराठ्याच्या दोन छत्रपतींना कधीही मागे वळून पहाण्याची त्याच्यावर वेळ आलेली नव्हती. अशा अत्यूच्च गुणांचा वारसा हंसाजीवर पडलेला असून त्यांचे संपूर्ण बालपण संभाजी मोहिते यांच्या देखरेखीत गेले. पण हंसाजीचा जन्म नेमका केंव्हा व कोठे झाला या बाबत अद्याप पुरावा नसल्यामुळे निश्चित सांगता येत नसले तरी त्यांचा जन्म बहुतेक सुप्याच्या गढीमध्ये झालेला असावा.

1 thought on “सरनौबत हंबीरराव मोहिते भाग ०२”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!