शिवनेरीच्या पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते.
दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टिपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे
अधिक अधिक अस्वस्थ होत होते.
“आबासाहेब, मासाहेब आल्या.’ शंभूराजे म्हणाले .
‘कुठं?’ मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले.
शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणांत धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. आंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. तीन
घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली.
घोडदोडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. तीन मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोऱ्या आल्या.
“अशी ठायी ठायी थांबत आम्ही दौड करीत राहिलो, तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही.’
“तेच सांगणार होते मी!’
“मतलब? शहाजीराजांनी विचारले.
“आपण पुढं जावं.’
“आणि तुम्ही ?’
“पुढचा प्रवास झेपेल, असं वाटत नाही.’
“मग अशा आडवाटी आपल्याला टाकून…
“जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप, तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे…
शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले, “हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे. त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यान् पिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत, म्हणावं.’
“मी काय बोलणार यात?” जिजाबाई बोलून गेल्या.
“तुम्ही म्हणता, तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल, तर तो तुम्हांला सोडून देईल, अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हांला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं?
आपले अश्रू कष्टाने आवरून, काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या.
जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले; जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बेठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले,
“विश्वासराव, नाइलाजानं तुम्हांला ही तकलीफ देत आहो. त्याबद्दल आम्ही शरमिंदे आहो.’
‘राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली, असं आम्ही समजतो. जिवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू.’
“तो विश्वास नसता, तर आम्ही आलोच नसतो, आम्हांला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना? का राहणार?
जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला, “आम्ही येणार.’
“शाबास!” शहाजीराजे म्हणाले.
“थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला, तर नाही का चालणार ?’ जिजाऊ म्हणाल्या.
“ऐका, विश्वासराव. बाळाला धोका आहे, आणि आम्हांला नाही.’
“तसं म्हटलं नाही मी.’ जिजाबाई गडबडीने म्हणाल्या.
“आम्ही शंभूबाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत, राणीसाहेब. आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, संक्रोजी नीळकंठ, सोनोजीपंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदीदेखील आहे. आम्ही स्थिरस्थावर झालो, की तुम्हांला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा.
शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वाकताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यांत साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले, तेव्हा शहाजीराजांच्याबरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता- एकदाही मागे न पाहता.
जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन, जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते.
जुन्नरवर रात्र उतरली. घराघरांतून समया, पलोते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरची दिवटी वाऱ्याने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती…
आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते.
सदरेवरच्या भिंतींवर टांगलेली शस्त्रे पलित्यांच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानांवर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाज्याकडे वळले… आणि त्याच वेळी दरवाज्यातून जासूद धावत आला.
“घात झाला! लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय्. ते इकडंच येत आहेत.’

“चांगल्या मुहूर्तार आले..’ म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली. विश्वासरावांनी चार पावलांत दरवाजा गाठला; आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहऱ्यावर त्वेष होता.
‘कुठं आहे तो भोसला?’ लखुजी गर्जले.
“प्रथम तलवार म्यान करावी, आणि आत यावं…’ विश्वासरावांनी सांगितले.
“मुकाट्यानं वाट सोड.” लखुजी म्हणाले.
शांतपणे विश्वासराव म्हणाले,
“सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही.
लखुजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला,
‘कुठं आहे तो भोसला ?’
“ते इथं नाहीत.
“दडला असेल.
“दडून बसण्याइतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही.’
छद्मीपणाने हसत लखुजी म्हणाले, “पळून जाण्याइतपत झालेली आहे?
विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले,
“खबरदार, जाधवराव! फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही.’
“हं:! अर्ज करीत नाही मी.’ लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले, “हाती समशेर आहे. हो बाजूला. ‘
क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन म्यान चोकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली.
“ही हिंमत!” म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली, तोच आवाज झाला,
“आबा!
त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला.
विश्वासरावांनी वाट दिली, तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते.
जिऊ! केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या! लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी! ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली…
लखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्टासारखे ते पुढे सरकत असता, त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले,
“जिऊ$$’
“आबा!” म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चोकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती.
उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले, विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले,
“मामासाहेब, क्षमा करा.
व्वा, विश्वासराव! क्षमा कसली मागता? उलट, तुमची तडफ पाहून आम्हांला आनंद झाला. भोसल्यांच्यामध्ये नसले, तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहेत, हे पाहून आम्हांला आनंद वाटतो.
आपल्या बोलण्यावर खूश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले; आणि आपण एकटेच हसतो आहोत, याची जाणीव होऊन हसता-हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत ते म्हणाले,
“पोरी, तुझं बरं आहे ना?’
“बरं! काय विचारता, आबा?’ बोलता-बोलता जिजाबाई थांबल्या.
लखुजीराव म्हणाले, “बोल ना, पोरी. थांबलीस का?’
जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळेच दु:ख उन्मळून उठले.
काही कळायच्या आत त्या बोलून गेल्या,
“पोरीची जात म्हणजे हळदी-बुक््क्याची. कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळ
केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जिऊची हळद अशीच उधळलीत.
अजून ती वाऱ्यावर फिरते आहे.’
“वाऱ्यावर का?’ लखुजी गर्जले. ‘या लखुजी जाधवाची कूस इतकी वारेमोल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल. मला माझी पोर जड नाही.
“पोरीवर एवढी माया आहे, तर हा दावा कसला? कुणाबरोबर? हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं, तर बरं वाटेल तुम्हांला? आबा, ह्या जिऊची तुम्हांला शपथ…’
लखुजीरावांनी एकदम जिजाबाईंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले,
“नको, पोरी, बोलू नको! शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं, तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर! ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण यत आलं. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे.
पोरी, माझा तुला झाशीवा आहे. अखंड सोभाग्यवती हो! या बापाची काळजी करू नको. गेला, तरी दुःख मानू नको.’
जिजाबाईच्या डोळ्यांतून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले,
“रडू नको, पोरी! ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूख. माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चोफेर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक! माझ्याबरोबर सिंदखेडला चल. ते तुझंच माहेर आहे.
सगळं ठीक झाल्यावर, म्हणशील तिथं राहा.
नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, “नको, आबा, मी जाधवांची माहेरवाशीण असले, तरी भोसल्यांची सासुरवाशीण आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले, तर भोसल्यांच्या घराण्याशी बेइमानी होईल. ‘
नि:श्वास सोडून लखुजी म्हणाले, “एक कोडं सोडवायला गेलं, की दुसरं पडतं. पोटची पोर तू. अवघडलेली. नवऱ्यानं सोडून दिलेली… आणि हा तुझा बाप, लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही.
“असं म्हणू नका, आबा. पुष्कळ करता येईल.’
“सांग, पोरी… काय करू?
“आबा, तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला ठेवून चला. तिथं मला बरं वाटेल.’
“तुला काय म्हणायचं, कळतंय् मला… विश्वासराव!
विश्वासराव सदरेवर आले. ‘जी.’
‘उद्या मेण्याची व्यवस्था करा. अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जिऊ गडावरच असलेली बरी.’
“मी तेच करणार होतो. गड आपलाच आहे. आता एकच विनंती आहे.’
“विनंती कसली? लहान असला, तरी आज्ञा करा. आमची लेक, जाधवांची अब्रू आज तुमच्या हाती आहे. ‘
“लहान तोंडी मोठा घास धेऊन बोलतो. तुमच्या वैराचा तुम्हांला संताप असेल. पण भोसले-जाधवांचं वैर आज मला देवाचं देणं वाटतं आहे.’
“काय म्हणता!” लखुजी उद्वारले.
“हे वैर नसतं, तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते? भोसले-कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती ?’
“वा! विश्वासराव, शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं. पण तुमच्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो.’
“माझ्या विनंतीचं काय?”
“कसली विनंती ?’
“आपण आणि आपल्या शिबंदीनं इथंच हात ओले करावेत, एवढं मागणं आहे.’ “शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरचा झालं आहे. कदाचित सारी रात्र दौड करावी
लागेल, या हिशेबानं आम्ही मांड ठोकली होती. आमचं वय झालं. आम्ही एक वेळ जेवतो. जनावरांची चंदी पाहिलीत, तर…’
“ती व्यवस्था करूनच आलो. पण कधी नाही ते पाय घरी लागले. …राणीसाहेब, तुम्ही सांगा ना….’
जिजाबाई संकोचाने म्हणाल्या, “तुम्ही दोघेही मला थोर. आबा…’
‘ठीक आहे. विश्वासराव, रात्र झाली. फार कष्ट देऊ नका. आम्ही थोडा दूधभात घेऊ.’
माजघरात चांदीच्या फुल्या मारलेल्या पाट मांडला होता. चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. विश्वासरावांनी लखुजीरावांना पाटापाशी नेले.
“हे काय? एकच पाट? आणि तुम्ही ?’
“माझं झालं आहे. आपण यायच्या आधीच…
“हे खरं नाही! तुम्ही पण बसा. पुन्हा हा योग येईल, न येईल…
आणखी पाट मांडले गेले. विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती. पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले,
“आता नको, फार झालं.’
विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे तुमचं घरं आहे. तुम्हीच आबासाहेबांना वाढा.
जिजाऊंनी पदर कसला. त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले, आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले. लखुजी म्हणाले,
“तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार.
सारे हसले. पुलावा वाढीत असता तो थांबवण्याकरिता लखुजींचे हात पुढे येईनात. जिजाबाईंनी वर पाहिले. लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठच्या कुठे गेले. लखुजींचे डोळे भरले होते. जिजाऊ म्हणाल्या,
“आबा $$’
डोळे टिपत लखुजी म्हणाले, “वाढ, पोरी. आज भूक पुरी होऊ दे. या राजकारणाच्या
वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसांत मिळालं नव्हतं.’
-आणि पंगतीला एक नवे रूप प्राप्त झाले.
पुढील भाग लिंक येथे क्लिक करा.