This is second part of History of shivaji maharaj
याआगीदरचा भाग ०१ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव नीळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे हीभोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती.
एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चोकाच्या एका कोपऱ्यात उभे होते.विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानारळाने ओटी भरत होती.
भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या. लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या. जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली. मेणा उचलला गेला.
जुन्नरच्या माळावरून मेणा गडाकडे चालू लागल्या. मेण्याच्या मागे-पुढे घोडेस्वार चालत होते. लखुजी, विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते. गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली.
लखुजीराव पायउतार झाले. विश्वासराव म्हणाले,
“हो! पण वाट पायर्यांची आहे. मेणा सांभाळायला हवा. उगीच वर-खाली होतो.’मेणा गड चढत होता. मेण्यावर हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते.
गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हत्तीदरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले,तर जुन्नरखोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते. पीरदरवाज्यापुढे चढण सुरू झाली.
भोई अलगद मेणा नेत होते. लखुजी “आस्ते, आस्ते,’ म्हणत चालले होते. मेण्याच्या कुंई कुंड आवाज फक्त येत होता. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेणा शिवाईच्या देवळाकडे वळला. मंदिराजवळ मेणा थाबंला. मेणा जमिनीला टेकताच मेण्याचा पडदा सरकावला गेला. जिजाबाईंनी विचारले,
“गड आला ?
“जिऊ,’ लखुजीराव म्हणाले, ‘शिवाईचं दर्शन घे; आणि मग गडावर जाऊ.’
जिजाबाई मेण्याबाहेर आल्या. त्यांनी देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवीमंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलेले. पूजासाहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या. लखुजीराव, विश्वासराव मागून जात होते.
देवळात जाताच विश्वासराव म्हणाले,
“राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथं मागितलेलं वाया जात नाही.’
जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले
“मुली, एक काम करशील?’ विचार एकदम बदलीत ते म्हणाले, “सांगेन! नंतर सांगेन.
गडावर पोहोचायला उन्हे वर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गडमाथा येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेणा थांबला.
जिजाबाई गड निरखीत होत्या. लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणेदिशेला गेले. तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले,
“जिऊ, एकटी आहेस, असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारख्या संरक्षक असता भीती कसली ?’
जिजाऊंनी हात जोडले.
महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले.
“पोरी, खुळी का तू? तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही, तरी नातवाचं मुख पाहायला मी येईन… बरी आठवण झाली.” म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला.
ते म्हणाले, ‘हे एकशे एक होन आहेत. देवळात मी, नंतर सांगेन, असं म्हणालो होतो ना? तिथं मी नवस बोललो. मुलगा झाला, की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे.
देवीकृपेनं असं पोर हया पोटी येईल, की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्याच्याकडे पाहून तुझी मान ताठ राहील. दु:खाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नको. येतो मी.!
वाड्याबाहेर येताच नारो त्रिमळ, हनुमंते, गोमाजी नाईक, पानसंबळ यांनी मुजरे केले.लखुजी म्हणाले,

“तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हांला चिंता नाही.
त्यांना सांभाळा. ‘
“जी!” नाईक म्हणाले.
लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली.
“विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत; पण राहवत नाही, म्हणून…
“नको, मामासाहेब. काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा.
“तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही, तर ठेवायचा कुणावर? अडचण असली, तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. रामराम…’
परत मुजरे झडले. विश्वासराव चार पावले पोहोचवायला गेले.
शिबंदीचे शिपाई गड न्याहळीत फिरत होते. सूर्य मस्तकावर आला होता.
पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा