छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०२

बाळकृष्ण! शिवबांचे बाळ! पहिले बाळराजे!” गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशीक मनावर लक्ष-लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या “थोरल्या आऊ ” झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैकवेळा घुमलं होतं.
पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थतेने! मुलाच्या दर्शनाने ‘आऊपण ? धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघे ‘स्त्रीपण * धन्य होते!

स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्काला विचारले, “कुणासारखे गं दिसतात बाळराजे? ”

“जितनित राजेसायबावानी! ”

“राजेसाहेब!” जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. “ घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील. अंबा जाणे! राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती! आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर! भोसल्यांच्या पुरुषांना
मागल्या कबिल्याचा पायगोवा राहात नाही, हेच खरं! ‘ “हूं – जगदंब, जगदंब!” करीत जिजाऊंनी एक निःश्वास सोडला. कितीतरी उदंड कढ त्या निःश्वासात भरले होते.

राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला.

आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतींवर रोमांच-रोमांच उठवीत होते! उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले. “पाचवी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे! ‘ त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठयावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला!

नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली.

“सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई,” म्हणत त्यांनी वाकून ती थैली
उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्या वेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरूज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी, निळ्या, वैशाखी आभाळाला खबर देत होते.

“राजश्रियाविराजित, सकळगुणमंडित, भोसलेकुलावतंस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणीसरकार वज्चुडेमंडित सईबाईसाहेब प्रसूत जाहल्या! पुत्ररत्न प्राप्त
जाहले! ”

आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या राउळांतले देव आपोआप “सोयरात * पडत होते!

पुरंदरच्या सदरमहालात बैठकीवर बसून जिजाबाई खलित्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हणमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते.

बाहेर अठरा कारखान्यांतील असामींना, पांढऱ्या गलमिश्यांचे गोमाजी नाईक पाणसंबळ, खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठींनी वाटत होते. कुणीतरी लगटीने गोमाजीबाबांच्याच तोंडात साखरमूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजीबाबांच्या पांढऱ्याधोट मिशीत अडकले होते.

संभाजी महाराज जन्मकुंडली

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!