धना भाग ०२ dhana bhag 02


इर्षेने त्याच पैलवानाला पुढच्या मैदानात धरून पाडायचे असा विचार गाव करत होता.

धना मात्र अत्यंत तळमळत होता. धना आणि पाटलांच्या मुलीचे प्रेमप्रकरण गावभर झाले. पाटलांनी आईला बोलावून घेतले. पाटील मोठ्या मनाचे होते.
धनाच्या सर्व खुराकाचे पैसे ते स्वत देत असत, धनावर आणि त्याच्या खेळण्याच्या लकबीवर पाटलांचा फार जीव.
पाटलांनी मोठ्या मनाने आपल्या मुलीला बोलावून घेतले.

”राजलक्ष्मी”
पाटलांनी आपल्या मुलीला हाक मारली. धडधडत्या छातीने ती समोर आली.
पाटलांच्या चारचौकी वाड्यातील बैठकीच्या खोलीत धनाची आई, वस्ताद काका आणि पाटील बसले होते.


पाटलांनी आपुलकीच्या शब्दात विचारले,
”राजलक्ष्मी, गावात काय चर्चा सुरु आहे ?
ती खरी आहे का ?
तुझ्या मनात काय आहे ?
”राजलक्ष्मी”, भरल्या डोळ्यांनी हुंदके देऊ लागले, मात्र पाटील अजूनही शांतच होते.


त्यांनी कठोर शब्दात आवाज केला, तुला धनाबरोबर लग्न करायचे आहे का ?तरीही ती मान वर न करता काहीच बोलली नाही.राजलक्ष्मी आत धावत गेली आणि रडू लागली.

पाटलांनी वस्ताद काकांना आणि धनाच्या आईला आदेश केला,
”काका, धनाच्या आणि राजलक्ष्मीच्या लग्नाची तयारी करा”
आजवर इज्जतीने जगत आलोय आम्ही, पण नको ते पदरात पडायच्या आधी धना काय वाईट मुलगा नाही. गावचा पैलवान आहे.आम्ही लग्नासाठी तयार आहोत” असे बोलून पाटील आत निघून गेले
धनाच्या आईला हुंदका आवरेना. काका आणि धनाची आई घरी आल्या……!

धना पायाला लेप लावत बसला होता. काकानी आणि आई आल्यावर त्याने उठायचा प्रयत्न केला, मात्र काकांनी त्याला जाग्यावरच बस अशी खून केली.
धना खाली मान घालून तसाच बसून राहिला.


धनाची आई रडू लागली.
म्हणू लागली,
”गावाच्या इज्जतीसाठी ह्याच्या बानं ८ वर्षे घराचे तोंड पहिली नाही, दिवाळसण, दसरा सगळ काय तालमीतच केल, पण नशिबान त्याला पण फक्त माझ्यामुळ अधूपण आल, मी त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. माझ्यावरच्या प्रेमामुळे त्यांना सुध्दा कुस्ती सोडावी लागली. मोठा पैलवान होण्याचे स्वप्न अधुरे राहिले म्हणून भर जवानीतच त्याना मरणान गाठलं. त्यांचे स्वप्न धना पूर्ण करेल अस वाटत होत, पण ह्यान पण…… ”
असा म्हणत आई हुंदके देऊन रडू लागली.


धनाच्या पण डोळ्यातून पाणी गळू लागले, त्याला केलेल्या चुकीची जाणीव झालीच होती आधी, पण हि गोष्ट ऐकून तर त्याला फार मोठा धक्का बसला.
त्यांनी जिवावर दगड ठेवून निर्धाराने वस्ताद काकांना शब्द दिला ,
”वस्ताद काका, येत्या २ महिन्यात बिल्ला पंजाबी ला पाडीन नाहीतर परत तोंड दाखवणार नाही गावाला”
हे ऐकून मात्र वस्ताद काकांना आनंद गगनात मावेना.
ते धावत पाटलांच्या घरी आले.


पाटिल खांद्याला डबल बारी बन्दुक अड़कवुन आणि काडतुसाचा पट्टा अडकवुन कुठे तरी गड़बडीत जायच्या तयारीत होते… ,
तेव्हडयात काका आले, घडलेली हकीकत सांगितले.
वस्तादाना वाटले पाटिल पण खुश होतील,
पण पाटील चिडले. ते म्हणाले
वस्ताद काका, धनाची कुस्ती संपली कायमची. त्याला लग्नाची तयारी कर म्हणाव.


आम्हाला एकच मुलगी आहे, इज्जत आणि मुलीचे सुख यातच मला सर्वकाही आहे. धनाची हि चूक माफ करण्यासारखी नव्हती, या पंचक्रोशीत सर्जेराव पाटिल म्हणजे काय आहे हे तुम्ही जाणून आहात, धन्याच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला बंदुकीच्या एका गोळीत वर धाडले असते.


बाकी काही न विचारत लग्नाची तयारी करा.
असे बोलून पाटील भराभर पावले टाकत निघून गेले…..

कुठे गेले ?


गावात नरभक्षक वाघाने गेल्या १० दिवसापासून दहशत माजवली होती, त्यासाठी पाटील वनखात्याला हा प्रकार सांगायला गेले होते. पाटील गेले.


काकांना हा आता दुसरा यक्षप्रश्न निर्माण झाला होता.
त्यांनी पुन्हा धनाच्या आईला आणि धनाला हा प्रश्न सांगितला.
तो म्हणाला
”पाटलांच्या आदेशाला झुगाराने म्हणजे सगळ्या गावाचे वैर घेणे, वाळीत टाकतील पाटील”.


धना कुस्ती विसर, हो लग्नाला तयार.धना निर्धाराने बोलला,सगळ्या गावाचाच काय, जगाचा विरोध झाला तर हा धना आता पैलवान होवूनच दाखवणार काका”
असे म्हणत धना लंगडत लंगडत तालमीकडे गेला.
गुडघ्याला जुन्या चिंध्या बांधल्या. सगळ्या अंगाला तेल लावले. आणि ३ महिन्यातून प्रथमच पहिला जोर मारायला तालमीत हात टेकले, मात्र एक आर्त वेदना पायातून आली. मात्र ती सहन करत धनाने पहिल्या दिवशी १०० जोर पूर्ण केले.


धनाचा पाय सरळ होऊ लागला.


१० दिवसात चिंध्या सोडून व्यायाम करू लागला.
लंगडने पण कमी झाले. काकांनी सांगितले उद्यापासून धना तू हौद्यात उतरायचे सरावाला. धनाने होकारार्थी मान हलवली.


पाटलांच्या कानावर हि बातमी गेली कि धनाने लग्न करायला नकार देवून परत कुस्ती सुरु केली आहे. त्यांचा पारा चढला. हातात बंदूक घेतली.


२०/२५ गडी बरोबर घेवून पाटील तालमीत आले.
आल्याबरोबर त्यांनी वस्ताद काकांना जाब विचारला. वस्ताद काकांनी सर्व हकीकत सांगितली.


धनाला बोलावून घेतले, धनाने आल्या आल्या पाटलांच्या पाया पडला. पाटलांनी मात्र पाय झिडकारला. ते म्हणाले.
”नको त्या घरात शेण खाल्लेस, आणि आता लग्नाला नाही म्हणतोस याची शिक्षा एकच, म्हणत त्यांनी बंदुकीला हात घातला, चाप ओढणार इतक्यात बाकीच्या पैलवानांनी पाटलांनी बाजूला केले.


पाटील आता मात्र चिडले, ते घरी आले आणि सार्या गावाला आदेश केला कि धनाला कोण मदत करेल त्याच्या जमिनी जप्त होणार. धनाला वाळीत टाकले आहे असे समजावे.


झाले व्हायचे तेच झाले, धनाला खुराकाचा खर्च पाटील करत ते बंद झाले.
हि हकीकत राजलक्ष्मी ला समजली.


राजलक्ष्मी, आयुष्यभर सर्व सुखात वाढलेली पाटलांची मुलगी. ऐन तारुण्यात पहिल्यांदाच पर पुरुष्याच्या प्रेमात पडली. तिची व्यथा कुणालाच समजत नव्हती. जीवापाड प्रेम होते तिचे धनावर. पण बोलायचे धाडस नव्हते. तालेवाराची लेक ती.
अशी लाज सोडून बोलू शकत नव्हती.


तिला धना तर हवा होता, मात्र वडिलांच्या परवानगी तिच्या हातून काहीच घडणार नव्हते.


मात्र पाटील स्वताहून लग्नाला तयार झाले हे पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तेवढ्यात आज झालेली सर्व हकीकत तिला समजली.
ती भरल्या डोळ्यांनी वाड्यावरून एकसारखी नदीच्या वाटेकडे पाहत होती.


तेवढ्यात आर्त किंकाळ्या उठल्या, डोंगराच्या उजव्या अंगाला त्या नरभक्षक वाघाने एका पारध्याच्या पोराला उचलून नेले, पारध्याचे वडील- आई रडत रडत पाटलांच्या वाड्यावर आली.


पाटलाना समजेना काय करावे. सगळा गाव भयभीत झाला होता. रात्री सात नंतर रानात कोणी थांबेना. गावातील दारे दिवेलागनिलाच बंद होऊ लागली. सर्वत्र त्या वाघाची दहशत पसरू लागली. वनखाते गावात यायला अजून ३ दिवसांचा अवधी होता.
पाटलानी हत्यारबंद पैलवानांचा एक ताफा तयार करायचे मनोमन योजले, आणि वस्ताद काकांना बोलावून आणण्याची आज्ञा केली .

काका तालमीत आले, पोरांचा व्यायाम सुरु होता… ते थांबवत पाटिल बोलले.. पोरानो बर्चेभाले घेऊन 10/12 जण आज रात्रीला तालमीत या…गस्तीला जागावे लागणार आहे… गावात त्या वाघान हैदोस माजवला आहे…!
व्यायाम आवरा आणि या जेवण आटोपुन….,
वस्ताद गड़बडीत जायला निघाले आणि पटकन मागे फिरले.. धनाचे बलदंड शरीर घामाच्या थारोळ्यात चमकत होते..
काका बोलले… धना तू घरीच थांब,घर नको सोडू, मी उद्या तुला भेटायला येतो.

भाग ०३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “धना भाग ०२ dhana bhag 02”

  1. Pingback: धना भाग ०१ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!