छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी आग्रा मोहीम

credit-दुर्गवेडा अमित जाधव

आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले. त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते. मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला. त्याचे नाव तेजसिंह कछवा. औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता. त्याचे नाव गाझीबेग तवझुक. महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक लाख रुपये मंजूर केले होते. टी. ए.! डी. ए.!

महाराज आपल्या म्हणजेच मराठी स्वराज्याच्या प्रतिष्ठेबाबत फार दक्ष होते. औरंगाबादेस एक घटना घडली. ती पाहा. महाराज औरंगाबादेस पोहोचले. येथील शाही सुभेदार सबशिकन खान हा रिवाजाप्रमाणे महाराजांस शहराच्या वेशीवरच स्वागतासाठी सामोरा यावयास हवा होता. पण या खानाने महाराजांच्या स्वागतास स्वत: न जाता आपल्या पुतण्यास पाठविले. खानाच्या मनातील विचार असा की , हा सीवा सामान्य दर्जाचा एक जमीनदार आहे. त्याच्या स्वागतास माझ्यासारख्या ज्येष्ठ मोगल सुभेदाराने काय म्हणून जायचे ?

सबशिकनखानाने महाराजांना असा निरोप पाठविला की , ‘ तुम्ही माझ्या निवासस्थानी दिवाणखान्यात येऊन मला भेटा. ‘

महाराजांना राग आला. ते खानाच्या भेटीस गेले नाहीतच. ते सरळ औरंगाबादेतून बाहेर पडले. महाराजांनी सबशिकनला कवडीचीही किंमत दिली नाही. ही चपराक खानाला बसली. तो घाबरलाच. कारण आपल्या वागण्याचा वृत्तांत बादशाहांस कळला तर ? कळणारच. मग मात्र आपली धडगत राहणार नाही. बादशाहांच्या राजकारणास आपल्या या उर्मट वर्तनामुळे बाधा येईल. बादशाह संतापतील. म्हणून तो घाबरला. तो नजराणे घेऊन महाराजांच्या भेटीस दिल्ली दरवाजाबाहेर व्याकूळ होऊन आला. त्याने चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आर्जवपूर्वक त्याने महाराजांना आपल्याकडे मुक्कामास चलण्यास विनविले. महाराजांनीही मग फार न ताणता त्याच्या हवेलीस फक्त भेटीसाठी जाण्याचे ठरविले. मुक्कामास नाही. जर महाराजांनी याहून कडक धोरण स्वीकारले असते , तर ? आग्रा दौऱ्याच्या प्रारंभीच हा खटका उडाला असता. व्यत्ययच आला असता. अन् सबशिकनखानाचेही फार मोठे नुकसान झाले असते. दिली एवढी चपराक पुरे आहे असे ठरवून महाराज खानाच्या फक्त भेटीस दुसऱ्या दिवशी जाऊन आले. प्रकरण मिटले. पण त्यातून महाराजांचे दर्शनही घडून गेले. गाझीबेग तवझुक आणि तेजसिंह कछवा यांनाही , काय समजायचे ते समजून चुकले. ते अधिक दक्ष झाले.

महाराजांचा हा सगळा आग्रा प्रवास मोगली सत्तेखालच्या मुलुखातून चालला होता. गेल्या पाचशे वर्षांत (१२ वे १७ वे शतक) हा मुलुख कधीही स्वतंत्र झालाच नव्हता. स्वातंत्र्याकरिता कधीही बंडच झाले नव्हते. गुलामगिरी सोसता सोसता ती अंगवळणी पडली होती.

महाराज राजगडावरून निघण्यापूवीर्च औरंगजेब दिल्लीहून आग्ऱ्यास आला होता. कारण त्याचा बाप शहाजहान आग्ऱ्याच्या किल्ल्यात दि. २२ जानेवारी १६६६ या दिवशी मरण पावला. औरंगजेबानेच आपल्या वडिलांना काळजीपूर्वक कैदेत ठेवले होते. आधीची आठ वषेर् तो या कैदेत मरणाची वाट पाहात होता. ते पावले. औरंगजेब दि. २५ जाने. रोजी आईबापांच्या कबरीच्या दर्शनास ताजमहालमध्ये गेला. दर्शन घेतले.

आता तो वाट पाहात होता सीवाच्या दर्शनाची. अगदी खरं सांगायचं तर या सीवाचा कसा कसा पाणउतारा करायचा अन् त्याला कसं ठार मारायचं याचाच तो विचार करीत नव्हता का ? अनेक पुराण्यांनी आणि त्याच्या स्वत:च्याच डायरीतील नोंदींनी हे खरं ठरत नाही का ?

शिवाजीराजे आणि बादशाह औरंगजेब या दोन व्यक्तिरेखा किती विलक्षण भिन्न आहेत.

महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबास सतत कळत होते की , शिवाजीराजे कसे कसे आपल्या जवळ येत आहेत! यावषीर् त्याचा पन्नासावा वाढदिवस आग्ऱ्याच्या दिवाणे आममधल्या शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजीराजे हजर व्हावेत अशी त्याची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखा वागलेला सीवा मरहट्टा कसा आदबीने मुजरे करीत येतो ते त्याला जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांनाही मोगल साम्राज्याचा तळपता दिमाख दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली होती. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले दि. ९ मे १६६६ या दिवशी. दि. १२ मे १६६६ या दिवशी बादशाहाची पन्नासावी सालगिरा होती.

शिवाजीराजांची सर्व व्यवस्था संपर्क मध्यस्त म्हणून कुँवर रामसिंग याच्यावर बादशाहाने सोपविली होती. त्याच्या मदतीस मुखलीसखान या नावाचा सरदार देण्यात आला होता. शिवाजीराजांचे आग्ऱ्यास भरदरबारात येणे सर्वांना उत्सुकतेचे होते. पण काही शाही रिश्तेदारांना अजिबात पसंद नव्हते. औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम ही तर संतप्तच झालेली होती. तिने भावाला म्हणजे बादशाहाला अनेकदा अनेक प्रकारे या भेटीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण औरंगजेबाने हे बायकी सल्ले कधीच ऐकले नाहीत. कारण त्याला पाहायचे होते , शिवाजीराजांचे तख्तापुढे झुकलेले मस्तक. अन् नंतर पाहायचे होते तुटलेले मस्तक. शिवाजीराजे आणि औरंगजेब या दोन प्रचंड महत्त्वाकांक्षा होत्या. या आग्रा प्रकरणांत या दोन्हींचे ही दर्शन घडले. अराऊंड बॉम्बे या आपल्या पुस्तकात इ. १८८५ मध्ये डग्लसने लिहिले आहे की , या आग्रा प्रकरणाचे वर्णन करायला वॉल्टर स्कॉटच हवा. he would have been worked up the subject with all his bost of heraldry and pump in power in to glowing colours.

महाराज आग्र्यापासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर जाऊन पोहोचले. औरंगाबादेनंतर येथे पोहोचेपर्यंत कोणताही खटकणारा प्रकार प्रवासात घडला नाही. पण महाराजांच्या मनाला भीमानदी ओलांडल्यापासून ते थेट आग्र्यात पोहोचेपर्यंत एकच गोष्ट सतत खटकत असली पाहिजे. जळजळीत पित्त उफाळून यावं तशी त्यांची मनस्थिती होत असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे या भूमीची आणि भूमीपुत्रांची दुर्दशा , गुलामगिरी , लाचारी आणि तरीही मोगली तख्तापुढे कमरेपर्यंत वाकणारी मुजरेगिरी. गीता सांगणारा श्रीकृष्ण याच भागात जन्मला ना! वावरला ना! त्याच्या गीतेतल्या एकाही काना , मात्रा , वेलांटीने या मोगलांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारू नये ? फक्त एकच अपवाद. अरवली पर्वतातला महाराणा प्रतापसिंह. तोही अनेकांच्या दृष्टीने भारतीय एकात्मतेला बाधा आणणाराच ठरला ना ? अखेर प्रश्ान् पडतो , स्वदेश म्हणजे काय ? स्वराज्य म्हणजे काय ? ‘ स्व ‘ म्हणजेच काय ?

महाराजांचा सर्व आटापिटा या ‘ स्व ‘ साठी नव्हता का ?

औरंगजेबाच्या वाढदिवसाची तारीख होती १२ मे १६६६ . त्याने तीन दिवस आधीच रामसिंग आणि मुखलीसखान यांना हुकूम केला की , ‘ शिवाजीराजे वाढदिवसाच्या दरबाराला हाजिर राहिले पाहिजेत. त्यादृष्टीने राजांना कळवा. म्हणजे ते आदल्याच दिवशी (दि. ११ मे रोजी आग्ऱ्याजवळ येऊन पोहोचू शकतील. त्याप्रमाणे रामसिंगने तातडीने महाराजांच्या वाटेवर स्वार पाठविले आणि कळविले की , वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपण आग्ऱ्यापर्यंत येऊन पोहोचावे. महाराज त्याप्रमाणे खरोखरच दक्षता घेऊन आग्ऱ्यापासून जवळच सुमारे १० कि. मी. वर दिवस मावळता येऊन पोहोचले. याच ठिकाणी फक्त एक धर्मशाळा होती. तिचे नाव मुलुकचंदकी सराई.

महाराजांच्या या टप्प्यावरील आगमनाची वार्ता रामसिंग आणि मुखलिस यांना वेळेवर समजली. ते त्याप्रमाणे महाराजांच्या स्वागताकरिता साजसरंजामानिशी निघाले. ते निघणार एवढ्यात प्रत्यक्ष औरंगजेबाने या दोघांना समोर बोलावून घेतले आणि हुकूम केला की , ‘ या क्षणापासून सलीमगड महालाची गस्त पहारेदारी तुमच्यावर सोपविली आहे. ‘ सलीमगड महाल आग्ऱ्याच्या किल्ल्यातच आहे. बादशाहाचे आपल्या कुटुंबासह वास्तव्य त्यात होते.

सलीमगडची गस्त म्हणजे रात्रंदिवस पहाऱ्याची जबाबदारी कोणा ना कोणातरी महत्त्वाच्या सरदारांवरच सोपविली जात असे. ही परंपराच होती. पण एका बाजूने रामसिंग आणि मुखलिस यांना शिवाजीराजांच्या स्वागताची जबाबदारी बादशाहाने फर्मावली होती अन् त्याचवेळी त्याने महालावर गस्त घालण्याचीही जबाबदारी या दोघांवर सोपविली. दोघेही अवाक् झाले. बादशाहापुढे बोलता येत नसे. शिवाजीराजांच्या स्वागताला जाण्याचा सारा सरंजाम रद्द करून मुकाट्याने हे दोघे (अर्थात आपल्या सैन्यानिशी) सलीमगड महालाच्या गस्तीवर दाखल झाले. हा शिवाजीमहाराजांच्या स्वागताच्या सोहोळ्याची मुद्दाम फजिती करण्याकरिता बादशाहाने योजलेला डाव. महाराज तर सराईपाशी येऊन पोहोचले होते. आपल्या स्वागताला शाही प्रतिनिधी , आपल्या योग्यतेस शोभेल अशा पद्धतीने आणि शाही रिवाजांप्रमाणे नक्कीच येणार ही महाराजांची अगदी रास्त अपेक्षा होती. पण रामसिंगने पाठविलेला लाला गिरीधरलाल मुन्शी या नावाचा एक सामान्य कारकून एकटा महाराजांना भेटावयास आला. त्याने नम्रतापूर्वक महाराजांना म्हटले की , ‘ जरा व्यवस्थेत अचानक घोटाळा झाला आहे. तरी आपल्या स्वागतास उद्या सकाळी ( दि. १२ मे) शाही सरंजाम येईलच. तूर्त आजची रात्र आपण येथेच काढावी. महाराजांना हे खटकले. एवढ्या मोठ्या शाही दरबारात अशी अनास्था असावी ?

एकूण राजगडावरून निघाल्यापासून महाराजांच्या बाबतीत मोगलांकडून घडलेला हा दुसरा राजनैतिक अपमान , पहिला औरंगाबादेस. दुसरा येथे.

पण महाराजांनी तोही गिळला. समजूतदारपणे त्यांनी एक रात्र इथेच काढली.

दि. १२ मे बादशाहाचा वाढदिवस उगवला. सामान्यपणे सकाळी १० चे सुमारास हा वाढदिवसाचा कार्यक्रम आग्रा किल्ल्यात सुुरू होणार होता. म्हणजेच महाराज आणि संभाजीराजे यांना किल्ल्यात सुमारे १० वाजता पोहोचणे जरूर होते. पण बादशाहाने सलीमगडची गस्त सोडून रामसिंगला आणि मुखलिसखानला महाराजांच्या स्वागतास जाण्याची अनुज्ञा दिलीच नाही. त्याला महाराजांचा एक वेगळाच नाटकी देखावा करून घेण्याची इच्छा होती. ती म्हणजे शिवाजीराजे दरबारात उशीरा यावेत. ते आलेले दरबाऱ्यांना जाणवावेत. तेथे महाराजांनी आणि संभाजीराजांनी आपणास केलेले मुजरे आणि अर्पण केलेले नजराणे सर्वांस दिसावेत. शिवाजीसारखा भयंकर माणूस तख्तापुढे कसा वाकतो याचे कौतुक लोकांनी पाहावे ही औरंगजेबाची खरी इच्छा आणि योजना होती. म्हणून त्याने प्रत्यक्ष दरबार सुरू झाल्यानंतर शिवाजीराजांना घेण्यासाठी रामसिंग आणि मुखलिसखान यांना पाठविले. तोपर्यंत उशीर खूप झाला. त्यातून पुन्हा रस्ते चुकल्यामुळे महाराजांना आणण्यास रामसिंगलाही उशीर झाला. अनेक घोटाळे झाले. अखेर महाराजांची वाट तरी किती पाहायची , म्हणून निरुपायाने , स्वत:च्याच चुकीमुळे औरंगजेबाचा हा नाटकाचा डाव फसला. दरबार संपवावा लागला. महाराज जेव्हा आग्ऱ्याच्या किल्ल्यात प्रवेशले तेव्हा झणझणीत दुपार झाली होती. रामसिंग आणि मुखलिस त्यांच्याबरोबर होते. इतर कोणीही मराठा वकील वा अधिकारी समवेत नव्हता. यावेळी बादशाहाचे दोन दरबार संपले होते. पहिला दिवाण-ए- आम. दुसरा दिवाण-ए-खास. तिसरा एक दरबार भरत असे. त्या रिवाजाप्रमाणे बादशाह घुशलखान्यात येऊन बसला. समोर सरदारांच्या रांगा उभ्या राहिल्या. बादशाहाच्या अगदी समोर आणि सरदारांच्या मधून सरळ रेघेत पाण्याचा आयताकृती सुंदर हौद आणि त्यात एका ओळीत अनेक कारंजी होती. येथे सिंहासन नव्हते. बादशाह मसनदीवर बसला होता. घुशलखाना म्हणजे स्नान करण्याची जागा. पण ही शाही बाथरुम म्हणजे एक मोठा थोरला दिवाणखानाच होता. आजही तो आहे. बादशाहाची मसनद जरा उंचावर होती. डाव्या उजव्या बाजूस त्याचे ज्येष्ठ अधिकारी उभे होते. त्यात अर्जबेगी होता.

महाराजांना घेऊन रामसिंग समोर आला. अकीलखान नावाच्या सरदाराने महाराजांना अदबीने ‘ यावे ‘ असे म्हटले. महाराज आणि संभाजीराजे अन् सत्कानजराण्याची ताटे घेतलेले दोन नोकर असे औरंगजेबाच्या पुढे गेले. शाही आसनापासून महाराज बहुदा सात- आठ फुटांवर पोहोचले. बादशाहाने त्यांच्याकडे बघितलेसुद्धा नाही. एका शब्दानेही बोलणे , चौकशी करणे , निदान चेहऱ्यावर स्मित व्यक्त करणे हे सुद्धा औरंगजेबाच्या विचित्र स्वभावाला यावेळी परवडले नाही. तो जपमाळ ओढीत होता. महाराजांनी आणि संभाजीराजांनी रिवाजाप्रमाणे बादशाहास तीन वेळा मुजरा (कुनिर्सात) केला आणि सत्कानजराण्याची ताटे बादशाहापुढे सादर केली. बादशाह काही बोलतील अशी स्वाभाविक अपेक्षा होती. पण तो अगदी ठप्प होता. नंतर लगेच त्याने अकिलखानास फर्मावले की , यांना जागेवर सुपूर्द करा.

हा साराच शाही वर्तनाचा प्रकार अपमानकारक होता. पाचशे कोसावरून आपल्या भेटीस आलेल्या एका दिलदार समशेरबहाद्दराचं कालपासून आतापर्यंत हे असं स्वागत होत होतं. आश्चर्यच! महाराजांना समोरच्या सरदारांतील जरा मागच्या रांगेत अकीलने नेऊन उभे केले. शंभूराजे शेजारीच. नंतर बादशाहाने एकमागोमाग एक अशा चौघा बड्या दरबाऱ्यांना मानाची खिलत (आहेर) सुपूर्द केली. त्यात महाराजांना अजिबात वगळले. हाही केवढा अपमान होता! त्यात पुन्हा महाराजांच्याच पुढच्या एका रांगेत जोधपूरचा जसवंतसिंह उभा होता. अर्थातच त्याची पाठ महाराजांकडे होती. त्यालाही मानाची खिलत देण्यात आली. याच जसवंतसिंहाचा सिंहगडावरच्या मराठ्यांनी सपाटून पराभव केला होता. ( दि. २८ मे १६६४ ) जसवंतसिंहालाही पाठीवर जखमा झाल्या होत्या. तो सैन्यासह पळत सुटला म्हणून बचावला. त्याचा आत्ता बादशाह महाराजांच्या देखत सत्कार करीत होता. अन् सन्मानाचे पाहुणे म्हणून आलेल्या महाराजांकडे पुरेपूर दुर्लक्ष करीत होता. हा केवढा अपमान!

आग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्यात्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ‘ हा सारा कसला प्रकार चालविला आहे ? अपमान! याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे.

हे मी सहन करणार नाही ‘ आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली. शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले. संतापामुळे त्यांना जरा चक्कर आली. ते जमिनीवरच बसले. दरबारात एकच खळबळ उडाली. खळबळ म्हणजे कुजबुज. अत्यंत अदबीने बादशाहाची आदब सांभाळीत आणि महाराजांच्या बेगुमान , उद्धट , रानटी वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत ही कुजबुज उर्फ खळबळ चालू होती. ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची , तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.

बादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे. त्याने अकिलखानास संथपणे फर्मावले , ‘ अकील , वह देखो , सीवाकी त्यौंरीयाँ क्यू चढ गयी है ?’ अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्याला महाराजांचे शब्द कानी पडले , ‘ मला दरबारात उभं करता ? मी काय तुमचा नोकर आहे ? मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही ?’

रामसिंग तरी काय बोलणार ? तोही अखेर शाही गुलामच. तो एवढंच म्हणाला. ‘ महाराज , बादशाहांची प्रतिष्ठा बिघडते आहे. आपण रागावू नका , आपल्या जागेवर परत चला. ‘

महाराजांनी हे साफ नाकारले. रामसिंग म्हणाला , ‘ महाराज याचे दुष्परिणाम होतील. बादशाह नाराज होतील. ‘

हे सर्व बोलणे हिंदीतून चालले होते. अकीलने परत जाऊन बादशाहास म्हटले की , ‘ खिलत न दिल्यामुळे शिवाजीराजे नाराज झाले आहेत. ‘ तेव्हा बादशाहाने अकीलबरोबरच नवीन खिलतीचे ताट महाराजांकडे पाठविले. अकीलने ताट पुढे करताच महाराज कडाडले , ‘ मी तुमच्या बादशाहाची खिलत झिडकारतो. ‘

खरं म्हणजे महाराजांचे सगळे बोलणे बादशाहाला नक्कीच ऐकू जात होते. तो काय समजायचे ते समजून गेला होता. मराठी रक्त लाव्हारसासारखे उसळलेले सारा दरबारच पहात होता. मराठी रक्ताला मान खाली घालून अपमान सहन करण्याची सवयच नाही. ( नव्हती)

रानटी जनावराप्रमाणे राजे संतापले आहेत , असे अकीलने बादशाहास सांगितले. तेव्हा त्याने रामसिंगला समोर बोलावले आणि आज्ञा दिली , ‘ रामसिंग , शिवाजीराजांवर गुलाबपाणी शिंपडा आणि त्यांना मुक्कामावर घेऊन जा. ‘

गुलाबपाणी शिंपडून महाराष्ट्राचा संताप आणि अपमान शांत होणार होता काय ? रामसिंगने महाराजांना संभाजीराजांसह दरबारातून नेले. महाराजांनीही बादशाहाकडे वळूनसुद्धा पाहिले नाही. भेटून जाणे तर दूरच.

कालपासून घडत असलेल्या या सर्व अपमानकारक घटनांचा परिणाम अगदी स्पष्ट आत्ताच दिसत होता. तो म्हणजे ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव- औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की , ‘ महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ‘ तेव्हा महाराज एकदम म्हणाले , ‘ तुमच्या बादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं ते ?’

मग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.

आपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते. अशा विक्षिप्त राजकारणाला आणि गजकर्णाला औषध नसते. फक्त असते खाज आणि आग.

हा पहिला दिवस. १२ मे १६६६ . तो दिवस व रात्र नंतर शांतच गेली. पण सर्वांचीच मने अशांत होती. दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या सर्व सैन्यानिशी म्हणजे सुमारे तीनशे मावळ्यांनिशी आग्रा शहरात फेरफटका मारावयास निघाले. एका हत्तीवर ते आरुढ झाले होते. पुढच्या एका हत्तीवर भगवा झेंडा फडकत होता. शंभूराजे बरोबर होते. ऐन शहरातून महाराज फेरफटका मारून आले. बहुदा ते देवदर्शनासही यावेळी गेले असावेत. पण तशी नोंद नाही. ताजमहाल बघायला गेल्याचीही नोंद नाही. महाराजांच्या तोंडी ताजमहालचा कुठे उल्लेख आल्याचीही नोंद नाही.

महाराज आग्ऱ्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सल राजपुतांसारखे दिसत होते याचे वर्णन परकालदास नावाच्या रामसिंगच्या एका सेवकाने एका पत्रात लिहिले आहे. हे पत्र अप्रतिम आहे. त्यात महाराजांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट उमटले आहे. १ 3 मे रोजी मधूनमधून रामसिंग आपल्या प्रांगणातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण सुसंस्कृतपणे घडत होते. महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. पण एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की , आपल्यावर बादशाहाची सक्त नजर आहे. येथून एकदम निसटून पसार होणे आत्ता शक्य नाही. पण प्रत्यक्ष आघात करून महाराजांना बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते.

समजा तसे काही त्याने केले असते , तर ? तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का ? तशी भीती तरी बादशाहाला नक्कीच वाटत होती. कारण रामसिंग हा आपल्या बापाइतकाच तुळशीबेलाच्या शपथेला बांधील होता. राजपुताचा शब्द म्हणजे ‘ प्राण जाय पर वचन न जाय ‘ असा लौकीक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती. म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहाँआरा , मामी , मावशी , इतर नातलग आणि अनेक सरदार ‘ तो ‘ दरबार संपल्यापासून औरंगजेबाला आग्रह करकरून म्हणत होते की ‘ सीवाने भयंकर वर्तन करून आपला अपमान केला आहे. आपण त्याला ठारच मारा. ‘ पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त न करता त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करीत होता. बादशाहाला आणखी एका प्रकारची भीती वाटत होती , असे वाटते.

ती म्हणजे शुजाची. बादशाहाने आपल्या भावांचा काटा काढला होता. दारा व मुराद यांना ठार केले होते , पण शुजा हा भाऊ भूमिगत झाला होता. तो सापडत नव्हता. वेळोवेळी चोरट्या बातम्या उठत की , शुजा गुप्तरितीने बंडाची तयारी करीत आहे. तो एक दिवस दिल्लीवर चालून येणार. या जरी ऐकीव अफवा होत्या तरी औरंगजेबाला त्याची धास्ती होतीच. शिवाजीराजाचे निमित्त घडून जर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता पण तशी भीती त्याला नक्कीच वाटत होती. म्हणून शिवाजीराजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. चारच दिवसानंतर म्हणजे दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला! आता ?

त्याचे असे झाले की , दि. १६ मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. तसे ते रोजच येत होते. त्यांचा मुद्दा एकच. या सीवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण. तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की , या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरत शहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आज (दि. १६ मे) मात्र सारेचजण आग्रह करू लागले की सीवाला ठार माराच.

आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की , ‘ होय. मी सीवाला ठार मारणार आहे! ‘ हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेच तयार केला. दिला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही! त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.

मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की , ‘ आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. ‘

हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ‘ मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ‘ याचा अर्थ असाही उघडउघड दिसतोय की , मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ‘ रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा. ‘

शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. भेटला. बादशाह रामसिंगला म्हणाला , ‘ तुझा अर्ज मिळाला. मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?

प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ‘ भाईजी , तुम्ही बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ‘

रामसिंगला हायसे वाटले. तो किल्ल्यात गेला. दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटला. जमानपत्र दिले. ते घेत बादशाह म्हणाला , ‘ रामसिंग , शिवाजीराजांना घेऊन काबूल कंदाहारच्या स्वारीवर जाण्याची तयारी कर. ‘

रामसिंगला हे सरळ वाटले. त्याने होकार दिला. रामसिंग किल्ल्यातून परतत असताना रादअंदाझखान उर्फ शुजाअतखान सुभेदार याने रामसिंगला म्हटले की , ‘ महाराज कँुवरजी , मैं भी आपके साथ काबूल आनेवाला हूँ! मुझे बादशाहका हुक्म हुआ है! ‘

हे ऐकले मात्र , आणि रामसिंग कमालीचा बेचैन झाला. यात बादशाहाचा डाव अगदी स्पष्ट होता की , काबूलच्या प्रवासात कुठेतरी घातपात करून शिवाजीराजांची अन् सर्वच मराठ्यांची कत्तल उडवायची. हा डाव राक्षसी होता. या कत्तलीत रामसिंगचीही आहुती पडणार होती. याच शुजाअतखानाने बादशाहाच्या हुकुमावरून अलवार येथे तीन हजार सत्नामी गोसावी बैराग्यांची कत्तल केली होती. अशा या क्रूरकर्म शुजाअतखानच्या जबड्यात महाराज , शंभूराजेसुद्धा सापडणार होते. आत्ता जणू ते मृत्युच्या ओठावर पावले टाकीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!