छत्रपती शिवाजी महाराज चरित्र भाग ०६ History of shivaji maharaj part 06

शिवाजी महाराज इतिहास History of shivaji maharaj part six

History of shivaji maharaj this is part 07

बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगाखांद्यावर वाढत होता. कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत; आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत.
सारे हसू लागले, को त्यांनी म्हणावे,

“सरकार! चांदी-तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं, ते याच पंचरसी वाळ्यांनी !

उमाबाईंनी मान डोलवावी. म्हणावे, ‘खरंच, कुणाच्याच ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा.’ आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरसी धातूचा वाळा पायी चढविला जाई.

बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे, हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करीत होता. आपली माणसे ओळखून तो हसू लागला.

कष्टाने कूस बदलू लागला. पालथा होऊन चार हातांवरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला; आणि त्यातूनच चारी साधनांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली. हाती पांगुळगाडा आला, आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचावर ठेवण्याची दक्षता वाढू लागली.

मृग आला. पश्चिमेचे वारे सुरू झाले. हळूहळू ढग डोक्यावरून सरकू लागले; पण त्यांचे धरतीकडे लक्षही वळत नव्हते. वैशाखात तप्त झालेली धरित्री तसेच नि:श्वास सोडीत होती. विश्वासरावांनी ही चिन्हे पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबारखान्यात भरून घेतले.

एके दिवशी संध्याकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वर्दी गेली. विश्वासरावांनी पाहिले, तो जिजाबाई कशिदा भरीत होत्या. बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता. त्याचे लक्ष विश्वासरावांच्याकडे गेले; आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलीत म्हणाले,

“राणीसाहेब, बातमी आली आहे की, राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे.’ “केव्हा?” आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले.

“कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील. तेच कळवायला आलो होतो.’ विश्वासरव शिवाजीसह वळले. जिजाबाई म्हणाल्या,
“त्याला इकडे द्या. कपडे बदलते.’

विधासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचे गंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आले. सद्रेवर स्वच्छ बैठक अंथरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंथरली होती. गालिचे, लोड, टक्के, पानदाने यांनी सदर सजली होती.

जिजाबाईंनी गडबडीने कपडे बदलले. दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटविण्यात गर्क झाल्या होत्या. शिवाजीला तयार करून, लक्ष्मीबाई जिजाबाईंना हुडकू लागल्या; पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या दरवाज्याने बाहेर पडल्या; आणि त्यांची पावले थांबली.

जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत होत्या. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणांत जरी वस्त्र चमकत होते. वाऱ्याने पदर उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांचा सफळ जिजाबाईंना लागला नाही. दचकून त्या वळल्या.

“तुम्ही होय? काय भ्याले मी!”
“हुडकलं; कुठं दिसला नाही.’
“सहज आले. उभी राहिले. चला, जाऊ.

“नको. इथंच सहज राहू.” लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, “एवढ्या लोकर वाड्यात जायचं तरी काय कारण आहे ?’

“भारीच छळता, बाई, तुम्ही!” तटाच्या कट्ट्यावर बसत जिजाबाई म्हणाल्या.

दोघी तटाखालचा प्रदेश न्याहाळीत होत्या. अवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला; आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. ‘का उठता? म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखविले. दूर अंतरावर धूळ उडत होती.

तो लोट क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टिपथात आली. गडाला
वळसा देऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. टापांचा आवाज कानांवर येत होता.
“लक्ष्मीबाई!
“काय ?’
“काही नाही. उगीच चिडवाल!’

“सांगा ना! नाही चिडवायची. वचन!’

“आपण मावळतीकडे जाऊ या!’

“समजलं! चला ना! तलावाच्या पलीकडे जाऊ.’

वाड्यासमोरच्या तलावाच्या तटाकडे दोघी गेल्या. जिजाबाईंनी पाहिले… घोडी

जुन्नरमध्ये शिरत होती. पाहता-पाहता जुन्नरमधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली. लक्ष्मीबाईंनी विचारले,

“राणीसाहेब! सामोरे गडाखाली जायचं, की वाड्यात जायचं ?’
“पुरे झालं, बाई…! चला.!
दोघी वाड्यात परतल्या.

गडाच्या परवानगीच्या दरवाज्यावर नगारा वाजला. सदरेत विश्वासराव पागोटे चढवून उभे होते. नारो त्रिमळ, पंत वगैरे मंडळी पोशाख करून अदबीने उभी होती. दुसऱ्या दरवाज्याची नोबत ऐकू आली; आणि विश्वासराव सर्वांसह शहाजीराजांना सामोरे गेले.

गंगा-जमुना टाक्याजवल शहाजीराजांची गाठ पडली. साऱ्यांच्या कमरा लवल्या. मुजरे झडले. स्मितवदनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारते झाले.

विश्वासराव म्हणाले, “उडती बातमी आली होती; त्यामुळं गडाखाली आलो नाही. क्षमा असावी.

“व्याह्यांनी असं परकेपणाचं बोलणं आम्हांला आवडत नाही… काय, नाईक? सर्वठीक ना?’

जी…
जी!

सारे वाड्यात आले. सेवकांची गडबड उडाली. शहाजीराजांनी हात-पाय धुतले. बरोबरच्या मातबर माणसांनीही हात-पाय धुतले. सारे सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासरावांनी विचारले,

“वाटेत तकलीफ तर नाही ना झाली ?’
राजे मनापासून हसले. म्हणाले,

“विश्वासराव, घोडदोड आणि पळापळ इतकी सवयीची झाली आहे, की रात्रीदेखील आम्ही घोड्यावरच स्वार असतो.’

सारे हसले. हसता-हसता थांबले. आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला. साऱ्यांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळली होती. शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले,

“छोटे राजे, या! तुम्हांलाच पाहायला आम्ही आलो होतो. ‘

शिवाजीने एकवार सार्‍्यांच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले; आणि झेप घेत तो शहाजीराजांकडे धावला. शास्त्री म्हणाले,

‘सक्तानं रक्त ओळखलं.’

प्रेमभराने शहाजीराजांनी शिवबाला उचलले. त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले. शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होता. विश्वासराव हसून म्हणाले,

“आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला.’
“नाही. हा दुसरा. पण आमचा असा समज आहे को, छोटे राजे आले आज्ञापत्रक घेऊन.’

“आज्ञापत्रक?’
“आम्ही आत जाऊन येतो.’

शहाजीराजे उठले; शिवाजीला घेऊन आतल्या चोकात गेले. जिजाबाईंच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले,

“आम्हांला पाहताच झेपावला.’

“धीटच आहे. माणसाची पारख झाली, की झेपावतो.

शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले. स्मितवदनाने जिजाऊ म्हणाल्या,
“सासूबाई वाट पाहत आहेत.’

“भलतीच चूक होत होती. दाखवा वाट.’

शहाजीराजांनी उमाबाईचे दर्शन घेतले. जेव्हा निवांतपणाने जिजाबाईची आणि शहाजीराजांची गाठ पडली, तेव्हा त्यांनी विचारले,

“सर्व ठीक आहे ना?’

जिजाबाईंच्या डोळ्यांत अश्रू गोळा झाले. हुंदका बाहेर पडला. आसनावरून उठत शहाजीराजे म्हणाले,

“राणीसाहेब, आम्हांलाही ते समजलं. मामासाहेबांची अशी हत्या व्हावी, याचं आम्हांलाही दु:ख आहे. आमच्या काळजाला त्या वार्तेनं घरं पडली. आमचं वैर होतं खरं; पण ते घरचं. परक्‍्यांनी केलेला हस्तक्षेप आम्ही कसा सहन करू? त्यानंच मन भडकलं;
आणि आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली.
“हे असं किती दिवस चालायचं?

“ती का आम्हांला होस आहे? बायकापोरांत राहावं, असं का आम्हांला वाटत नाही?पण, राणीसाहेब, शिवबाच्या पायगुणानं हे दिवस संपतील. आम्ही कुठं तरी स्थिर होऊ.’

त्यानंतर शहाजीराजे आठ-दहा दिवस गडावर होते. गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होते. शिवबाच्या संगतीनं हसण्याला ऊत येत होता. मेजवान्या झडत होत्या. शहाजीराजांनी सार्‍या गडाची व्यवस्था जातीने पाहिली. अंबारखान्यात भरलेले धान्य पाहून, गंजीखाना
पाहून ते उद्गारले.

“किती वर्षांची तयारी आहे ?’

“दुष्काळी चिन्हं दिसतात. खबरदारी घेतलेली बरी!’

“खरं आहे. आपलंही वास्तव्य….’

“राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो.’

“आमची तीच अपेक्षा होती. खजिन्याची रक्कम जमा घेतलीत ना?’

“पण त्याची काही…

“विश्वासराव, करता, ते का थोडं आहे? तुम्ही घर संभाळता. मुलूखगिरी करून घर तरी भरू द्या.’

एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मोगली ताकीद खलिता आला. शहाजीराजांनी तो उघडला; त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली. वाचून होताच, दीर्घ
नि:श्वास सोडून शहाजीराजे म्हणाले,

“विश्वासराव! विश्रांतीचे दिवस संपले.’
“का? काय झालं ?’
“बादशहा दक्षिणस्वारीसाठी उतरले आहेत. बऱ्हाणपूरला छावणी आहे. मालक आलेल्याची वर्दी आहे, म्हणजे सेवकांनी टाकोटाक जायला हवं. उद्या आम्ही निघणार!’

“चार-दोन दिवसांनी गेलं, तर चालेल ना?!

“न चालायला काय झालं?’ शहाजीराजे म्हणाले. “पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. जिथं चाकरी करतो, तिथं वेठबिगार आम्हांला जमत नाही.’

दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारीत होते. उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या,

“ऱ्हायला असतास, तर बरं झालं असतं. जपून राहा. ‘

“आपला मुक्काम आहे ना?’

“छे, रे. ते जमायचं नाही. देवधर्म तसाच राहून गेलाय. आपल्या कुलदैवताला, घृष्णेधयला आले होते. कळलं, मुलगी इथं आहे. भेटायला आले, ती तशीच गुंतून पडले, बघ.’

“मग त्यांना तुमच्या बरोबर न्या.

“नको, रे, बाबा! माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील. सार्‍या मुलुखात दुष्काळ आहे. त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी. ‘

राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला; शिवाजीचे मुके घेतले; आणि विश्वासरावांच्या वर सर्व सोपवून शहाजहानच्या भेटीसाठी त्यांनी बऱ्हाणपूरला कूच केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!